शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

BPCL चा मेगा प्लान! पेट्रोल पंपावर सुरु होणार EV चार्जिंग स्टेशन; १ लाख कोटींची गुंतवणूक करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 1:20 PM

1 / 10
आताच्या घडीला देशातील अनेक सरकारी कंपन्यांची खासगीकरण प्रक्रिया सुरू आहे. Air India सह BPCL ही कंपनीही खासगीकरणाच्या रांगेत आहे. या कंपनीच्या खासगीकरणातून केंद्रातील मोदी सरकार हजारो कोटींचा निधी उभारणार असल्याची माहिती मिळाली आहे.
2 / 10
दुसरीकडे, देशातील प्रमुख पेट्रोलियम किरकोळ विक्रेता कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (BPCL) मोठी घोषणा केली आहे. पुढील पाच वर्षात इलेक्ट्रिक वाहनांच्या पायाभूत चार्जिंग सुविधेसाठी अर्थात चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरसाठी १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे कंपनीने जाहीर केले.
3 / 10
इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यात मदत करण्यासाठी आपल्या पेट्रोल पंपांच्या नेटवर्कचा कंपनी वापर करणार आहे. BPCL चे अध्यक्ष अरुण कुमार सिंह यांनी सांगितले की, ही गुंतवणूक बीपीसीएलला अशावेळी मदत करेल, जेव्हा पारंपारिक पेट्रोल आणि डिझेल वाहनांसह इलेक्ट्रिक वाहनांचा वापर समान पातळीवर असेल.
4 / 10
यासह एक हजार मेगावॅट इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग नेटवर्क उभारण्याचे BPCL चे उद्दिष्ट आहे. याशिवाय बीपीसीएल जैवइंधन आणि हायड्रोजनमध्येही गुंतवणूक करत आहे.
5 / 10
BPCL कडे आताच्या घडीला प्रमुख शहरांमधील ४४ पेट्रोल पंपांवर EV चार्जिंग सुविधा आहे. याशिवाय पुढील दोन वर्षांत ही संख्या एक हजारापर्यंत वाढवण्याची कंपनीची योजना असून, कोची, लखनऊमध्ये तीनचाकी वाहनांसाठी बॅटरी स्वॅपिंग चाचण्याही सुरू केल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.
6 / 10
BPCL ची सध्या देशभरात १९ हजारांहून अधिक रिटेल आउटलेट आहेत. नजीकच्या भविष्यात ईव्ही चार्जिंग , फ्लेक्स-इंधन आणि हायड्रोजन देऊ करून त्यापैकी सुमारे ७ हजार आउटलेट वीज केंद्रांमध्ये रूपांतरित करण्याची योजना कंपनी आखत आहे.
7 / 10
बीपीसीएलने येत्या काही वर्षांमध्ये व्यापक गुंतवणूक योजना बनवल्या आहेत. कंपनी गट स्तरावर (ग्रुप लेवल) १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करेल, असे सिंह यांनी म्हटले आहे.
8 / 10
तसेच यामध्ये प्रामुख्याने पेट्रोकेमिकल क्षमता वाढवणे आणि शुद्धीकरण क्षमता सुधारण्यासाठी ३० हजार कोटी रुपये, गॅस पुरवठ्यासाठी २० हजार कोटी रुपये, गॅसच्या शोध आणि उत्पादनासाठी १८ हजार कोटी रुपये आणि मार्केटिंग इंफ्रास्ट्रक्चरसाठी १८ हजार कोटी रुपये खर्च करण्याची योजना समाविष्ट आहे, असे सांगितले जात आहे.
9 / 10
दरम्यान, केंद्र सरकार देशात इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन धोरणे बनवत आहे. देशभरातील ६९,००० पेट्रोल पंपांवर इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन बांधण्याची केंद्र सरकारची योजना आहे.
10 / 10
या योजनेअंतर्गत शासकीय आणि अशासकीय पेट्रोल पंपांवर इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन बांधण्यात येतील, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनAutomobileवाहनPetrol Pumpपेट्रोल पंप