Join us

मातंग समाजातील पहिली महिला IPS, मंत्री आव्हाडांकडून भावनाचं अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2022 8:49 PM

1 / 7
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या केंद्रीय सशस्त्र दलाच्या असिस्टंट कमांडंट पदासाठीच्या परीक्षेत मीरारोडची भावना यादव हि देशात १४ वी आली असून मुलींमध्ये ती देशात पहिली आली आहे. भावना हि मुंबई पोलीस दलातील सहाय्यक फौजदार सुभाष यादव यांची कन्या आहे.
2 / 7
देशभरातील एकूण १८७ उत्तीर्ण विध्यार्थ्यांच्या यादीत मीरारोडच्या शांती विद्या नगरी समोर न्यू ओम कॉम्प्लेक्स मध्ये राहणारी २८ वर्षीय भावना सुभाष यादव हिने १४ वा क्रमांक पटकावला आहे. सदर परीक्षेत मुलीं मध्ये देशातून पहिली आली असून महाराष्ट्रातून उत्तीर्ण झालेली ती एकमेव विद्यार्थिनी आहे.
3 / 7
विशेष म्हणजे मातंग समाजातील प्रथम महिला आयपीएस होण्याचा मान भावनाला मिळाला आहे. त्याबद्दल गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन तिचे अभिनंदन केले आहे. आव्हाड यांनी भावनाचा आई-वडिलांसोबचा एक फोटो ट्विटरवरुन शेअर केला आहे. त्यामध्ये, ती मातंग समाजातील पहिली महिला आयपीएस असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच, अभिनंदनही केलंय.
4 / 7
भावना हिचे प्राथमिक शिक्षण अंधेरीच्या सेंट झेवियर्स शाळेत झाल्या नंतर यादव कुटुंबीय मीरारोड मध्ये स्थायिक झाले. त्यामुळे तिने १० वी मीरारोडच्या शांतिपार्क येथील सेंट झेवियर्स शाळेतून पूर्ण केली. पुढे महाविद्यालयीन शिक्षण तिने विरारच्या विवा महाविद्यालयातून एमएस्सी पर्यंत केले. भावना हिचे वडील सुभाष हे मुंबई पोलीस दलात सहाय्यक फौजदार असून सध्या ते बोरिवली येथील वाहतूक शाखेत कार्यरत आहेत.
5 / 7
यादव हे मूळचे सांगलीच्या खानापूर तालुक्यातील नागेवाडीचे. भावनाला सुरवाती पासूनच केंद्रीय सेवेत जायची इच्छा असल्याने २०१५ साला पासून ती यूपीएससीची परीक्षा देत होती . महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची परीक्षा ती दोन वेळा उत्तीर्ण झाली होती . परंतु मैदानी परीक्षेत तिला अपयश आले. युपीएससीच्या परीक्षेत देखील शारीरिक चाचणीत ती अपयशी ठरत होती.
6 / 7
गेल्यावेळी देखील भावना हि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची परीक्षा उत्तीर्ण झाली होती. परंतु लांब उडी मध्ये ती कमी पडली. परंतु अपयशी होऊन देखील तिने जिद्द व चिकाटी सोडली नाही . तिने तिचे प्रयत्न सुरुच ठेवले. घरातून वडील सुभाष व आई निर्मला आणि भाऊ निरंजन यांनी नेहमीच तिला प्रोत्साहन दिले . तेलंगणा मधील रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी भावना हिला सातत्याने मार्गदर्शन व मोलाचे सल्ले दिले.
7 / 7
भावनाची मैदानी आणि शारीरिक चाचणी तळेगावच्या सशस्त्र दलाच्या कॅम्प मध्ये १९ एप्रिल २०२१ रोजी झाली . दोन्ही चाचणीत ती उत्तीर्ण झाल्या नंतर २२ डिसेंबर २०२१ रोजी दिल्ली येथील मुख्यालयात तिची मुलाखत झाली होती. आता लवकरच ती हैद्राबाद येथे वर्षभराच्या प्रशिक्षणा साठी जाणार आहे .
टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगJitendra Awhadजितेंद्र आव्हाडmira roadमीरा रोडMumbaiमुंबई