कोरोना व्हायरसची 'या' पुस्तकातून 40 वर्षांपूर्वी करण्यात आली होती भविष्यवाणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 02:20 PM2020-02-18T14:20:37+5:302020-02-18T14:27:26+5:30

चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. चीनशिवाय अन्य देशांत तीस ठिकाणी कोरोनाची साथ पसरली आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये बळी गेलेल्यांची संख्या 1770 वर पोहोचली आहे.

विशेष म्हणजे, कोरोना व्हायरससंबंधी एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या व्हायरसमुळे 1981 मध्ये प्रकाशित झालेली कादंबरी पुन्हा एकदा 40 वर्षानंतर चर्चेत आली आहे.

‘द आय ऑफ डार्कनेस’ असे या पुस्तकाचे नाव आहे. अमेरिकन लेखक डीन कुंटज यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

या कादंबरीच्या पुस्तकात वुहान -400 या व्हायरसचा उल्लेख आढळतो. वुहान व्हायरसचा एका प्रयोग प्रयोगशाळेतून जैविक शस्त्र म्हणून तयार करण्यात आला असल्याचे येथे नमूद करण्यात आले आहे.

सोशल मीडियात या पुस्तकासंबंधीची माहिती व्हायरल होत आहे. डॅरेन प्लेमाउथ यांनी सर्वात आधी ट्विटरवर या पुस्तकाची माहिती पोस्ट केली. त्यानंतर सर्वत्र हे पुस्तक चर्चेला आले.

दरम्यान, पुस्तकात वुहानबद्दल इतक्या स्पष्टपणे लिहिलेले वाचून लोक आश्चर्यचकित होत आहेत. तर काही लोकांनी हा निव्वळ योगायोग असल्याचे म्हटले आहे.

मात्र, बर्‍याच जणांनी पुस्तकातून कोरोना व्हायरची भविष्यवाणी केल्याचे म्हटले आहे.