By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 05:51 IST
1 / 5 गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी गिरगावात निघालेल्या शोभायात्रेत महिला आणि तरुणी नऊवारी साडी नेसून बाईकची सवारी करीत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या निमित्ताने नारीशक्तीने जल्लोषात माय मराठीचा जागर केला. 2 / 5स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानमार्फत आयोजित केलेल्या या शोभायात्रेत आदिशक्ती पथक आणि युवाशक्ती पथकाने बाईक रॅली काढली. त्यात ३५० पेक्षा जास्त बाइकस्वारांनी सहभाग घेतला होता. 3 / 5शोभायात्रेत तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. मराठमोळ्या पारंपरिक वेशभूषेतील महिला, सजवलेल्या बाइकवर उभारलेली प्रतीकात्मक गुढी, बाइकवर स्वार रणरागिणी आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा जयघोष यामुळे भारावून टाकणारे वातावरण तयार झाले होते. 4 / 5शोभायात्रेत सहभागी झालेल्या अनेक तरुणी आणि महिलांनी ‘गर्जूया मराठी, शिकूया मराठी,’ असे फलकही हाती घेतले होते. एका महिलेने तर महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत प्रश्न उपस्थित करणारा फलक बाईकवर झळकावला होता. तसेच काही महिला ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक नृत्य करीत होत्या, तर काही लेझीमही खेळत होत्या. शोभायात्रेतून महिलांनी केवळ परंपरेचा जागर केला नाही, तर त्यांनी समाजाला महिला सशक्तीकरणाचा संदेशही दिला. 5 / 5गुढीपाडवा रविवारी मुंबईत सर्वत्र उत्साहात साजरा झाला. त्या निमित्ताने गिरगाव, लालबाग, दादर, कुर्ला, विलेपार्ले आदी ठिकाणी नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आल्या. यावेळी लेझीम, ढोल-ताशांचे सादरीकरण, तसेच दांडपट्टा, मलखांब, तलवारबाजीचे दर्शन घडविण्यात आले. या यात्रांमध्ये लहान मुले, महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. चित्ररथांद्वारे सामाजिक संदेश देण्यात आला. शुभमुहूर्तावर सोने, वाहन, गृह, तसेच विद्युत उपकरणांचीही खरेदी करण्यात आली. (छाया : दत्ता खेडेकर, सुशील कदम)