शरीर फिट अन् फाइन ठेवण्यासाठी 'हे' ड्राय फ्रुट्स करतात मदत; आहारात करा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 03:40 PM2019-10-20T15:40:21+5:302019-10-20T15:48:23+5:30

सणासुदीच्या काळात हल्ली अनेक लोक एकमेकांना मिठाईऐवजी ड्राय फ्रुट्स भेट म्हणून देतात. ड्राय फ्रुट्स खाण्यासाठी जेवढे चविष्ट असतात. तेवढेच ते आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात. तसं पाहायला गेलं तर हिवाळ्याला सुरुवात होणार आहे. यादरम्यान, तुम्हाला बदाम, पिस्ता, काजू, अक्रोड यांसारखे पदार्थ खाणं फायदेशीर ठरतं. आज आपण जाणून घेऊया ड्राय फ्रुट्समुळे शरीराला होणाऱ्या आरोग्यदायी फायद्यांबाबत...

लहानग्यांपासून अगदी थोरामोठ्यांना काजू आवडतात. थोडासा गोड असणाऱ्या काजूमध्ये व्हिटॅमिन-ई मुबलक प्रमाणात असतं. तज्ज्ञांच्या म्हणणेनुसार, काजूमध्ये अॅन्टी-एजिंग तत्व आढळून येतात. जे आपल्या आरोग्यासोबतच त्वचेसाठीही फायदेशीर ठरतं. काजूच्या सेवनाने तुमची त्वचा ग्लो करते. तसेच वाढत्या वयाची लक्षणंही कमी होतात.

बदाम आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. पोषक तत्वांचा खजिना म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. सकाळी उठल्यानंतर 4 ते 5 बदाम खाल्याने आपलं शरीर अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकतं.

मनुके कॅल्शिअम आणि फायबरचा उत्तम स्त्रोत असतात. याचं दररोज सेवन केल्याने हाडं मजबुत होण्यासाठी मदत होते. तसेच शरीरामध्ये रक्ताची कमतरता भासत नाही. याव्यतिरिक्त मनुके खाल्याने किडनीचं आरोग्य राखण्यासोबतच एनिमिया, दातांच्या समस्या इत्यादी रोग दूर होतात. यामध्ये ग्लुकोज आणि फ्रक्टोज आढळून येतात. ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते.

पिस्ता आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. यामध्ये मॅग्नेशिअम, कॉपर, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन बी यांसारखी तत्व मुबलक प्रमाणात असतात. पिस्ता शरीरासाठी कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतो.

अक्रोडचा आकार जर तुम्ही नीट पाहिला असेल तर तो मानवाच्या मेंदूप्रमाणे दिसतो. ्क्रोड आपल्या मेंदूचं आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर ठरतं.

मखाना खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मखाना तणाव कमी करण्यासोबतच झोपेसाठीही फायदेशीर ठरतो. रात्री झोपण्यापूर्वी दूधासोबत मखान्याचं सेवन केल्याने झोपेच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते.

ड्राय फ्रुट्स आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. त्यामुळे थंडीमध्ये ड्रायफ्रुट्स खाल्याने आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. जर तुम्ही हाय बीपी किंवा इतर आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त असाल तर ड्राय फ्रुट्स खाण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)