तणावमुक्त आयुष्यासाठी फक्त 'या' पाच गोष्टींचा दैनंदिन जीवनात समावेश करा! By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 05:24 PM 2021-08-09T17:24:40+5:30 2021-08-09T17:39:38+5:30
खूप खुश राहावे, आनंदी राहावे असे प्रत्येकाला वाटते परंतु तसे राहता येत नाही याचेच दुःख सतावते. आनंद छोट्या छोट्या गोष्टीतून मिळवायची सवय लागली, की आपोआप दुःखाची तीव्रता कमी होऊ लागते आणि आयुष्य तणावमुक्त होऊ लागते. त्यासाठी प्रयोग म्हणून पुढील पाच गोष्टींचा तुमच्या आयुष्यात सराव करा आणि सलग २१ दिवस त्याचे नित्यनेमाने पालन करा. तुम्हाला बदल निश्चित जाणवेल. पिवळा रंग पहा सकाळी उठल्यावर सर्वात आधी डोळ्यासमोर पिवळा रंग दिसेल अशी व्यवस्था करा. आपल्या मज्जातंतूच्या रचनेनुसार पिवळा रंग मेंदूत आनंद, उत्साह आणि आशेची संप्रेरके निर्माण करतो. आपण रोज वापरतो ते इमोजी सुद्धा पिवळ्या रंगाचे आहेत, त्यामागे कारण हेच आहे! पिवळा रंग आल्हाद दायक असल्याने दिवसाची सुरुवात या रंगाने करावी असे मानसोपचार तज्ञ सांगतात. यासाठीच आपल्या पूर्वजांनी सकाळी उठल्यावर सूर्य दर्शन घेऊन सूर्य नमस्कार घालण्याचा संस्कार केला आहे. सकाळचे पिवळे कोवळे ऊन शरीराला लाभदायक तर असतेच शिवाय त्याचा परिणाम आपल्या मनावर सकारात्मक होतो आणि बरेच तास मन प्रफुल्लित राहते.
दर तासाने १० सेकंद ध्यानधारणा करा ध्यानधारणेसाठी सकाळची वेळ उत्तम असते हे मान्य आहे, परंतु एका थेरेपीनुसार दिवसभरात दर तासाला कामातून ब्रेक घेत शरीर ताणून छताकडे हात नेत डोळे मिटा आणि मागच्या एका तासात आपण कोणासाठी काय चांगले केले याचा विचार करा. या गोष्टीच्या नित्य सरावामुळे आपली क्षमाशील वृत्ती वाढते आणि आपण परोपकारासाठी प्रवृत्त होतो. आपल्याकडून चांगले काम घडले पाहिजे ही जबाबदारी मनातील वाईट विचारांचा निचरा करते.
अक्रोड खा सुका मेव्यातील अक्रोड हा मेंदू सदृश दिसणारा पदार्थ मेंदू शांत ठेवण्यासाठी अतिशय उपयोगी पडतो. हा उपाय थोडा खर्चिक नक्की आहे, परंतु तुम्हाला वारंवार राग येत असेल आणि रागात तुम्ही स्वतःचेच नुकसान करून घेत असाल, तर औषधांवर पैसे खर्च करण्याऐवजी तीव्र संतापाच्या क्षणी एखाद दोन अक्रोड खाणे नक्कीच सोयीस्कर ठरेल.
उगीच हसत राहा तुम्ही म्हणाल, उगीच हसायला काय आम्हाला वेड लागले आहे का? आपल्याला अकारण हसताना पाहून लोकांना आपण वेडे वाटलो तरी हरकत नाही. परंतु तणाव निर्मूलनावर हसण्यासारखा बिनखर्चिक दुसरा उपाय नाही. मुन्नाभाई मधले डॉक्टर अस्थाना आठवा. आले ना हसू? हेच हसू आपल्याला कायम ठेवायचे आहे. खोटे खोटे हसावे लागले तरी बेहत्तर, पण चेहरा पाडून बसण्यापेक्षा हसत राहणे केव्हाही चांगले. लहान मुले उगीच खिदळत असतात, म्हणून टेन्शन नावाचा प्रकार त्यांच्या वाऱ्यालाही उभा राहत नाही. हाच उपाय आपणही जास्तीत जास्त करायला हवा.
आवडता फोटो जवळ ठेवा आपल्या मेंदूला शब्दांपेक्षा जास्त चित्रांची भाषा चटकन कळते. म्हणून तुमच्या आवडीचा कोणताही फोटो, जो पाहताक्षणी तुमची कळी खुलते तो फोटो सदैव आपल्या जवळ ठेवा. ज्या क्षणी निराश, हताश वाटेल, त्याक्षणी तो फोटो पाहा, रिचार्ज व्हा आणि नव्या दमाने कामाला लागा!