Join us  

Sameer Wankhede: वानखेडेंना एकाकी पडू देऊ नका, मदत करा! दिल्लीतून आदेश, वरळीत बैठका सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 3:52 PM

1 / 9
क्रूझ ड्रग्ज पार्टीवर छापा टाकून शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करणारे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे सध्या अडचणीत सापडले आहेत. वानखेडेंनी केलेल्या २६ कारवायांवर मंत्री नवाब मलिक यांनी शंका उपस्थित केली. फोन टॅपिंग, बोगस कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवल्याचे आरोप मलिक यांनी केले आहेत.
2 / 9
क्रूझवरील कारवाईवेळी उपस्थित असलेल्या साक्षीदार प्रभाकर साईल यांनीदेखील वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत. आर्यन खानच्या अटकेनंतर शाहरूखकडे २५ कोटींची मागणी केल्याचं मी फोनवर ऐकलं. त्यातील ८ कोटी रुपये वानखेडेंसाठी होते, असा आरोप देऊन साईल यांनी खळबळ उडवून दिली.
3 / 9
राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक दररोज वानखेडेंवर गंभीर आरोप करत आहेत. त्यांच्याविरोधातील पुरावे समोर आणत आहेत. वानखेडे प्रशासकीय अधिकारी असल्यानं त्यांना त्यांची बाजू मांडताना मर्यादा येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून वानखेडेंचं कुटुंब त्यांच्या बाजूनं मैदानात उतरलं आहे. आता वानखेडेंना काही अदृश्य हातांची मदत मिळणार आहे.
4 / 9
वानखेडेंच्या कुटुंबाला एकाकी पडू देऊ नका, असे स्पष्ट आदेश भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील नेत्यांनी राज्यातील नेत्यांना दिले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत भाजपचे नेते वानखेडेंच्या बाजूनं ताकदीनं उभे राहू शकतात. त्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. टीव्ही९ मराठीनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
5 / 9
दिल्लीतून आदेश येताच मुंबईतील वरळीत भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांचं बैठकांचं सत्र सुरू झालं आहे. वरिष्ठ नेत्यांच्या घरी बैठका सुरू आहेत. वानखेडेंच्या बचावासाठी व्यूहरचना आखली जात आहे. त्यामुळे आता वानखेडेंवरून भाजप वि. महाविकास आघाडी असा संघर्ष पाहायला मिळू शकतो.
6 / 9
पडद्याआडून वानखेडेंना हवी ती मदत करा, सहकार्याची भूमिका घ्या, असे आदेश दिल्लीवरून आले आहेत. या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री दोनच दिवसांपूर्वी मुंबईत दाखल झाल्याचं समजतं.
7 / 9
महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्री यांच्यावर आरोप आहेत. मात्र वानखेडे प्रकरणामुळे त्यावरून लोकांचं लक्ष विचलित झालं आहे. असं होऊ देऊ नका. त्यासाठी काळजी घ्या, अशा सूचना दिल्लीतून राज्यातील भाजप नेत्यांना देण्यात आल्या आहेत.
8 / 9
समीर वानखेडेंवर गंभीर आरोप करणाऱ्या नवाब मलिक यांच्यावर आतापर्यंत भाजपच्या बड्या नेत्यांनी टीका केलेली नाही. तपास अधिकाऱ्याची जात, धर्म काढणं चूक असून नवाब मलिक यांचं दु:ख वेगळं आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आजच ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे.
9 / 9
वानखेडेंना एकाकी पडू देऊ नका, असे स्पष्ट आदेश थेट दिल्लीवरून आल्यानं आता भाजप नेमकं काय करणार याकडे लक्ष लागलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा मोदी सरकारकडून गैरवापर होत असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी अनेकदा केला आहे. वानखेडे केंद्र सरकारच्याच अखत्यारित येत असलेल्या एनसीबीमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे वानखेडेंसाठी भाजप काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
टॅग्स :Sameer Wankhedeसमीर वानखेडेNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोnawab malikनवाब मलिकBJPभाजपा