शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

BharatPe Ashneer Grover Resigns: 'भारतपे'चे एमडी अशनीर ग्रोव्हर यांचा राजीनामा; यापूर्वी सिंगापूर इंटरनॅशनल सेंटरने फेटाळली होती याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2022 8:06 AM

1 / 12
BharatPe Ashneer Grover Resigns: 'भारतपे'मध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, कंपनीचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover) यांनी तत्काळ प्रभावाने फिनटेक फर्ममधून राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.
2 / 12
आर्थिक अनियमिततेच्या कारणावरून ‘भारतपे’चे अडचणीत सापडलेल्या अशनीर ग्रोव्हर यांना सिंगापूर आंतरराष्ट्रीय लवादातून कोणताही दिलासा मिळाला नव्हका. सिंगापूर इंटरनॅशनल सेंटरने अशनीर ग्रोव्हर यांची याचिका फेटाळून लावली. यानंतरच अशनीर ग्रोव्हर यांनी आपला राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.
3 / 12
“मी 'भारतपे'च्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामा देत आहे. हा तात्काळ प्रभावाने लागू होईल. मी बोर्डाच्या संचालकपदाचाही राजीनामा देत आहे. मी कंपनीचा एकमेव सर्वात मोठा वैयक्तिक शेअरधारक म्हणून पुढे कायम राहीन,” असं ग्रोव्हर यांनी कंपनीला दिलेल्या राजीनाम्याच्या पत्रात म्हटलं आहे.
4 / 12
यापूर्वी सिंगापूर इंटरनॅशनल सेंटरने अशनीर ग्रोव्हर यांची याचिका फेटाळून लावली होती. ग्रोव्हर यांनी एसआयएसीमध्ये याचिका दाखल करत बोर्डाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अशनीर ग्रोव्हर यांची याचिका फेटाळल्यानंतर ‘भारतपे’चे बोर्ड आर्थिक अनियमितता आणि प्रशासनातील त्रुटींची चौकशी करत राहणार आहे.
5 / 12
काही दिवसांपूर्वी अशनीर ग्रोव्हर आणि त्यांच्या पत्नी माधुरी जैन-ग्रोव्हर यांच्याबद्दलचा एक वाद चांगलाच चर्चेत आला. यानंतर ग्रोव्हर दाम्पत्य मोठ्या रजेवर गेल्याची माहिती मिळाली. BharatPe कंपनी झालेल्या गैरव्यवहाराबाबत एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती.
6 / 12
आर्थिक अनियमिततेच्या कारणावरून BharatPe ने त्यांचे अडचणीत सापडलेले सह-संस्थापक अशनीर ग्रोव्हर यांच्या पत्नी माधुरी जैन-ग्रोव्हर यांचीही कंपनीतून हकालपट्टी केली. त्या ऑक्टोबर २०१८ पासून त्या कंपनीच्या आर्थिक नियंत्रणे विभागाच्या प्रभारी होत्या.
7 / 12
माधुरी जैन-ग्रोव्हर यांनी बनावट पावत्या तयार करणे आणि वैयक्तिक कारणासाठी आणि परदेशातील सहलींसाठीची अवाजवी खर्च केल्याचे आरोप करत, BharatPe ने त्यांच्यावर कथित आर्थिक अनियमिततेचा ठपका ठेवला आहे. कंपनीच्या प्रवक्त्यांनी या हकालपट्टीची पुष्टी केली.
8 / 12
याशिवाय त्यांच्याशी निहित हितसंबंध असणाऱ्या ५६ कर्मचाऱ्यांसह, एकूण ३०० कर्मचाऱ्यांचे ईसॉप अर्थात एम्प्लॉइ स्टॉक ऑप्शन रद्द केले आहे, अशी माहितीही BharatPe कडून देण्यात आली.
9 / 12
कोटक महिंद्रा बँकेच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध अपमानास्पद भाषा वापरल्याचा आणि फसवणूक केल्याच्या आरोपांनंतर अशनीर ग्रोव्हर हे चालू वर्षांत जानेवारीपासून मार्च २०२२ अखेपर्यंत ऐच्छिक रजेवर गेले आहेत. त्यांनतर लगेचच त्यांच्या माधुरी यांनाही रजेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
10 / 12
अशनीर यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप यापूर्वीच फेटाळून लावले आहेत. वृत्तसंस्थेकडून माधुरी यांची बाजू ऐकून घेण्यासाठी धाडण्यात आलेल्या ई-मेल संदेशांना त्यांनी उत्तर देण्याचे टाळले आहे. माधुरी यांनी कंपनीबाबत गोपनीय माहिती त्यांचे वडील आणि भावामार्फत दुसऱ्या कंपनीला पुरविली असल्याचा दावा करण्यात आला आहे.
11 / 12
तसेच एप्रिल २०२१ मध्ये लेझर जेनेसिस आणि क्लियरलिफ्ट या चेहऱ्याशी संबंधित उपचाराचा खर्च आणि स्वत:च्या निवासस्थानासाठी एलईडी टीव्ही आणि फ्रीज खरेदी करून तो खर्च कंपनीकडून घेण्यात आल्याचा ठपकाही त्यांच्यावर आहे. याचबरोबर कुटुंबातील सदस्यांनी अमेरिका आणि दुबईतील सहलींवर केलेला खर्च त्यांनी कंपनीकडून वसूल केल्याचे आरोपांमध्ये नमूद आहे.
12 / 12
२.८ अब्ज डॉलर म्हणजेच २१ हजार कोटी रुपयांचे भांडवली मूल्य असलेल्या BharatPe मधील माधुरी जैन यांनी कंपनीच्या पैशाने वैयक्तिक खरेदी केल्याचा आरोप आहे. याआधी माधुरी जैन यांनी कंपनीच्या संचालक मंडळास एक पत्र पाठवून आपण राजीनामाच दिलेला नसल्याने तो स्वीकारण्याचा प्रश्नच येत नसल्याचे म्हटले होते.
टॅग्स :businessव्यवसाय