Join us

'मॅरेज सर्टिफिकेट' कसं मिळवायचं? जाणून घ्या झटपट पद्धत अगदी सोप्या शब्दांत...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 11:06 AM

1 / 10
सरकारी कामकाजांमध्ये विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक असते. अनेक अडचणींमुळे अर्जदाराला विवाह नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करता येत नाही. त्यामुळे सरकारी काम आणि दहा महिने थांब अशी अवस्था असते.
2 / 10
मुंबई महापालिकेच्या विभागीय कार्यालयांत विवाह नोंदणी प्रमाणपत्र काढण्यासाठी सुरुवात कशी करावी? त्याचे काय टप्पे आहेत? त्यासाठी कोणती कागदपत्रे जोडावी? याची माहिती जाणून घेऊया.
3 / 10
नागरी सुविधा केंद्रात दाखल झाल्यावर कस्टमर रिलेशन एक्झिक्युटिव्हकडून अर्जाची प्रत घ्यावी व अर्ज भरून द्यावा. अर्ज सादर केल्यानंतर अधिकारी मॅरेज ॲप्लिकेशन इलेक्ट्रॉनिक फॉर्म भरतील. अर्जदाराने भरून दिलेला अर्ज बघूनच हा अर्ज भरला जाईल. अधिकारी आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित छायांकित प्रती अर्जदाराकडून प्राप्त करून मूळ कागदपत्रांबरोबर पडताळणी करतील.
4 / 10
स्कॅनर उपलब्ध नसल्यास अर्ज व कागदपत्रांच्या साक्षांकित छायांकित प्रति प्राप्त करून विवाह निबंधक यांच्या कार्यालयात पाठवतील. अधिकारी माहिती भरलेल्या अर्जाची प्रिंट आऊट काढून देतील. ज्यावर मॅरेज रजिस्ट्रेशन नंबर असेल. अर्जाचे शुल्क रोख १६ रुपये घेऊन पावती दिली जाते. त्यावर विवाह निबंधकास भेटण्याचा दिनांक व वेळ असेल. अर्जात चुका असतील तर दुरुस्तीसाठी भेटण्याच्या दिवशी पुरावे घेऊन निबंधकाच्या लक्षात आणून द्याव्यात. अर्ज विवाह निबंधकांनी मंजूर केल्यावर प्रमाणपत्रात दुरुस्ती केली जाणार नाही.
5 / 10
मंजूर/रद्द/थांबविणे, अर्ज थांबविल्यास अर्जदाराला कागदपत्रांची पूर्तता करण्यास दोन दिवसांचा अवधी दिला जाईल. पूर्तता केली नाही तर अर्ज बाद होईल. नव्याने अर्ज करावा लागेल. विवाह निबंधक मूळ अर्ज व सर्व मूळ कागदपत्रांच्या एक साक्षांकित छायांकित प्रत अर्जदाराकडून प्राप्त करून निबंधक कार्यालयात जतन करतील. सॅप प्रणालीमधून विवाह नोंदणी प्रमाणपत्राची प्रत व शुल्क पावतीची प्रत काढून अर्जदारास प्रदान केली जाईल.
6 / 10
अर्जावर पुरोहित यांची स्वाक्षरी असावी. वधू-वर व तीन साक्षीदार यांचे छायाचित्र चिकटवून ठेवावे. मूळ कागदपत्रे व मूळ कागदपत्रांच्या एक साक्षांकित प्रत तयार ठेवावी. भेटण्याच्या दिवशी विवाह निबंधकांसमोर वधू-वर व तीन साक्षीदार व्यक्तिश: उपस्थित राहतील. भेटण्याच्या दिवशी अर्जदार विवाह निबंधकास पुढील बाबी सादर करतील
7 / 10
मूळ अर्ज, ज्यावर पुरोहित यांची स्वाक्षरी असेल. सोळा रुपये भरलेली पावती. मूळ कागदपत्रे व मूळ कागदपत्रांच्या एक साक्षांकित छायांकित प्रत.
8 / 10
वर व वधू यांच्या वयाचा पुरवा (कोणताही एक), शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट, जन्माचा दाखला, एसएससीचे प्रमाणपत्र, अधिवास दाखला, वर व वधू यांचा राहण्याचा पुरावा. वधूच्या लग्नाअगोदरचा राहण्याचा पुरावा. (कोणताही एक) रेशन कार्ड, इलेक्शन कार्ड, पासपोर्ट, लाईट बिल, टेलिफोन बिल.
9 / 10
तीन साक्षीदारांचे रहिवास पुरावे (कोणताही एक) , रेशन कार्ड, इलेक्शन कार्ड, पासपोर्ट. लग्नपत्रिका : लग्नपत्रिका नसल्यास १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर जॉइंट डिक्लेरेशन. 
10 / 10
वर व वधू यांचे पासपोर्ट साईज तीन फोटो. तीनही साक्षीदारांचे प्रत्येकी एक फोटो. विवाह संपन्न करणाऱ्या पुरोहिताची स्वाक्षरी आवश्यक आहे. वर व वधू आणि तीन साक्षीदार यांच्या स्वाक्षऱ्या विवाह निबंधकासमोर एकाच वेळी व्यक्तिश: उपस्थित राहून स्वाक्षऱ्या करणे आवश्यक आहे. (सूचना : मुंबईत विवाह नोंदणीसाठी ही प्रक्रिया आहे. महानगर प्रदेशात साधारणपणे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अशा प्रकारेच प्रक्रियेचे पालन केले जाते. कागदपत्रांंबाबत काही बदल असू शकतात. त्यामुळे विवाह नोंदणी करू इच्छिणाऱ्यांनी स्थानिक कार्यालयातून आवश्यक कागदपत्रांबाबत खात्री करून घ्यावी.)
टॅग्स :marriageलग्न