Lambda Variant: टेन्शन वाढलं! कोरोनाचा आणखी एक घातक व्हेरिएंट आढळला; आतापर्यंत जगातील २७ देशात पसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 11:16 AM2021-07-05T11:16:02+5:302021-07-05T11:19:50+5:30

Corona Lambda Variant: गेल्या वर्षभरापासून कोरोनानं जगावर संकट उभं केले आहे. त्यातच वेगवेगळ रूप बदलून कोरोना समोर येत असल्याने सर्व देशांची चिंता वाढली आहे.

लॅटिन अमेरिकी देश पेरूमधून कोरोना व्हायरसचा आणखी एक धोकादायक व्हेरिएंट लांब्डा मोठ्या वेगाने जगभरात पसरण्यास सुरूवात झाली आहे. आतापर्यंत २७ देशात या व्हेरिएंटचे अनेक रुग्ण सापडल्याने खळबळ माजली आहे.

कोरोनाच्या या व्हेरिएंटमध्ये असामान्य पद्धतीने म्यूटेशन झाल्याने जागतिक आरोग्य संघटनेचे लक्ष याकडे गेले आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटने जगातील वैज्ञानिकांची चिंता वाढवली आहे. याच दरम्यान अमेरिकेने म्हटलं आहे की, कोरोनामुळे ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे त्यातील ९९ टक्के लोकांनी लस घेतली नव्हती.

ब्रितानी वृत्तपत्र फाइनेंशियल टाइम्सच्या रिपोर्टनुसार, कोरोनाचा लांब्डा व्हेरिएंट म्यूटेशन आहे. या व्हेरिएंटला सुरुवातीला C 37 नाव देण्यात आलं होतं. ब्रिटेनमध्येही या व्हेरिएंटचे ६ रुग्ण आढळले आहेत. पेरूच्या मोलेक्यूलर बॉयोलॉजी डॉक्टरांनीही इशारा दिला आहे.

डॉ. पाबलो त्सूकयामा म्हणाले की, डिसेंबर महिन्यात जेव्हा या व्हेरिएंटवर डॉक्टरांचे लक्ष गेले तेव्हा २०० पैकी १ नमुना आढळत होता. परंतु मार्च महिन्यापर्यंत हा व्हेरिएंट ५० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. जूनमध्ये एकूण रुग्णांची संख्या ८० टक्क्यापर्यंत पोहचली आहे.

या आकडेवारीचा विचार केला तर कोरोना व्हायरसच्या अन्य व्हेरिएंटच्या तुलनेने लांब्डा व्हेरिएंट संक्रमण अधिक आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार पेरूमध्ये मे आणि जून महिन्यात ८२ टक्के कोरोनाचे नवे रुग्ण लांब्डा व्हेरिएंटचे आहेत. या व्हेरिएंटमध्ये मृत्यूचा दर अधिक आहे.

पेरूत लांब्डा व्हेरिएंटच्या या महामारीपासून शेजारील चिली देशही बचावला नाही. याठिकाणीही रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या व्हेरिएंटचा किती प्रभाव आहे यावर संशोधकांकडून शोध सुरू आहे. परंतु वेगाने हा व्हेरिएंट पसरत असल्याने अनेक देशांचे टेन्शन वाढलं आहे.

भारतात लांब्डा व्हेरिएंटचे अद्याप संकेत नाहीत. सध्या डेल्टा व्हेरिएंटने भारतावर जास्त परिणाम झाला आहे. आजही जगात कोरोना लस घेण्यापासून अनेक नागरिक पळ काढत आहेत. अमेरिकेने त्यांच्या देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंपैकी ९९ टक्के लोक असे आहेत ज्यांनी लस घेतली नाही असं म्हटलं आहे.

अमेरिकेतील डॉ. एंथनी फाउची म्हणाले की, हे खूप दुख:द आहे. मृत्यू झालेल्यांपैकी अनेकांचे जीव वाचू शकले असते. अमेरिकेत असे खूप नागरिक आहेत जे लस घेण्यावरून वैचारिक स्तरावर विरोध करत आहे. लसीकरण गरजेचे आहे असं त्यांनी सांगितले आहे.

देशभरात गेल्या 24 तासांत 39 हजार 796 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. याचसोबत देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 05 लाख 85 हजार 229 वर पोहचली आहे. देशात सध्या 4 लाख 82 हजार 071 कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 43 हजार 352 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच देशभरात आतापर्यंत 2 कोटी 97 लाख 00 हजार 430 जण कोरोनामुक्त झाले आहेत.