मुंबई, दि. 19 - जीएसटी भरण्यासाठी ऑनलाइन गेलेल्या व्यापा-यांना आज प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. जीएसटी फाईल करण्यासाठी लॉग इन केलं असता वारंवार वेबसाइट डाऊन होत असल्याने व्यापा-यांना जीएसटी फाइल करता येत नव्हता. यासंबंधी ट्विटरच्या माध्यमातून वारंवार तक्रारही करण्यात येत होती. जीएसटी भरण्यासाठी उद्या म्हणजेच 20 ऑगस्ट शेवटची तारीख असल्याने व्यापा-यांची मात्र चांगलीच धावाधाव झाली. अखेर जीएसटी भरण्यासाठी पाच दिवसांचा अवधी वाढवून देण्यात आला असून, 25 ऑगस्ट शेवटची तारीख असणार आहे. सरकारने पाच दिवस वाढवून दिल्याने व्यापा-यांना दिलासा मिळाला असला तरी काहीजणांनी मात्र जर सकाळपासूनच ही समस्या होती तर आधीच हे जाहीर का नाही केलं असा संताप व्यक्त केला आहे. जीएसटी वेबसाइट डाऊन होण्याचं नेमकं कारण कळू शकलं नव्हतं, मात्र थोड्या वेळाने प्रयत्न करा असा मेसेज वेबसाइटवरुन देण्यात आला होता. 2 वाजता वेबसाइट बंद करण्यात आली होती. 2.30 वाजता डाऊनटाईम संपल्यानंतर वेबसाइट पुन्हा सुरळीत होण्याची अपेक्षा होती, मात्र नंतरही त्रास सुरुच होता.चार्टर्ड अकाऊंटंट असणा-या सचिन घडियाली यांनी सांगितलं आहे की, ''इतका जर गोंधळ झाला होता, तर तुम्ही जे पाच दिवस वाढवून दिले आहेत ते सकाळी द्यायलाच हवे होते. संध्याकाळी सात वाजता ही माहिती उघड करण्यात काय अर्थ आहे. ही माहिती आधीच दिली असती तर सकाळपासून व्यापा-यांनी जी धावाधाव करावी लागली ती करावी लागली नसती'. 20 ऑगस्ट शेवटची तारीख असल्याने अनेक व्यापा-यांनी जीएसटी भरण्यासाठी वेबसाइट सुरु केली. मात्र वेबसाईट अत्यंत धीम्या गतीने सुरु होती. यानंतर वेबसाइट सुरु झाली, तर लॉग इन होत नव्हतं. उद्या शेवटचा दिवस असल्याने अनेकजण वेबसाइटसमोर ठाण मांडूनच बसले होते. पण वेबसाइट काही सुरळीत होत नव्हती. ज्यांचं लॉग इन झालं होतं, त्यांना तर वेगळ्याच समस्येला सामोरं जावं लागलं. त्यांच्या बँकेच्या खात्यातून पैसे कट झाले, पण सरकारकडे जमा होत नव्हते. एकामागून एक येणा-या समस्यांमुळे व्यापा-यांचा मात्र चांगलाच संताप झाला.स्पेशल टास्क फोर्स ऑन जीएसटीचे अध्यक्ष प्रतीक जैन बोलले आहेत की, 'दुपारी 12 वाजल्यानंतर जीएसटीची वेबसाइट धीम्या गतीने सुरु होती. यामुळे व्यापा-यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. आमच्या अनेक ग्राहकांनी यामुळे रिटर्न फाईल करु शकलो नसल्याचं आम्हाला सांगितलं'. उद्या शेवटचा दिवस असल्याने अनेक युजर्स एकाचवेळी वेबसाइटवर आले असल्याने वेबसाइट डाऊन झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.