Join us

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंचा ‘प्लान’ ठरला! BMCवर भगवा फडकवणारच; कामाला लागा, ‘मातोश्री’चे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 11:24 AM

1 / 12
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बैठकांचा सपाटा लावल्याचे दिसत असून, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले आहेत. मुंबईसह अन्य ठिकाणच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी बैठकांचा सपाटा लावलेला आहे. (BMC Election 2022)
2 / 12
त्यातच आदित्य ठाकरे निष्ठा यात्रा आणि शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून युवासैनिक आणि शिवसैनिकांची नव्याने मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे राज्यभरातून शिंदे गटाला प्रचंड मोठ्या प्रमाणात पाठिंबा वाढताना पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक उद्धव ठाकरेंसाठी प्रतिष्ठेची होणार असून, गेल्यावेळी अवघ्या काही जागांनी मागे राहिलेला भाजप पुन्हा एकदा जोरदार तयारीला लागला असून, मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी कंबर कसल्याचे सांगितले जात आहे.
3 / 12
सन २०१७ साली मुंबई महापालिका निवडणूक आपण भाजपविरोधात लढलो होतो आणि जिंकलो होतो, याची आठवण करुन देताना आताही मुंबई महापालिकेवर भगवा फडकवणारच, असा निर्धार व्यक्त करताना नगरसेवकांनी येत्या काळात नेमके काय काम करायचं आहे? याचा प्लॅन उद्धव ठाकरेंनी बैठकीत सांगितला.
4 / 12
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना पक्षात मोठी पडझड पाहायला मिळत आहे. तसेच भाजपसारखा तुल्यबळ प्रतिस्पर्धा समोर असल्याने शिवसेनेसमोर मुंबई महापालिका जिंकण्याचे मोठे आव्हान आहे. येत्या दोन महिन्यात मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. भाजपने मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी आशिष शेलारांच्या खांद्यावर देऊन एका अर्थाने प्रचाराचा नारळच फोडला आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेवर पुन्हा भगवा फडकविण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सेनेच्या माजी नगरसेवकांना मार्गदर्शन केले.
5 / 12
मुंबई महापालिकेच्या तयारीच्या दृष्टीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईतील शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची बैठक घेतली. जे कुणी गेले त्यांची आपल्याला पर्वा नाही, शिवसैनिक आपल्यासोबत आहेत, असे सांगत उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांना काम करत रहा, वॉर्डमध्ये फिरा असा संदेश यावेळी दिला.
6 / 12
लोकांसाठी, लोकांसोबत काम करणे हा शिवसैनिकांचा गुणधर्म आहे, त्यामुळे लोकांची कामे करा, मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेना जिंकणारच, असा आत्मविश्वास ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला. जे गेले त्यांचा विचार करू नका, मुंबई तुमच्याच जीवावर जिंकणार, असे सांगत या माजी नगरसेवकांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला.
7 / 12
एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याबाबत बोलताना कुणाच्याही अमिषाला बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी माजी नगरसेवकांना केले. उद्धव ठाकरेंनी बोलाविलेल्या या बैठकीला शिवसेनेचे १३ माजी नगरसेवक गैरहजर होते.
8 / 12
दुसरीकडे, बिहारमध्ये नितीश कुमार यांनी घेतलेल्या भूमिकेचे उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले. विरोधी पक्षांच्या आधीच मित्रपक्षांना संपवणे हे भाजपचे धोरण आहे. २०१९ मध्येच भाजपचे धोरण समजले होते. म्हणून आपण भाजपपासून वेगळे झालो, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच एकनाथ शिंदेंसोबत गेलेले आमदार खासदार निवडून येणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला.
9 / 12
दरम्यान, राज्यभरात शिवसेनेला हादरा दिल्यानंतर आता एकनाथ शिंदे गटाने मुंबईतही उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या नगरसेवकांना गळाला लावण्याची तयारी सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून खास रणनीती आखण्यात आली असून मुंबईतील प्रत्येक बंडखोर आमदारावर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवसेनेला जय महाराष्ट्र करत किती नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
10 / 12
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील प्रत्येक बंडखोर आमदाराला प्रत्येकी चार ते पाच माजी नगरसेवकांना शिंदे गटात आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुंबईतील मंगेश कुडाळकर, प्रकाश सुर्वे, यामिनी जाधव, सदा सरवणकर, दिलीप लांडे हे पाच आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले होते. एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांना 'ऑपरेशन मुंबई'ची जबाबदारी दिली आहे.
11 / 12
अनेक वर्षे मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद भुषविलेल्या खासदार राहुल शेवाळे यांच्या माध्यमातूनही शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक फोडण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. २०१७च्या निवडणुकीत पालिकेची सत्ता काबीज करण्याचा हातातोंडाशी आलेला घास अवघ्या दोन जागांनी हिरावला गेल्याने भाजपने यंदा एक वर्ष आधीपासूनच कंबर कसली आहे. निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गट मिळाल्याने भाजप या गटाचा पुरेपूर वापर करू घेणार असल्याचे सांगितले जाते आहे.
12 / 12
सेनेतील अधिकाधिक नाराज, असंतुष्ट उमेदवार, कार्यकर्ते शिंदे गटात कसे जातील, याचा प्रयत्न भाजपकडून होण्याची दाट शक्यता आहे. या असंतुष्टांचा प्रचारासाठी वापर करून घेण्याचा प्रयत्न भाजपतर्फे केला जाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जिथे भाजप उमेदवार सुस्थितीत असेल तिथे शिंदे गटात सामील झालेले सेनेतील नाराज आणि असंतुष्ट मदत करतील, तर शिंदे गटात आलेल्या आणि निवडून येण्याची खात्री असलेल्या उमेदवाराला भाजप निवडून आणण्याचा प्रयत्न करील. भाजपसाठी एकेक जागा महत्त्वाची असल्याने या प्रभागात भाजप आपला उमेदवार देणार नाही अशी रणनीती असू शकेल, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.
टॅग्स :BMC Election 2022मुंबई महानगरपालिका निवडणुक 2022Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळShiv SenaशिवसेनाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस