Navratri 2022: नवरात्रोत्सव: नवरात्रीत चुकूनही करू नका ‘ही’ ९ कामे; दुर्गा देवी होईल नाराज, अवकृपा संभव!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 01:12 PM2022-09-28T13:12:02+5:302022-09-28T13:17:14+5:30

Navratri 2022: नवरात्र कालावधीत काही गोष्टींचे भान राखणे आवश्यक असून, पूजेचे शुभ-पुण्य प्राप्त होण्यासाठी काय करावे? जाणून घ्या...

चातुर्मासात विशेष महत्त्व असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवात देवीच्या नऊ रुपांचे पूजन केले जाते. ब्रह्मदेवांच्या वरदानामुळे अहंकरी आणि क्रूरकर्मा झालेल्या महिषासुराचा वध करण्यासाठी आदिमायेने विविध नऊ रुपे धारण केली. आदिशक्तीच्या याच नऊ रुपांचे पूजन नवरात्रात केले जाते. यंदा २०२२ रोजी २६ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. ०५ ऑक्टोबर रोजी दसरा म्हणजेच विजयादशमी साजरी केली जाणार आहे. (shardiya navratri utsav 2022)

अगदी प्राचीन काळापासून नवरात्रात विशेष व्रत आचरण्याची परंपरा आपल्याकडे आहे. देशभरातील भाविक या नऊ दिवसात आपापल्या पद्धतीप्रमाणे देवीचे पूजन, व्रताचरण करतात. देशभरात नवरात्र साजरे करण्यामागेही विविधता असल्याचे आढळून येते. असे सगळे असले, तरी काही गोष्टींचे भान किंवा व्रतपूजनाचे नियम पाळणे आवश्यक असते, असे म्हटले जाते.

दुर्गा देवीचे पूजन, आराधना, नामस्मरण, उपासना, जप-जाप, होम-हवन करण्यासाठी नवरात्र हा सर्वश्रेष्ठ काळ मानला जातो. नवरात्रोत्सव कालावधीत काही गोष्टी अजिबात करू नये, असे सांगितले जाते. अनावधानाने गोष्टी घडल्या, तरी दुर्गादेवीची नाराजी, अवकृपा, वक्रदृष्टी पडू शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. नवरात्रात नेमक्या कोणत्या गोष्टी करू नयेत? जाणून घेऊया...

कोणत्याही देवी-देवतांचे पूजन करताना उपासकाने, साधकाने किंवा व्रताचरण करणाऱ्या व्यक्तीने बसण्यासाठी आसन घ्यायचे असते. मात्र, नवरात्रात देवीचे पूजन करताना आसन घ्यायला अजिबात विसरू नये. आसनावर बसूनच देवीचे पूजन करावे, असे सांगितले जाते. तसेच संपूर्ण नऊ दिवस पूजास्थळी किंवा देवघरात नंदादीप तेवत ठेवावा. देवी पूजनात लाल रंगाच्या वस्त्राचा आवर्जुन वापर करावा, असे सांगितले जाते.

तसेच देवीच्या अन्य रुपांच्या आवडत्या रंगाचे वस्त्र वापरावे, असे म्हटले जाते. नवरात्राचे व्रताचरण करणाऱ्यांनी तसेच कुटुंबातील सदस्यांनी संपूर्ण नऊ दिवस आपला व्यवहार संयमित, मर्यादित आणि संतुलित ठेवावा, असे म्हटले जाते. या नऊ दिवसात जो कोणी पाहुणा म्हणून घरी येईल किंवा जी व्यक्ती दारात येईल, त्या व्यक्तीला जेवल्याशिवाय तसेच जाऊ देऊ नये. अगदी साग्रसंगीत भोजन शक्य नसेल, तरीदेखील काही ना काही खाद्यपदार्थ त्या व्यक्तीला द्यावेत, असे सांगितले जाते.

या नऊ दिवसात कोणाचाही अपमान करू नये. खोटे बोलू नये, खोटे वागू नये, असे म्हटले जाते. नवरात्र कालावधीत दुर्गा सप्तशती आणि दुर्गा चालीसा यांचे पठण आवर्जुन करावे. पठण शक्य नसल्यास श्रवणानंद घ्यावा, असे म्हटले जाते. नवरात्राच्या कालावधीत काही गोष्टी टाळाव्यात, असे सांगितले जाते. देवीच्या व्रतपूजनात फळांचा नैवेद्य दाखवावा, असे म्हटले जाते.

देवीच्या नैवेद्यात विविध प्रकारची फळे, मिठाई, मिश्री, साखर, लवंग, वेलची आदी गोष्टींचा प्रामुख्याने समावेश करावा, असे सांगितले जात आहे. नवरात्रात देवीचे पूजन करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते.

नवरात्रातील पूजनात सात्विकता आणि पावित्र्य राखले गेले पाहिजे, असे सांगितले जात आहे. काही कारणास्तव पावित्र्य किंवा सात्विकता पाळली जाणे शक्य होत नसेल, तर अशावेळी पूजा करू नये, असे सांगितले जाते. तसेच नवरात्रातील संपूर्ण नऊ दिवस पूजन काळात लसूण, कांदा यांसारखे उग्र पदार्थ खाणे टाळावे.

काही धार्मिक ग्रथांमध्ये कांदा-लसूणयुक्त पदार्थांचे सेवन करण्याला तामसी आहार म्हटले गेले आहे. सात्विक आणि पचनाला हलका आहार घ्यावा, असे सांगितले जाते. नवरात्राचे व्रत आचरण करताना नेहमी ब्रह्म मुहुर्तावर उठावे.

अन्यवेळी सकाळपर्यंत झोपले, तरी चालते. मात्र, नवरात्रात हा नियम पाळणे आवश्यक आहे. संपूर्ण नवरात्रात ब्रह्म मुहुर्तावर उठून नित्यकर्मे आटोपून घ्यावीत. यानंतर सूर्योदयावेळी सूर्याला अर्घ्य द्यावे, असे म्हटले जाते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नवरात्रातील व्रताचरण हे निर्मळ मनाने, प्रामाणिकपणे आणि मनोभावे करावे.

श्रद्धेने केलेले कोणतेही व्रत हे उत्तम मानले गेले आहे. देव हा भक्तीचा भुकेला असतो, असे म्हटले जाते. त्यामुळे यथाशक्ती, यथासंभव व्रताचरण करावे. व्रताचरण कालावधीत भक्तिभाव हा अत्यंत महत्त्वाचा असतो. मनापासून केलेली प्रार्थना, उपासना, नामस्मरण, जप सकारात्मक तसेच शुभ फलप्राप्ती करण्यास सहाय्यभूत ठरते, असे सांगितले जाते.

पूजेचे उत्तम तसेच शुभ पुण्यफल प्राप्त होण्यासाठी संपूर्ण नऊ दिवस मनोभावे देवीच्या पूजनासह भजन-कीर्तन करावे. नामस्मरण, जप, आराधाना, उपासना करावी. यथाशक्ती दान-धर्म करावा, असे सांगितले जात आहे. असे केल्याने देवीचे शुभाशिर्वाद प्राप्त होतात. घरात, कुटुंबात आनंद, सुख, समृद्धी वृद्धिंगत होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.