Kumbha Sankranti 2022: कुंभसंक्रांती: ४ राशीच्या व्यक्तींना संमिश्र काळ; सूर्यपूजनासह ‘हे’ उपाय ठरतील उपयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 01:21 PM2022-02-11T13:21:53+5:302022-02-11T13:27:59+5:30

Sun Transit in Aquarius 2022: कुंभ संक्रमण कालावधीत सूर्यदेवाशी संबंधित काही उपाय लाभदायक ठरू शकतात. जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहातील सर्व ग्रह आपापल्या नियोजित कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करत असतात. नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य १३ फेब्रुवारी २०२२ रोजी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या या कुंभ राशीतील संक्रमणाला कुंभ संक्रांती असे म्हटले जाते. (Kumbha Sankranti 2022)

ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्याचे प्रत्येक राशीतील संक्रमण अनेकार्थाने अतिशय महत्त्वाचे मानले गेले आहे. सूर्य हा करिअर, नेतृत्वगुण यांचा कारक मानला जातो. कुंभ राशीतील सूर्य प्रवेशाचा काळ काही राशीच्या व्यक्तींना शुभ, लाभदायक आणि उत्तम ठरू शकतो. तर, काही राशीच्या व्यक्तींना तो प्रतिकूल किंवा संमिश्र स्वरुपाचा ठरू शकतो, असे सांगितले जाते. (Sun Transit in Aquarius 2022)

सूर्य शनीचे स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य आणि शनी पिता-पुत्र मानले गेलेले असले, तरी ते एकमेकांचे शत्रू ग्रहही मानले गेले आहेत. ज्या राशीच्या व्यक्तींवर सूर्याचा प्रतिकूल प्रभाव असू शकेल, त्यांनी सूर्याशी संबंधित काही उपाय करणे अत्यंत उपयुक्त मानले गेले आहे. असे केल्याने जन्मकुंडलीतील सूर्य मजबूत होऊ शकेल. तसेच प्रतिकूल प्रभावही कमी करता येऊ शकेल, असे सांगितले जात आहे. (Surya Gochar in Kumbha Rashi 2022)

सूर्याचा कुंभ राशीतील प्रवेश मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी फारसा फायदेशीर नसल्याचे सांगितले जात आहे. या कालावधीत काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. महत्त्वाच्या तसेच किमती किंवा महागड्या वस्तू जपून ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. नोकरदार वर्गाने केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करावे. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवावे. वाणी संयमित ठेवावी. आरोग्याची काळजी घ्यावी.

सूर्याचा कुंभ राशीतील प्रवेश सिंह राशीच्या व्यक्तींना संमिश्र स्वरुपाचा ठरू शकतो. सूर्य हा सिंह राशीचा स्वामी असला, तरी या कालावधीत आत्मविश्वासात कमतरता येऊ शकते. जीवनात काही चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक स्थिती सामान्य राहू शकेल. मात्र, जमा-खर्चाचा ताळेबंद योग्य ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. कुटुंबातील सदस्याच्या आरोग्याची चिंता वाटू शकते. प्रवास करणे शक्यतो टाळावे, असे सांगितले जात आहे.

सूर्याचा कुंभ राशीतील प्रवेश वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी काहीसा समस्याकारक ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. व्यवसाय, व्यापारात अपेक्षित लाभ मिळेलच असे नाही. खर्चात वाढ होऊ शकते. अनावश्यक खर्च टाळण्याचा सल्ला दिला जात आहे. शक्यतो मोठी गुंतवणूक टाळावी अथवा तज्ज्ञ किंवा वरिष्ठांच्या सल्ल्यानंतरच योग्य तो निर्णय घ्यावा. कोणत्यादी वादात पडू नये. धनसंचयाच्या योजना आखाव्यात.

सूर्य मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे मकर राशीच्या व्यक्तींना हा कालावधी काहीसा संमिश्र स्वरुपाचा ठरू शकतो. घाईने कोणतेही निर्णय घेऊ नयेत. संयम ठेवावा. जोडीदाराशी वादाचे प्रसंग टाळावेत. कार्यक्षेत्रात काहीसे चढ-उतार पाहायला मिळू शकतात. नोकरदार वर्गाने केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करावे. वाणी संयमित आणि नियंत्रित ठेवावी, असे सांगितले जात आहे.

सूर्याचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी सूर्य देवाचे काही उपाय करणे लाभदायक ठरू शकते, असे सांगितले जाते. सूर्य हा नवग्रहांचा राजा आहे. या कालावधीत सूर्योदयावेळी सूर्याला दररोज अर्घ्य द्यावे. अर्घ्य देताना सूर्य मंत्रांचे पठण करावे. शक्य असेल, तर सूर्य चालीसाचे पठण किंवा श्रवण करावे.

सूर्य संक्रमणाच्या काळात आदित्य हृदय स्तोत्र पठण करावे. असे केल्याने कुंडलीतील सूर्य मजबूत होण्यास मदत मिळू शकते. याशिवाय भाग्याची साथ लाभू शकते. सूर्याला अनुकूल करण्यासाठी गहू, गूळ, तांब्याची वस्तू आणि लाल वस्त्राचे यथाशक्त दान करावे, असे सांगितले जाते.