Join us

राज्य कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस रकमेत मोठी वाढ; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 1:25 PM

1 / 9
छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा (पुरुष व महिला) या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील बक्षिसांच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबाबतची घोषणा केली आहे.
2 / 9
या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाच्या रुपये दीड लाख पारितोषिकाची रक्कम आता रुपये पाच लाख, दुसऱ्या क्रमांकाच्या रुपये एक लाख पारितोषिकाची रक्कम रुपये तीन लाख आणि तृतीय क्रमांकाच्या रुपये 75 हजार पारितोषिकाची रक्कम रुपये दोन लाख देण्यात येणार आहे.
3 / 9
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन तसेच ठाणे महानगरपालिका ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा (पुरुष व महिला) सन 2023-24, ठाणे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं.
4 / 9
स्पर्धेचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. या स्पर्धेत एकूण सोळा मुलांचे व सोळा मुलींचे संघ सहभागी झाले आहेत.
5 / 9
आपल्या भाषणाच्या सुरुवातीस मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्री स्व.मनोहर जोशी यांना आदरांजली वाहत स्व.मनोहर जोशी यांनी पंचवीस वर्षांपूर्वी या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली, बुवा साळवी यांचेही यासाठी अमूल्य योगदान होते, या आठवणींना उजाळा दिला.
6 / 9
ते पुढे म्हणाले, आपल्या मातीतला खेळ जगभर पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. आपल्या खेळाडूंनी राज्याचा आणि देशाचा नावलौकिक जगभरात वाढविला आहे, याचा अभिमान आहे.
7 / 9
राज्यातील खेळाडू गुणवान आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने त्यांच्या बक्षिसांच्या रक्कमेत भरघोस वाढ केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या देशातील खेळाडूंना आणि युवकांना खेलो इंडिया, फिट इंडिया च्या माध्यमातून विविध संधी उपलब्ध करून दिल्या आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
8 / 9
राज्य शासनाने या स्पर्धेसाठी 75 लाख रुपये तर ठाणे महानगरपालिकेने 1 कोटी 11 लाख रुपये इतका निधी दिला आहे. कबड्डी खेळासाठी ठाणे महानगरपालिकेने घेतलेल्या या पुढाकाराचा इतरांनी आदर्श घ्यायला हवा.
9 / 9
मैदानी खेळांना जास्तीत जास्त वाव द्यायला, यासाठी शासनाच्यावतीने मैदानी खेळांसह पारंपारिक “क्रीडा महाकुंभ” भरविण्यात येणार आहे. खेळाडूंनी खेळाचे उत्तम प्रदर्शन करुन खेळाच्या माध्यमातून देशाचा आणि राज्याचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीEknath Shindeएकनाथ शिंदेKabaddiकबड्डी