पापातून मुक्ती हवी आहे? शास्त्राने सांगितलेले चार पर्याय वापरून पहा! By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: January 21, 2021 04:31 PM 2021-01-21T16:31:52+5:30 2021-01-21T19:05:03+5:30
धर्मशास्त्रात पापमोचनाचा एवढा सखोल विचार केला आहे. ते पाहता आपल्या हातून दैनंदिन जीवनात कितीतरी पापे घडत असतात, याची यादीच डोळ्यासमोर उभी राहिल. पापाचा घडा भरून वाहण्याआधी तो वेळीच रिकामा करायला हवा. यासाठी पुढील चार मार्ग आपल्याला दिनचर्येचा भाग करता येईल. बहुतेक सर्व धर्मात पाप व पुण्य यांचा सखोल विचार केलेला आढळतो. सामान्यपणे पुण्य म्हणजे परोपकार व पाप म्हणजे परपीडा अशी पापपुण्याची व्याख्या केली जाते. त्याचे तीन प्रकार आहेत. कायिक, वाचिक आणि मानसिक! कायिक पाप म्हणजे आपल्या देहाकडून जे घडते. जसे की मारणे, विचित्र हावभाव करणे, कोणाला त्रास देणे इ. वाचिक पाप म्हणजे बोलून समोरच्याला दुखवणे, अपशब्द काढणे, अपमान करणे इ. मानसिक पाप म्हणजे दुसऱ्याचे वाईट चिंतन करणे, दुसऱ्याच्या संपत्तीची अभिलाषा ठेवणे, दुराग्रह करणे इ. अशा पापकर्मातून मुक्त होण्यासाठी शास्त्राने चार प्रकार सांगितले आहे.
पापोच्चार : म्हणजे पापाची कबुली. आपल्याकडून काही चुकीचे घडल्यास त्याची जाणीव होऊन तिथल्या तिथे आपली चूक कबुल करून क्षमा मागणे, याला पापोच्चार म्हणतात.
प्रायश्चित्त : आपल्या क्षमा मागण्याने समोरच्याचे नुकसान भरून निघणारे नसेल, तर अशा पापासाठी प्रायश्चित्त म्हणून सदर व्यक्तीची तसेच आपण ज्या देवतेची पूजा करतो त्याची क्षमा मागून जपाची माळ ओढावी आणि आपल्या चुकीबद्दल खंत व्यक्त करावी.
परिमार्जन : आपल्यामुळे झालेले दुसऱ्याचे नुकसान लक्षात येताच ते भरून काढणे शक्य असेल, तर अवश्य पुढाकार घेऊन मदत करावी. याला परिमार्जन म्हणतात.
शासन : आपल्या हातून घडलेली चूक पुन्हा कधी घडू नये, म्हणून स्वत:ला शिक्षा करून घ्यावी. उपास करावा. एखाद्या वस्तूचा दीर्घकाळ त्याग करावा. वरीलपैकी कोणत्याही पद्धतीचा अवलंब केल्यामुळे पाप कमी होवो न होवो आपली सारासार बुद्धी शाबुत राहते. यालाच पंचशील असे म्हणतात. मुळात कोणतीही कृती विचारपूर्वक केली पाहिजे. बोलण्याआधी विचार केला पाहिजे. शस्त्राने, हाताने, शब्दानेच काय, तर मनानेसुद्धा कोणाला दुखवू नये, कोणाचे अहित चिंतू नये. हे या संकल्पनेमागचे उद्दीष्ट आहे.