ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. 15 - बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी सिनेमा पद्मावती सिनेमाविरोधातील वाद वाढतच आहेत. कोल्हापुरातही सिनेमाच्या चित्रीकरणाला विरोध करत अज्ञातांनी सेटवर तोडफोड केली. मंगळवारी रात्री उशीरा ही घटना घडली आहे. पन्हाळगडावरील मसाई पठारवर सिनेमाचे चित्रीकरण सुरू होते. यावेळी अज्ञातांनी सेटवरील गाड्यांची तोडफोड करत जाळपोळ करण्याचाही प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पन्हाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. (भन्साळींवरील हल्ल्याचं कारण ठरलेली राणी पद्मावती नेमकी कोण होती?) यापूर्वी जयपूरमधील सिनेमाच्या सेटवर तोडफोड आणि मारहाणीचा प्रकार घडला होता. या प्रकारामुळे संजय लीला भन्साळी यांना तेथील चित्रीकरण थांबवावे लागले होते. राजपूत करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी पद्मावतीच्या सेटवर तोडफोड करून भन्साळी यांना थापड देखील मारली होती. तेराव्या शतकात तत्कालीन दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी याने चितोडगड येथील शिशमहालात राणी पद्मिनीची एक झलक पाहिली होती. यादरम्यान राणी पद्मिनीने या गडावरच जोहार केला होता. या पार्श्वभूमीवर पद्मावतीचे चित्रीकरण जयपूर येथे सुरु असताना संघटनेने तोडफोड केली. पाठोपाठ चितोडगडमधील ऐतिहासिक शिशमहालातील आरसेही फोडले होते. या घटनेचे बॉलिवूडमध्ये तीव्र पडसाद उमटले होते. समाजकंटकांविरुद्ध कठोर कारवाईची मागणीही बॉलीवूडच्या दिग्गजांनी केली होती. करणी सेनेने याआधीही हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय यांच्या ‘जोधा अकबर’ सिनेमालाही विरोध केला होता. करणी सेना स्वत:ला राजपूतांच्या हितांची रक्षक असल्याचं सांगते. करणी सेना राजस्थानमध्ये काम करते.