Join us

समृद्धी महामार्गावर RTO ला अशी ट्रक अडवता येते का?; अपघातानंतर अनेक प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 10:58 AM

1 / 12
समृद्धी महामार्गावर भरधाव वेगातील ट्रक आडविणाऱ्या परिवहन विभागाच्या (आरटीओ) दोन अधिकाऱ्यांसह ट्रक चालकाच्या विरोधात वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
2 / 12
दरम्यान, परिवहन विभागाने गुन्हा नोंदविलेल्या दोन अधिकाऱ्यांना रात्री उशिरा निलंबित केले आहे. समृद्धी महामार्गावरील वैजापूरनजिक थांबलेल्या ट्रकला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात १२ जणांचा जागीच मृत्यू झाला होता
3 / 12
आरोपींमध्ये आरटीओचे अधिकारी प्रदीपकुमार छबुराव राठोड, नितीनकुमार सिद्धार्थ गोणारकर (दोघेही सहायक मोटार वाहन निरीक्षक) यांच्यासह ट्रकचालक ब्रिजेशकुमार चंदेल यांचा समावेश आहे.
4 / 12
कमलेश मस्के (रा. नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार टेम्पो ट्रॅव्हल्स गाडीच्या पुढे १२० किलोमीटर वेग मर्यादा असलेल्या लेनमध्ये ट्रक होती. तेव्हा आरटीओच्या दोन अधिकाऱ्यांनी ट्रक चालकाला हात देऊन थांबविण्याचा प्रयत्न केला.
5 / 12
ट्रकचालकाने हलगर्जी व निष्काळजीपणे ट्रक ही १२० किमीच्या लेनवरून अचानक ८० किमीच्या वेगमर्यादा असलेल्या लेनवर घेत वेग कमी केला. त्यामुळे पाठीमागे असलेली टेम्पो ट्राव्हल्स गाडी ट्रकला पाठीमागुन धडकली. त्यात १२ जणांचा मृत्यू तर २३ जण जखमी झाले.
6 / 12
१२ जणांच्या मृत्यूस व २३ गंभीर जखमी होण्यास आरटीओचे दोन अधिकारी आणि ट्रक चालकाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे फिर्यादीत म्हटले. त्यावरून तिघांच्या विरोधात आयपीसी कलम ३०४ (२), ३०८, ३३७, ३३८, ३४ आणि ४२७ प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे.
7 / 12
आरटीओकडून चुकीच्या पद्धतीने ट्रकवर कारवाई करण्यात येत होती, चुकीच्या पद्धतीने हा ट्रक अडवल्याचं सांगण्यात येत आहे. कारण, ट्रक समृद्धी महामार्गावर ज्याठिकाणी थांबला होता, तिथं पांढऱ्या रंगातील पट्ट्या दिसून येत आहेत.
8 / 12
या पांढऱ्या रंगांच्या पट्ट्यांच्या अलिकडे रस्त्याच्या बाजुला ट्रक उभा करणे आवश्यक होते. मात्र, हा ट्रक पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यांवर, रस्त्यावरच उभा झाल्याचं दिसत आहे.
9 / 12
ट्रकच्या समोरच आरटीओ अधिकाऱ्याची गाडीही दिसून येते. त्यामुळे, आरटीओ अधिकाऱ्यानेच हा ट्रक थांबवला आणि पाठीमागून येणाऱ्या गाडीचा अपघात झाला, असे प्रथमदर्शनी दिसते आहे.
10 / 12
समृद्धी महामार्ग हा गतीमान गाड्यांसाठीचा महामार्ग आहे, त्यामुळे या महामार्गावरील गाड्यांची वेगमर्यादा लक्षात घेऊन आरटीओंनी कारवाई करायला हवी होती. मात्र, तसे न करता त्यांनी ट्रक थांबवल्याने हा भीषण अपघात झाला.
11 / 12
मुळात आरटीओ अधिकाऱ्यांना महामार्गावर अशारितीने ट्रक अडवता येतो का, त्यासाठीचीही निमयावली त्यांच्याकडून पाळली जाते का, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
12 / 12
आरटीओंनी अडवलेल्या ट्रकमधील क्लिनरने गाडीच्या गाडीची व्हिडिओ काढला होता. आता, समाजमाध्यमांतून तो व्हिडिओ समोर आला आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत.
टॅग्स :AccidentअपघातSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग