शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राज्यातील २३ मतदारसंघ... ज्यांच्यावर २३ नोव्हेंबरला असेल अख्ख्या महाराष्ट्राची नजर; उलथापालथ होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 2:19 PM

1 / 24
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानानंतर आता राज्यात नक्की कोणाची सत्ता येणार, याबाबत सर्वत्र उत्सुकता आहे. २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून अटीतटीची लढत असणाऱ्या मतदारसंघांमध्ये नेमकं काय होणार, याबाबतचे तर्क-वितर्क लावले जात आहे. निवडणूक निकालावेळी राज्यातील २३ हाय व्होल्टेज मतदारसंघांवर सगळ्यांचंच बारीक लक्ष असणार आहे.
2 / 24
१. बारामती : पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बारामती विधानसभा मतदारसंघात यंदा ऐतिहासिक सामना पाहायला मिळाला. मागील अनेक वर्षांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या अजित पवारांना यावेळी त्यांचे पुतणे युगेंद्र पवार आव्हान दिलं आहे. युगेंद्र यांच्या पाठीशी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली ताकद उभी केल्याने या मतदारसंघात रंगतदार लढत झाली असून दोन्ही बाजूंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
3 / 24
२. आंबेगाव : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव हा मतदारसंघही यंदा चर्चेत राहिला. आंबेगावमधून सलग सात वेळा आमदार म्हणून निवडून येत असलेल्या दिलीप वळसे पाटील यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीकडून वळसे यांचेच एकेकाळचे शिष्य देवदत्ता निकम हे मैदानात आहेत. या मतदारसंघात शरद पवार यांनी सभा घेऊन वळसे पाटलांना पराभूत करण्याचं आवाहन केलं असून या आवाहनाला आंबेगांवकर प्रतिसाद देतात की पुन्हा दिलीप वळसे पाटलांच्याच पाठीशी उभे राहतात, हे पाहावं लागेल.
4 / 24
३. इंदापूर : बारामतीच्या शेजारीच असलेल्या इंदापूरमध्ये यंदा राजकीय उलथापालथ झाली. राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी पक्षफुटीनंतर अजित पवार यांना साथ दिल्याने शरद पवार यांनी भाजपमध्ये असलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना आपल्याकडे खेचले. मागील १० वर्षांपासून आमदार असलेल्या दत्तात्रय भरणे यांना अनुभवी हर्षवर्धन पाटील शह देणार का, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
5 / 24
४. पाटण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यासमोर पाटणमध्ये यंदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या हर्षद कदम आणि अपक्ष उमेदवार सत्यजीत पाटणकर यांचं आव्हान आहे.
6 / 24
५. कोरेगाव : कोरेगाव मतदारसंघात मागील निवडणुकीत शिवसेनेच्या महेश शिंदे यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शशिकांत शिंदे यांना पराभवाचा धक्का दिला. यंदाही हे दोन्ही उमेदवार आमने-सामने असून आधी २०१९ ची विधानसभा निवडणूक आणि नंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची साखळी तोडण्याचं आव्हा शशिकांत शिंदे यांच्यासमोर असणार आहे.
7 / 24
६. तासगाव-कवठे महंकाळ : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते रोहित पाटील हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. पहिल्याच निवडणुकीत त्यांच्यासमोर माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या रुपाने खडतर आव्हान आहे. त्यामुळे यंदा तासगाव-कवठे महंकाळ मतदारसंघातून कोण बाजी मारतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
8 / 24
७. इस्लामपूर : इस्लामपूर मतदारसंघात सलग ३५ वर्षे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जयंत पाटील यांचे नेतृत्व आहे. यंदा अजित पवार यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांना पक्षात घेऊन जयंत पाटलांविरोधात उमेदवारी दिली आहे. त्यामुळे इस्लामपुरात या निवडणुकीत जयंत पाटील हे आपला बालेकिल्ला शाबूत ठेवणार की निशिकांत पाटील त्यांना पराभवाचा धक्का देणार, हे पाहावं लागेल.
9 / 24
८. कागल : राष्ट्रवादीतील फुटीनंतर कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांना अजित पवार यांच्यासोबत जाणं पसंत केल्यानंतर त्यांना शह देण्यासाठी शरद पवार यांनी नव्याने मोर्चेबांधणी केली. पवारांनी भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांना पक्षात घेऊन तिकीट दिलं आहे.
10 / 24
९. कोल्हापूर उत्तर : राज्याच्या राजकारणात यंदा कोल्हापूर उत्तरची जागा चांगलीच गाजली. कारण या मतदारसंघात काँग्रेसने तिकीट दिलेल्या उमेदवाराने ऐनवेळी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे या मतदारसंघात यंदा शिंदेसेनेचे राजेश क्षीरसागर विरुद्ध अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांच्यात लढत होत आहे.
11 / 24
१०. माढा : सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघात यावेळी तिकीट वाटपावरून चांगलीच रंगत आली होती. माढ्याचे विद्यमान आमदार बबन शिंदे यांनी निवडणुकीत माघार घेत पुत्र रणजीत शिंदे यांना शरद पवारांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न केले. मात्र पवार यांनी अभिजीत पाटील यांच्यावर विश्वास दाखवला. तर अजित पवार यांनी मीनल साठे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे माढ्यात यंदा अभिजीत पाटील, मीनल साठे आणि अपक्ष उमेदवार रणजीत शिंदे यांच्यात सामना रंगला आहे.
12 / 24
११. सांगोला : सांगोल्याच्या जागेवरून महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं पाहायला मिळालं. शेकापकडून बाबासाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी दीपक आबा साळुंखे यांना तिकीट दिलं. तसंच सांगोल्याचे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लढत असल्याने सांगोल्यात तिरंगी लढत होत आहे.
13 / 24
१२. बार्शी : बार्शी विधानसभा मतदारसंगात महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप सोपल आणि विद्यमान आमदार राजाभाऊ राऊत यांच्यात अटीतटीची लढत होत आहे.
14 / 24
१३. नांदगाव : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघात महायुतीत तेढ निर्माण झाला होता. नांदगावचे शिवसेनेचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांना महायुतीने पुन्हा उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादीच्या समीर भुजबळ यांनी बंडखोरी केली आहे.
15 / 24
१४. येवला : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे अनेक वर्षांपासून येवला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र ते शरद पवार यांच्यापासून दूर झाल्यानंतर पवार यांनी या मतदारसंघात भुजबळ यांच्याविरोधात माणिकराव शिंदे यांच्या रुपाने मराठा चेहऱ्याला संधी दिली आहे. त्यामुळे येवल्यात नक्की काय निकाल लागतो, याकडे सर्वांचंच लक्ष आहे.
16 / 24
१५. काटोल : काटोल मतदारसंघातून यंदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अनिल देशमुख यांनी माघार घेत पुत्र सलील देशमुख यांना उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात भाजपनेही तुल्यबळ उमेदवार दिल्याने चुरशीची लढत होत आहे.
17 / 24
१६. कोपरी-पाचपाखाडी : ठाण्यातील या मतदारसंघातून स्वत: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निवडणूक रिंगणात असून त्यांच्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केदार दिघे यांना उमेदवार दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील निकालाची उत्सुकता आहे.
18 / 24
१७. माहीम : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरले आहेत. अमित ठाकरे यांचा सामना शिंदेसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महेश सावंत यांच्याशी होत आहे. तिरंगी लढतीत नक्की कोण बाजी मारणार, हे पाहावं लागेल.
19 / 24
१८. वरळी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आणि वरळीचे विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्यासाठी यंदाची विधानसभा निवडणूक खडतर असल्याचे बोलले जाते. कारण त्यांच्याविरोधात यंदा शिंदेसेनेकडून मिलिंद देवरा आणि मनसेकडून संदीप देशपांडे हे निवडणूक लढवत आहेत.
20 / 24
१९. परळी : बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांना आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी दिली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात निर्माण झालेल्या जातीय तणावाचा परिणाम या मतदारसंघाच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
21 / 24
२०. कर्जत जामखेड : अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची प्रतिष्ठ पणाला लागली आहे. रोहित पवार यांना याच मतदारसंघाचे १० वर्षे प्रतिनिधित्व केलेल्या राम शिंदे यांचे खडतर आव्हान आहे.
22 / 24
२१. कुडाळ : कोकणातील कुडाळ मतदारसंघात यंदा वैभव नाईक विरुद्ध नीलेश राणे असा हायव्होल्टेज सामना होणार आहे. नाईक यांनी २०१४ च्या निवडणुकीत कुडाळमधून नारायण राणे यांचा पराभव केला होता. या पराभवाचे उट्टे काढण्याचा प्रयत्न नीलेश राणे यांच्याकडून केला जाणार आहे.
23 / 24
२२. कणकवली : भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांच्याविरोधात यंदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांना उमेदवारी दिल्याने चुरस वाढली आहे.
24 / 24
२३. मानखुर्द-शिवाजीनगर : मुंबईतील या मतदारसंघात विद्यमान आमदार अबू आझमी यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी दंड थोपटले आहेत. महायुतीत शिवसेना आणि भाजपचा मलिक यांच्या उमेदवारीला विरोध असल्याने या मतदारसंघात शिंदेसेनेही उमेदवार दिला आहे. या तिरंगी लढतीत कोण विजयी होणार, हे पाहावं लागेल.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी