Gold Price Today: सोने @ 54 हजार! चकाकी शेअर बाजारावर भारी पडणार; दर आणखी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 08:56 AM2022-12-16T08:56:41+5:302022-12-16T09:04:38+5:30

Gold Price increase: २८ महिन्यांनंतर प्रथमच ५४ हजारांच्या पार गेले सोने, नव्या वर्षात मोठी वाढ अपेक्षित

शेअर बाजारात उच्चांक गाठल्यानंतर या आठवड्यात पडझड झाली आहे. मात्र, त्याचवेळी सोन्याला मोठी झळाळी आली आहे. सोन्याचा दर तब्बल २८ महिन्यांनंतर ५४ हजार रुपये प्रति १० ग्रॅमच्या वर पोहोचला. नव्या वर्षात सोन्याच्या दरात मोठी तेजी दिसणार असून ते ६४ हजार रुपयांच्या पुढे जाऊ शकतात, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

सूत्रांनी सांगितले की, भारतासह जगभरात महागाई कमी होत आहे. त्यामुळे डॉलर घसरत आहे. त्याचसोबत रुपयाही घसरला आहे. सोने खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. याचा परिणाम म्हणून सोन्याचा भाव वाढत आहे.

जगभरातील मध्यवर्ती बॅंकांनी माेठ्या प्रमाणात साेने खरेदी केले आहे. या वर्षी तब्बल ४०० टन साेने खरेदी या बॅंकांनी केली आहे. त्यात चीनने नाेव्हेंबरमध्येच सर्वधिक ३२ टन साेने खरेदी केले. अनेक देश साेन्याचा साठा वाढवित आहे. त्यामुळे साेन्याचे दर वाढले आहेत. गेल्या तिमाहीत भारतानेही सुमारे १६ टन साेनेखरेदी केले.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ६३ हजारांवर पोहोचला होता. त्यानंतर त्या करेक्शन आले असून गुरुवारी बाजार ८७८ अंकांनी कोसळला.

शेअर बाजारात पडझड होत असते त्यावेळी लोकांचा सोने खरेदीकडे कल असतो. याशिवाय लग्नाचा हंगाम असल्यामुळे सध्या सोन्याची मागणीही वाढली आहे.

५५,५१५ रुपये सोने प्रति १० ग्रॅम १० ऑगस्ट २०२० रोजी झाले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी ते घसरून ५३,९५१ रुपयांवर आले होते. त्यानंतर सोने ५४ हजार रुपयांच्या खालीच राहिले.

‘बॉन्ड किंग’च्या नावाने प्रसिद्ध असलेले गुंतवणूकदार जेफरी गुंडलाच यांनी सांगितले की, जागतिक बाजारात मागील २०० दिवसांत सोने १,८२१ डॉलर प्रतिऔंस या टप्प्यातच खाली-वर होत होते. हा टप्पा या सप्ताहात प्रथमच ओलांडला गेला आहे. त्यामुळे सोने आणखी महागणार, असे संकेत मिळत आहेत.

केडिया ॲडव्हाजरीचे संचालक अजय केडिया यांनी सांगितले की, २०२३ मध्ये ते ६४ हजार रुपयांच्या वर पोहोचेल. कोरोनाच्या पहिल्या साथीच्या काळात ऑगस्ट २०२० मध्ये सोने ५६,२०० रुपये प्रति १० ग्रॅम झाले होते. हा सोन्याचा सार्वकालिक उच्चांक होता. बुधवारी सोने या उच्चांकाच्या जवळ आले.

‘इंडिया बुलियन ॲण्ड ज्वेलर्स असोसिएशन’ची माहिती : बुधवारी २४ कॅरेट सोन्याचा दर ५४,४६२ रुपये प्रति १० ग्रॅम राहिला. या महिन्यात फक्त २ आठवड्यांत सोने १,३४२ रुपयांनी महाग झाले आहे. गुरुवारी त्यात १५२ रुपयांची घट नाेंदविण्यात आली. चांदीचे दरही २७८ रुपयांनी घटले

टॅग्स :सोनंGold