मुंबई, दि. 7 - पगार वेळेत मिळावा आणि तोट्यात असलेल्या बेस्टला मुंबई महापालिकेने मदत करावी, या प्रमुख मागण्यांसहीत बेस्ट कर्मचा-यांनी बेमुदत संप पुकारुन प्रवाशांना वेठीस धरले आहे. याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागत आहे. बसचा संप असल्यानं बस प्रवासी रिक्षा-टॅक्सीकडे वळले आहेत. कुर्ला येथे रिक्षावाले जवळचे भाडे घेत नाहीत. शेअर रिक्षा असल्या तरी त्यांचे प्रमाण कमी आहे. त्यात आज बेस्ट बसनं संप पुकारल्यानं प्रवासी हैराण झाले आहेत. या सर्व गोंधळात पोलीस कर्मचारी सर्वसामान्य मुंबईकरांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. जे रिक्षाचालक भाडे नाकार आहेत त्या प्रवाशांना परिसरातील पोलीस चौकीतील पोलीस कर्मचारी मदत करत आहेत. कुर्ला स्टेशन परिसरात पोलिसांनी प्रवाशांना कोणताही शांतपणे रिक्षांसाठी रांग लावण्यास आवाहन केले आहे व ते स्वतः प्रत्येकाला ओळीनं रिक्षामध्ये बसवत आहेत. प्रवाशांकडूनदेखील पोलिसांच्या सकारात्मक सहकार्य मिळत आहे. दरम्यान, दुपारी 3 वाजेपर्यंत संपावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकेर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात संपासंदर्भात चर्चा होणार आहे. वेतनप्रश्नी बैठक ठरली निष्फळबेस्ट कामगारांच्या वेतनप्रश्नी महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि बेस्ट कर्मचारी कृती समितीमध्ये महापौर निवास येथे रविवारी ( 6 ऑगस्ट ) झालेली बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे बेस्टचे सुमारे 36 हजार कामगार रविवारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे वेतनप्रश्नी महापालिका आयुक्त अजय मेहता जोपर्यंत लेखी आश्वासन देत नाहीत; तोपर्यंत बेस्ट कामगारांचा संप सुरूच राहणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. तर संपकऱ्यांवर ‘मेस्मा’अंतर्गत कारवाईचा इशारा बेस्ट प्रशासनाने दिला आहे.रविवारी रात्री उशिरा बेस्ट संपाबाबत महापौर बंगल्यावरील बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आयुक्त अजय मेहता आणि बेस्ट कर्मचारी कृती समितीचे नेते उपस्थित होते. मात्र रात्री उशिरा झालेल्या बैठकीतही संपावर काहीच तोडगा निघाला नाही. परिणामी सोमवारी संप होणार असल्याचे कामगार नेते शशांक राव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर सुरू असलेला बेस्ट उपक्रम कायमच तोट्यात आहे. महत्त्वाचे म्हणजे तोट्यातील बेस्ट मार्ग आणि कर्जाचा डोंगर असलेल्या बेस्टने यापूर्वीच महापालिकेकडे आर्थिक मदत मागितली आहे. परंतु महापालिकेनेही हात वर केल्याने बेस्ट कामगार संघटनांनी संपाचे हत्यार उपसले आहे. महापौर निवासस्थानी झालेल्या बैठकीदरम्यान विश्वनाथ महाडेश्वर यांनी बेस्ट कामगारांनी संपावर जाऊ नये, असे आवाहन केले आहे. परंतु बेस्ट कृती समितीने लेखी आश्वासनाचा आग्रह धरला आहे.‘बेस्ट’ला अनेक पर्यायसंपामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगर क्षेत्रात खासगी प्रवासी बससह स्कूल बस, कंपन्यांच्या बस आणि मालवाहक वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात येईल. टॅक्सी व आॅटोरिक्षा संघटनांना जास्तीत जास्त वाहने रस्त्यावर उतरवण्यास सांगण्यात आले आहे. ‘एसटी’लाही सेवा पुरविण्यास सांगण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाचे अतिरिक्त आयुक्त एस. बी. सहस्रबुद्धे यांनी दिली.कामगारांनी संपावर जाऊ नयेबेस्ट कामगारांनी संपावर जाऊ नये, अशी विनंती आम्ही केली आहे. मुंबईकरांवर संप लादला जाऊ नये. बेस्ट कामगारांचे प्रश्न सोडविण्याचे काम आम्ही प्रामाणिकपणे करत आहोत. यासाठी अवधी लागेल. - विश्वनाथ महाडेश्वर, महापौर, मुंबई महापालिका10 ऑगस्टला पगारबेस्टच्या सर्व कामगारांनी सोमवारी कामावर रुजू व्हावे. जुलै महिन्याचे वेतन १० ऑगस्टला दिले जाईल. तोट्यातून बाहेर पडण्यासाठी उपाय सुरू आहेत. - सुरेंद्र बागडे, महाव्यवस्थापक, बेस्टआज खरंच संप आहे का? रविवारी मध्यरात्रीच पुण्याहून मुंबईत आलो आहे. बसचा संप असल्याचे माहीत नव्हते. 30 मिनिटांहून अधिक वेळ बसची वाट पाहत होतो. वरळीला जाण्यासाठी 44 /50 क्रमांकची बसची वाट पाहत होतो. संप असल्याचे ब-याच वेळानंतर माहिती झाले त्यामुळे टॅक्सीने जाण्याशिवाय पर्याय नव्हता. - गौरव काळेबेरे, अभ्युदय नगरकाळा चौकीतील सीताराम बनसोडे यांनी सांगितले की, नेहमी प्रमाणे बसची वाट पाहत होतो. मात्र संपामुळे बस येणार नसल्याचे कळले. उपोषण सुरू असल्याचे माहिती होते. मात्र बेस्ट सेवा पूर्णतः बंद असणार, असे वाटले नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांमधून व्यक्त होत आहे. वडाळा बस डेपो आगार