Narendra Modi Speech On Budget 2022: गेल्या ७ वर्षांत तीन कोटी लोकांना लक्षाधीश केले; मोदींचा दावा कितपत खरा? जाणून घ्या भाषणातील ठळक मुद्दे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 12:40 PM2022-02-02T12:40:49+5:302022-02-02T12:45:05+5:30

Narendra Modi Speech On Budget 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अर्थसंकल्पावर मोठे दावे केले आहेत. भाजपाने मोदींना अर्थसंकल्पावरील चर्चेचे निमंत्रण दिले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अर्थसंकल्पावर मोठे दावे केले आहेत. अर्थ जगतात लोक कालच्या अर्थसंकल्पाची स्तुती करत आहेत. देशाचे भविष्य घडविणारा अर्थसंकल्प असल्याचे म्हणत आहेत. या बजेटचे उद्दिष्ट हे गरीब, तरुण आणि मध्यम वर्गीयांना मूलभूत जीवन आणि स्थायी संसाधनांशी जोडणे हा असल्याचे मोदी यांनी म्हटले.

गरीबाचे घर बनविण्याचे स्वप्न असते. यंदाच्या बजेटमध्ये ८० लाख पक्की घरे बांधली जातील. यासाठी ५० हजार कोटी रुपये खर्च होतील. जेव्हा मी लहान होतो, तेव्हा लखपती होणे खूप मोठी गोष्ट वाटत होती. हे वेगळेच जग असल्याचे वाटत होते. मात्र, आम्ही गेल्या ७ वर्षांत ३ कोटी लोकांना लखपती बनविले आहे, असे मोदी म्हणाले.

गेल्या सात वर्षांत आवास योजनेतून जेवढी घरे बांधली गेली, त्याचा हिशेब पकडला तर हे तीन कोटी लोक लक्षाधीश बनले आहेत. पूर्वीच्या तुलनेत आपल्या सरकारने या घरांसाठीची रक्कमही वाढवली आहे आणि मुलांना अभ्यासासाठी जागा मिळावी म्हणून त्यांचा आकारही वाढवला आहे. यातील बहुतांश घरे ही महिलांच्या नावावर आहेत, असे मोदी यांनी सांगितले.

पीएम मोदी म्हणाले की, सात ते आठ वर्षांपूर्वी भारताचा जीडीपी 1.10 लाख कोटी रुपये होता. आज ते सुमारे २.३० लाख कोटी रुपये आहे. त्याचप्रमाणे 2013-14 मध्ये भारताची निर्यात 2,85,000 हजार कोटी रुपयांची होती, तर आज भारताची निर्यात 4,70,000 हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

देशाचा परकीय चलन साठा $275 अब्ज होता. आज देशाचा परकीय चलनाचा साठा $630 अब्जांच्या पुढे गेला आहे. २०१३ मध्ये देशात ३६ अब्ज डॉलरची एफडीआय गुंतवणूक होती. गेल्या वर्षी तो $80 अब्ज पार केला.

व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रमाचे उद्दिष्ट देशाच्या सीमावर्ती गावांना पर्यटन केंद्र बनवणे आहे. या सीमावर्ती गावांच्या नजीकच्या शाळांमध्येही एनसीसी कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे, जेणेकरून भविष्यात ते सैन्यात भरती होऊन देशाच्या सुरक्षेसाठी काम करू शकतील.

जेव्हा गरिबांना मूलभूत सुविधा मिळतात, तेव्हा ते आपली ऊर्जा देशाच्या विकासासाठी वापरतात, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. या अर्थसंकल्पाचा उद्देश गरीब, तरुण आणि मध्यमवर्गाला मूलभूत जीवनाशी आणि उत्पन्नाच्या कायमस्वरूपी साधनांशी जोडणे हा आहे.

पाणी हे जीवन आहे, हे ऐकायला बरं वाटतं, पण पाण्याची समस्या ही गरीब, महिला आणि शेतकऱ्यांची सर्वात मोठी समस्या आहे. सध्या आपल्या देशातील जवळपास 9 कोटी घरांमध्ये नळाचे पाणी पोहोचू लागले आहे. यापैकी गेल्या दोन वर्षात हर घर जल मिशन अंतर्गत ५ कोटी कनेक्शन देण्यात आले आहेत. यावर्षी सुमारे 4 कोटी ग्रामीण कुटुंबांना पाईपद्वारे नळ जोडणी दिली जाणार आहे.