स्नेहा मोरे / ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 3 - रस्त्याने चालताना कुणी आपल्याकडे पाहिलं तर एक क्षण आपण थबकतो...आपल्याला त्या ‘अनोळखी’ व्यक्तीबद्दल संशय वाटतो. त्यात कुणी आपल्याला पाहून स्माईल केल तरं त्या क्षणी बरेचदा आपल्याला त्या व्यक्तीची ओळखच आठवत नाही..पण दिल्लीतील तरुण जगभरातील रस्त्यांवर अनोळखी चेहऱ्यांमागील आनंद टिपतोय. माणसा-माणसातलं ‘अनोळखी’ नात्याचा दुरावा कमी करुन प्रत्येक चेहऱ्यावर हसू रुजवतोय. दिल्लाचा उत्कर्ष नारंग हा एका खासगी कंपनी प्रोडक्शन मॅनेजर आहे. मात्र फोटोग्राफीच्या छंदातून आपली नोकरी सांभाळत हा आगळावेगळा प्रोजेक्ट तो राबवित आहे. १ जुलै २०१६ मध्ये कॅमेऱ्याच्या डोळ्यांतून अनोळखी व्यक्तींशी नातं जोडण्यासं सुरुवात केली, आणि २०१७ मध्ये जुलै महिन्यात पहिल्या दिवशी हा प्रोजेक्ट पूर्णत्त्वास येईल. या आगळ्यावेगळ्या प्रवासाविषयी उत्कर्ष सांगतो की, या ३६५ दिवसांच्या प्रवासापैकी काही टप्पा पूर्ण झालाय, या दरम्यान खूप वेगळा अनुभव गाठीशी आलाय. म्हणजे जगभरातील विविध प्रांताची, भाषेची, धर्म-जातीची माणसं मला भेटताहेत. त्यांच आणि माझं रक्ताचं नातं नाही, पण त्या अनोळखी चेहऱ्याशी अचानक कॅमेरा संवाद साधू लागतो. अगदी काही सेंकदात ही माणसं माझ्याशी जन्मोजन्मीचं नात असल्यासारखं बोलतात आपली सुख-दु:ख शेअर करतात. त्यावेळी शाळा, कॉलेजमध्ये अगदी मार्क्स मिळवून जेवढा आनंद झाला नाही, तेवढा आनंद होतो. या प्रोजेक्टच्या मागचं खरंखुरं गुपित उलगडताना उत्कर्ष म्हणतो की, या जगात अनेक सुंदर गोष्टी आहेत.त्यांना फक्त मी शोधायची गरज आहे. तुम्हाला जे करताना समाधान मिळतयं, तो खरा आनंद...आपण कदाचित पैशांनी श्रीमंत होऊसुद्धा, पण एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणणं हीच खरी श्रीमंती. आपण टेक्नोलॉजी आणि काही भौतिक सुखांमुळे ही खरी मूल्य विसरतोय, त्या सगळ््या मूल्यांची आठवण करुन देण्यासाठी ही छोटीशी धडपड.. उत्कर्षच्या या ‘प्रोजेक्ट हॅप्पीनेस’चा प्रवास तुम्ही त्याच्यासोबत करु शकता. फेसबुकवरील त्याच्या ‘ Infinito Photography’ या पेजला भेट द्या..