Join us

'उद्धव ठाकरे पंतप्रधान झाल्यास चांगली गोष्ट आहे'; शिंदे गटातील मंत्र्याच्या विधानाची रंगली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 5:02 PM

1 / 6
सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आतापासूनच कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये भाजप सर्वांत पुढे असून, अनेक केंद्रीय मंत्री कामाला लागले आहे. यातच शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष पुढच्या टप्प्यावर जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले असून, हे भाजपचे षड्यंत्र असल्याचा आरोप केला जात आहे.
2 / 6
शिवसेनेचे चिन्ह गोठवल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजपला तगडी टक्कर देऊन शह देण्यासाठी आधीच सर्व विरोधक एकत्रित येण्यासाठी विशेष रणनीति आखत आहेत. त्यात आता शिवसेनाही सहभागी होणार असून, उद्धव ठाकरे यांना आता राष्ट्रीय पातळीवरील विरोधकांपैकी एक प्रमुख नेते बनवण्याबाबत मातोश्रीवरून हालचाली सुरू झाल्याचे बोलले जात आहे.
3 / 6
मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरेंना देश पातळीवर शरद पवार, ममता बॅनर्जी, नितीशकुमार आणि अखिलेश यादव या नेत्यांच्या रांगेत नेऊन बसवण्याविषयी रणनीति आखली जात आहे. उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातील जनतेची मोठ्या प्रमाणावर सहानुभूती मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या सर्व चर्चांवर आता शिंदे गटातील मंत्र्याने प्रतिक्रिया दिली आहे.
4 / 6
उद्धव ठाकरे जर पंतप्रधान झाले, तर चांगलं आहे. मराठी माणसाला पंतप्रधान पद मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे, असं शिंदे गटातील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. अब्दुल सत्तारांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. तसेच आमच्याकडे कार्यकर्त्यांची ताकद जास्त आहे. यामुळे निवडणुकीत आमचाच विजय होणार असल्याचा दावाही अब्दुल सत्तार यांनी केला आहे.
5 / 6
दरम्यान, धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. चिन्ह आणि नाव नसल्याने फरक पडत नाही. बाळासाहेबांचे विचार आणि दृष्टीकोन घेऊन आपण पुढे चालत राहू. ही आपली शेवटची आरपारची लढाई आहे. ही लढाई आपण जिंकलो तर जगातील कुठलीही शक्ती आपले वाकडे करू शकणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
6 / 6
धनुष्यबाण गोठवल्यानंतर शिवसेनेने त्रिशुळ, उगवता सूर्य आणि मशाल असे तीन पर्याय निवडणूक आयोगासमोर ठेवले आहेत. तर दुसरीकडे तलवार, गदा आणि तुतारी हे तीन पर्याय शिंदे गटाकडून देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. यावर लवकरच निवडणूक आयोग निर्णय घेणार असून, अवघ्या देशाचे लक्ष याकडे लागले आहे.
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेAbdul Sattarअब्दुल सत्तार