Munawar Faruqui : "७५ हजारांचे इंजेक्शन्स अन् खिशात फक्त ७०० रुपये"; लेकाच्या उपचारासाठी मुनव्वरकडे नव्हते पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 12:42 PM2024-12-10T12:42:36+5:302024-12-10T13:04:50+5:30

Munawar Faruqui : कॉमेडियनने सांगितलं की, जेव्हा त्याचा मुलगा मिखेल दीड वर्षांचा होता तेव्हा त्याला एक दुर्मिळ आजार झाल्याचं निदान झालं

बिग बॉस १७ चा विजेता मुनव्वर फारुकी हा अत्यंत लोकप्रिय आहे. त्याचे असंख्य चाहते आहेत. पण त्याच्या आयुष्यात अशी एक इमोशनल फेज होती जी त्याने सर्वांपासून लपवून ठेवली होती.

एका पॉडकास्टमध्ये, कॉमेडियनने सांगितलं की, जेव्हा त्याचा मुलगा मिखेल दीड वर्षांचा होता तेव्हा त्याला एक दुर्मिळ आजार झाल्याचं निदान झालं. Kawasaki असं या आजाराचं नाव होतं.

मुनव्वरकडे तेव्हा उपचारासाठी पैसे नव्हते. त्याच्या खिशात फक्त ७०० रुपये होते, पण त्याला त्याच्या मुलासाठी जी तीन इंजेक्शन्स घ्यायची होती त्यांची किंमत ७५ हजार रुपये होती.

मुनव्वरच्या म्हणण्यानुसार, मुलाला ज्या आजाराने ग्रासलं होतं त्यामध्ये रक्तवाहिनीला सूज येते. हृदयाचं नुकसान होण्याचा धोका आहे. सर्व परिस्थिती जाणून घेतल्यावर तो खूप घाबरला.

"मुलगा दीड वर्षांचा असताना आजारी पडला. २-३ दिवस बरा झाला नाही. जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा कावासाकी या आजाराचं निदान झालं."

"तीन इंजेक्शन विकत घ्यावे लागले. यातील एकाची किंमत २५ हजार होती. मला ७५ हजार रुपये हवे होते पण माझ्या पाकिटात फक्त ७०० रुपये शिल्लक होते. मला लोकांकडून पैसे उसने मागावे लागले."

"पैसे गोळा करण्यासाठी मी मुंबईत आलो आणि ३ तासांत परतलो. त्या दिवसानंतर मी ठरवलं की, मी आयुष्यात कधीही आर्थिकदृष्ट्या कमकुवत होणार नाही."

"मी डॉक्टरांना हसताना पाहिलं आणि आश्वासन दिलं की, मी पैसे आणेन, पण मी बाहेर आलो आणि ४० मिनिटं सुन्न झालो. काहीच विचार करू शकत नव्हतो." असं मुनव्वरने म्हटलं आहे.

मिखेल हा मुनव्वर फारुकीचा पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा आहे. बिग बॉस १७ नंतर कॉमेडियनने मेकअप आर्टिस्ट महजबीन कोटवालासोबत लग्न केलं आहे.