Join us

...म्हणून त्यानं अँटिलियाचा पत्ता विचारला; कारण समजताच पोलिसांनी डोक्यावर हात मारला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2021 10:55 AM

1 / 9
मुकेश अंबानींच्या अँटिलियाचा पत्ता विचारत असलेल्या दोघांमुळे मुंबई पोलिसांची झोप उडाली. एका टॅक्सी चालकानं दोन व्यक्तींची माहिती पोलिसांना देत संशय व्यक्त केला. त्यानंतर लगेचच अँटिलियाबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली.
2 / 9
दोन संशयास्पद व्यक्ती अँटिलियाचा पत्ता आपल्याला विचारत होत्या, अशी माहिती टॅक्सी चालकानं पोलिसांना दिली. या दोन व्यक्ती एका चंदेरी रंगाच्या वॅगनार कारमध्ये होत्या. त्यानंतर पोलिसांनी वॅगनारचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहण्यात आली. अखेर पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला.
3 / 9
टॅक्सी चालकानं दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी त्या दोन संशयास्पद व्यक्तींचा शोध सुरू केला. वाशीहून मुंबईला आलेल्या ४० वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. सुरेश विशनजी असं या व्यक्तीचं नाव आहे. सुरेश आणि त्याच्या मित्रानं अँटिलियाचा पत्ता विचारला होता.
4 / 9
पटेल यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली. पटेल यांच्याकडून अँटिलियाला कोणताही धोका नसल्याचं प्राथमिक चौकशीतून समोर आलं. अँटिलियाचा पत्ता टॅक्सी चालकाला का विचारला होता, असा प्रश्न पोलिसांनी पटेल यांना विचारला.
5 / 9
आपण मित्रांसोबत दक्षिण मुंबईत फिरायला आलो. त्याचसाठी अँटिलियाचा पत्ता विचारला होता, अशी माहिती पटेल यांनी पोलिसांना दिली. काही महिन्यांपूर्वीच अँटिलियाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार सापडली आणि मग वाझे प्रकरण घडलं. त्याचीच भीती पोलिसांना वाटत होती. मात्र सुदैवानं कालचा प्रकार तसा नव्हता.
6 / 9
सोमवारी संध्याकाळी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एका टॅक्सी चालकाचा फोन आला. कारमधून प्रवास करत असलेल्या दोन व्यक्तींनी अँटिलियाचा पत्ता विचारला. आझाद मैदान परिसरात किल्ला कोर्टाजवळ या दोन व्यक्तींनी अँटिलियाबद्दल विचारणा केली होती, अशी माहिती चालकानं पोलिसांना दिली.
7 / 9
टॅक्सी चालकाच्या फोननंतर पोलिसांच्या वेगवान हालचाली सुरू झाल्या. टॅक्सी चालकानं वॅगनारचा नंबर दिला होता. मात्र कारची नंबर प्लेट बोगसदेखील असू शकते, असादेखील संशय पोलिसांना होता.
8 / 9
वॅगनारमध्ये असलेल्या व्यक्तींकडे एक बॅग आहे. त्या व्यक्तींनी कुर्ता-पायजमा घातलेला आहे. हिंदी आणि उर्दूमध्ये ते संभाषण करत आहेत, अशी माहिती टॅक्सी चालकानं पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावले. नाकाबंदी सुरू करून गाड्यांची तपासणी सुरू केली.
9 / 9
पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून वॅगनारमधील दोघांचं स्केचदेखील तयार केलं. आझाद मैदान ते अँटिलियापर्यंत पाच ठिकाणी गाड्यांची तपासणी सुरू होती. मात्र प्राथमिक तपासातून अँटिलियाला कोणताही धोका नसल्याची माहिती समोर आली आणि पोलिसांना दिलासा मिळाला.
टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीMumbai policeमुंबई पोलीस