Join us

दसरा मेळावा तयारीच्या बैठकीवेळी शिवसेना भवनात रंगला वाद; विभागप्रमुखांनी विचारला जाब

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2022 10:06 AM

1 / 9
यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा अत्यंत खास आहे. खरी शिवसेना कुणाची असा वाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात आहे. शिंदे-ठाकरे लढाई कोर्टापासून निवडणूक आयोगापर्यंत सुरू आहे. त्यातच यावर्षी दादरच्या शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे गटाकडून तर बीकेसीतील मैदानात एकनाथ शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे.
2 / 9
दसरा मेळावा यशस्वी पार पडावा यासाठी शिंदे ठाकरे गटाकडून विशेष तयारी करण्यात येत आहे. जास्तीत जास्त गर्दी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहे. शिंदे गटाकडून १८०० विशेष बसेस बुक करण्यात आल्या आहेत. तर ठाकरे गटाकडूनही दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी जिल्हाप्रमुख, विभागप्रमुखांना आदेश देण्यात आले आहेत.
3 / 9
याच दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी शिवसेना भवन येथे बैठक घेण्यात येत होती. मात्र या बैठकीत वाद रंगल्याची जोरदार चर्चा आहे. बैठकीला उपस्थित असणाऱ्या विभागप्रमुखांनी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून जाब विचारल्याचं पुढे आले आहे. याबाबत टीव्ही ९ ने वृत्त दिले आहे.
4 / 9
रामदास कदम यांचे चिरंजीव सिद्धेश कदम अद्यापही युवासेनेच्या पदावर कसे? असा सवाल विभागप्रमुखांनी वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांना विचारला आहे. सोमवारी शिवसेना भवनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा प्रश्न विचारण्यात आला आहे. दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी ही बैठक आयोजित केली होती.
5 / 9
या बैठकीत विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस, सुधाकर सुर्वे यांनी सिद्धेश कदम यांनी हकालपट्टी का नाही? असा प्रश्न वरुण सरदेसाई, सूरज चव्हाण यांना केला. मात्र त्यावर समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. बैठकीच्या सुरुवातीला २० मिनिटे यावर चर्चा झाली. त्यानंतर हा वाद इतर वरिष्ठ नेत्यांनी मिटवला.
6 / 9
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसोबत फारकत घेतल्यानंतर शिवसेना नेत्यांपैकी रामदास कदम यांनी थेट उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करत शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. रामदास कदमांसोबत त्यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम हेदेखील शिंदेंच्या बंडात सामील झाले आहेत. शिंदे यांनी ठाकरेंविरोधात भूमिका घेतली त्यात रामदास कदमांनी उघडपणे पाठिंबा देत वैयक्तिक उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
7 / 9
उद्धव ठाकरे हे वारंवार मी बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आहे, असे सांगत असतात. अरे पण ही गोष्ट किती वेळा सांगायची. तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र आहात, याबाबत संशय आहे का? तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र नाहीत, असे आम्ही म्हटले आहे का? मग तुम्हाला हे वारंवार का सांगावे लागत आहे? तुमच्यात स्वत:मध्ये काही कर्तृत्व आहे की नाही? असा सवाल रामदास कदम यांनी केला होता.
8 / 9
त्याचसोबत उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावरही रामदास कदमांनी आरोप केला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केवळ ३ वेळा मंत्रालयात गेले. इतरवेळी मातोश्रीत लपून खोके मोजायचे तर वर्षा बंगल्यावर रश्मी ठाकरे कंत्राटदारांना भेटायच्या. माँसाहेब कधीही आयुष्यात व्यासपीठावर आल्या नाहीत. मात्र उद्धव ठाकरे जिथे जातील तिथे रश्मी ठाकरे असतात असं विधानही रामदास कदमांनी केले होते.
9 / 9
त्यामुळे रामदास कदम यांच्याबद्दल शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप आहे. त्यात त्यांचे चिरंजीव सिद्धेश कदम हे युवासेनेच्या कार्यकारणीत सदस्यांमध्ये आहेत. याच सिद्धेश कदमला पदावरून का काढले नाही असं शिवसेना भवनातील बैठकीत विभागप्रमुखांनी विचारलं आणि त्यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने वाद झाला.
टॅग्स :Shiv SenaशिवसेनाDasaraदसराRamdas Kadamरामदास कदमUddhav Thackerayउद्धव ठाकरे