जगातील सर्वाधिक दमदार 'आजीबाई', ७१ व्या वर्षी जिममध्ये घालवतात ३ तास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 04:55 PM2021-05-04T16:55:44+5:302021-05-04T17:08:29+5:30

strongest grandmother : मॅरी या आठवड्यातून दोन वेटलिफ्टिंग सेशन्स करतात.

अमेरिकेत राहणारी 71 वर्षीय महिला आपल्या फिटनेसमुळे लोकांसाठी प्रेरणास्त्रोत बनली आहे. मॅरी डफी नावाची ही महिला आपल्या आयुष्याच्या सहाव्या दशकात आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग चॅम्पियन बनली आहे. इतकेच नाही तर त्यांनी 30 राज्ये आणि आंतरराष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

दहा वर्षांपूर्वी जिमबद्दल मॅरी खूप गंभीर झाल्या होत्या, कारण त्यांचे वजन खूप वाढले होते. त्यामुळे त्यांनी जिममध्ये जाण्याचा निर्णय घेतला, असे स्वत: मॅरी यांनी सांगितले.

याचबरोबर, त्या म्हणाल्या की, 'माझ्या छोट्याशा प्रयत्नांमुळे माझे वजन कमी झाले. यामुळे मला मोठे प्रोत्साहन मिळाले आणि मी जिमबद्दल खूप शिस्तबद्ध होऊ लागले. तसेच, मला कळले की मी जितके कठीण प्रशिक्षण घेत आहे, तितकेच मला दिवसभर चांगले वाटले'.

विशेष म्हणजे, मॅरी या लहान असतानाही जिमसाठी वेळ द्यायच्या. पण त्यांनी कधीही जीम करणे गांभीर्याने घेतले नाही. मात्र, 2007 मध्ये जेव्हा मॅरी 59 वर्षांच्या होत्या. तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. यानंतर, मॅरी यांचा बराच काळ नैराश्यात राहिला आणि यावर मात करण्यासाठी त्यांनी जीमला गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली.

आईच्या मृत्यूमुळे मॅरी यांना इतका तणाव आला की त्यांनी आयुष्यातील पुढची दोन वर्षे काहीही केले नाही. यामुळे त्यांचे वजन वाढू लागले. परंतु दोन वर्षांनंतर त्या आपल्या परिस्थितीमुळे नाराज झाल्या आणि त्यांनी आपली परिस्थिती बदलण्याचा निर्णय घेतला व जिममध्ये प्रवेश केला.

मॅरी या आठवड्यातून दोन वेटलिफ्टिंग सेशन्स करतात. याशिवाय त्या दररोज कार्डिओ आणि ताकदीचे प्रशिक्षण करतात. यानंतर मॅरी यांना वेटलिफ्टिंग आवडली आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला. त्यांनी वयाच्या 64 व्या वर्षी 2014 मध्ये पहिल्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घेतला होता.

मॅरी रोइंग मशीन आणि क्रॉस ट्रेनरवर कार्डिओ करतात. याशिवाय, मित्रांसह वेटलिफ्टिंग सेशन्स करतात. कधीकधी त्या दिवसाचे सहा-सहा तास प्रशिक्षण घेतात. दरम्यान, सामान्यत: त्या जिममध्ये आठवड्यात 20-25 तास घालवतात.

मॅरी यांना लोक सतत म्हणतात की, त्यांच्या वयाची लोक जिमला जात नाहीत. मात्र मॅरी या लोकांच्या मतांचा जास्त विचार करत नाहीत. "मला आज खूप बरं वाटत आहे. मी 40 वर्षांपेक्षा खूप चांगली तर आता 70 व्या वर्षी दिसत आहे. माझा विश्वास आहे की आपण भूतकाळ बदलू शकत नाही परंतु आपण भविष्यासाठी आपली तयारी करू शकता", असे मॅरी यांनी म्हटले आहे.