Coronavirus Updates: डेल्टा प्लसमुळे राज्यात निर्बंध लागू; लॉकडाऊनबाबतही आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 11:53 IST
1 / 6डेल्टा प्लसमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील ८० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान शुक्रवारी मृत्यू झाला. डेल्टामुळे झालेला राज्यातील हा पहिलाच मृत्यू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली. डेल्टा प्लसवर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे, असे सांगतानाच राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावण्याचा सरकारचा विचार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 2 / 6डेल्टा प्लस हा विषाणू पहिल्या विषाणूपेक्षा अधिक घातक आहे. असे असले तरी नागरिकांनी घाबरून न जाता त्यावर तातडीने उपचार घ्यावेत. जेणेकरून त्याचा धोका कमी होऊ शकतो. 3 / 6आज या आजाराचे केवळ २१ रुग्ण राज्यात उपचार घेत आहेत. हा विषाणू जलदगतीने संक्रमित होतो. तो फुफ्फुसात अधिक तीव्रतेने पसरून श्वसन संस्थेवर घाला घालतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. असे असले तरी कोरोनापासून बचावासाठी जी खबरदारी आपण घेतली आहे, त्याचे अधिक पालन करणे गरजेचे असल्याचेही यावेळी बोलताना टोपे म्हणाले.4 / 6तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेचे संकेत दिले जात आहेत, त्या दृष्टीने राज्य सरकार सर्व प्रकारची काळजी घेऊन उपाययोजना आखत आहे. विशेषकरून लहान मुलांसाठी अधिकची काळजी घेतली जात असून, प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्सच्या सूचनेनुसार पावले उचलली जात आहेत, असेही टोपे यांनी नमूद केले. रत्नागिरीतील मृत महिलेची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली तरी जिल्हा प्रशासनाने माहिती दिली नव्हती. 5 / 6कोरोनासोबतच डेल्टा प्लस या विषाणूचा धोका लक्षात घेऊन राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील शंभर कोरोनाबाधितांचे सॅम्पल हे केंद्रीय प्रयोगशाळेकडे पाठविले जातात. त्यात त्या रुग्णांची सर्व हिस्ट्री राहणार असून, कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यावरही हा डेल्टा झाला आहे काय, याबाबत अहवाल मागविण्यात येत आहे. 6 / 6 डेल्टा प्लस हा विषाणू गंभीर असला तरी त्याचा फैलाव हा अद्याप तरी कासवगतीनेच सुरू आहे. त्यामुळे निर्बंध वाढविण्यात येणार नाहीत, अशी माहिती एका प्रश्नाच्या उत्तरात टोपे यांनी दिली.