Join us

Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदेंचं आज 'लाव रे तो व्हिडिओ', थेट व्हिडिओ फूटेज दाखवून मोठा गौप्यस्फोट करणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2022 4:58 PM

1 / 9
मुंबईत आज दोन दसरा मेळावे होत आहेत. शिवाजी पार्कवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मेळावा घेत आहेत. तर बीकेसीतील एमएमआरडीएच्या मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. बीकेसीच्या मैदानात शिंदे गटाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून शिंदेंचा मेळावा हायटेक मेळावा होणार असल्याचं दिसून येत आहे.
2 / 9
यासोबतच खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी मुख्यमंत्री शिंदे 'लाव रे तो व्हिडिओ'च्या माध्यमातून काही व्हिडिओ फूटेज दाखवून उद्धव ठाकरेंवर घणाघात करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
3 / 9
एकनाथ शिंदे यांनी आजच्या मेळाव्यातील भाषणाची जोरदार तयारी केली असून यासाठी काही व्हिडिओ क्लिप्स तयार करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे आपल्या भाषणात व्हिडिओच्या माध्यमातून मोठे गौप्यस्फोट करणार आहेत. त्यामुळे शिंदेंच्या भाषणाची उत्सुकता आता वाढली आहे. एकनाथ शिंदेंच्या भाषणासाठी मंचावर विशेष व्यवस्था करण्यात आली असून त्यांची अतिशय ग्रँड एन्ट्री करण्याची तयारी करण्यात आली आहे.
4 / 9
शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर बीकेसीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणाला सुरुवात होईल अशी माहिती समोर आली आहे. संध्याकाळी ६ वाजल्यापासून बीकेसीतील मेळाव्याला सुरुवात होणार असून यात १२ दिग्गजांची भाषणं होणार आहेत.
5 / 9
उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये हुरूप आणण्यासाठी गायक नंदेश उमप, अवधूत गुप्ते यांच्याकडून सांस्कृतिक गाण्याचं सादरीकरण केलं जाणार आहे. शिंदे गटाकडून एकूण १२ जणांची भाषणं होणार असून यात बंडखोरी दरम्यान गाजलेले आमदार शहाजी बापू पाटील यांचेही भाषण होणार आहे.
6 / 9
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंचावर ग्रँड एन्ट्री होईल. त्यानंतर शिंदेंच्या हस्ते ५१ फूटी तलवारीचं शस्त्रपूजन होणार आहे. शिंदे यांचं भाषण ऐकता यावं यासाठी एकूण १५ हजार स्वेअर फूटांच्या एलईडी स्क्रिन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. याच एलईडी स्क्रिनवर काही एक्सक्लूसिव्ह व्हिडिओ दाखवून एकनाथ शिंदे गौप्यस्फोट करणार आहेत.
7 / 9
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आपल्या भाषणात आणखी एक मोठा धक्का ठाकरे गटाला देणार असल्याचं बोललं जात आहे. याबाबतची नेमकी माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी एकनाथ शिंदे नेमकी कोणती घोषणा करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. शिंदेंच्या सभेसाठी एक सरप्राइज एलिमेंट असणार आहे अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
8 / 9
एकनाथ शिंदे आपल्या भाषणातून 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत ठाकरे गटावर शरसंधान करणार आहेत. तर दुसऱ्याबाजूला शिवसेनेचे आणखी दोन खासदार आणि पाच आमदार आज शिंदे गटात सामील होणार असल्याचा दावा शिंदे गटातील खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या माध्यातून ठाकरेंना एकामागोमाग एक धक्के देण्याची तयारी केल्याचं बोललं जात आहे.
9 / 9
दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांमधून निवडक ४० व्हिडिओ क्लिप काढण्यात आल्या आहेत. या व्हिडिओ क्लिप्स देखील एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात चालवण्यात येणार आहेत. तसंच स्टेजच्या मागे दोन मोठ्या क्रेन्स उभारण्यात आल्या आहेत. यांच्या सहाय्यानं होलोग्राम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा मंचावर सादर केली जाणार असल्याचीही माहिती मिळाली आहे.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे