Join us

Mumbai Local: केवळ लसींचे दोन डोस नाही, तर मुंबई लोकल प्रवासासाठी ‘या’ अटीही पूर्ण कराव्या लागणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2021 3:13 PM

1 / 12
कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नसताना तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे मुंबईच्या लोकल रेल्वेमध्ये सर्वसामान्यांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. (Mumbai Local)
2 / 12
कोरोनाच्या नव्या रुग्णांचा ग्राफ कमी झाल्यानंतर सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करावी, यासाठी सातत्याने सरकारकडे मागणी केली जात होती. भाजपसह अन्य पक्ष, संघटना यांनी आंदोलनेही केली.
3 / 12
अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिलासा देत १५ ऑगस्टपासून कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्याचा निर्णय रविवारी जाहीर केला.
4 / 12
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना हा निर्णय जाहीर केला. याशिवाय मॉल, हॉटेल्स याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.
5 / 12
मात्र, केवळ लसींचे दोन डोस घेतल्यानंतर लगेचच मुंबईकरांना लोकल ट्रेनमधून प्रवास करता येणार नाही. एखाद्या व्यक्तीचे दोन डोस पूर्ण झाल्यानंतर १४ दिवस आणखी थांबावे लागणार आहे. याबाबत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल (Iqbal Chahal) यांनी माहिती दिली.
6 / 12
लोकल प्रवासासाठी दोन डोस घेतलेल्यांना महापालिका किंवा राज्य सरकारकडून फोटो पास देण्यात येईल. हे एक प्रकारचे इम्युनिटी सर्टिफिकेट असेल, या फोटो पासच्या आधारावरच तुम्हाला रेल्वेचा पास मिळेल. महत्त्वाचे म्हणजे दुसरा डोस घेतला असला, तरी डोस घेऊन १४ दिवस झाल्यानंतरच ओळखपत्र दिले जाईल.
7 / 12
एका वृत्तवाहिनीशी बोलताना चहल यांनी १४ दिवसांची अट आणि राज्य सरकारकडून फोटो पास देण्यासंदर्भातील याविषयी माहिती दिली. येत्या काळात शिथील झालेल्या निर्बंधाचा लाभ घेण्यासाठी हा फोटोपास आत्यावश्यक असेल, असेही ते म्हणाले.
8 / 12
रेस्टॉरंट, जीम, मॉल अशाठिकाणी अशा पासची गरज पडेल. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर लस घेणे गरजेचे आहे. नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत मुंबईतील १८ वर्षांवरील ९० लाख लोकांचे दोन्ही डोस पूर्ण होतील, असा विश्वास आयुक्त इक्बाल चहल यांनी व्यक्त केला.
9 / 12
दरम्यान, कोरोना काळामध्ये मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्यासाठी निर्बंध टाकण्यात आले आहेत. यासंदर्भात अनेक प्रवासी संघटना तसेच नागरिकांनी वारंवार लोकल सेवा वापरण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे.
10 / 12
आपणा सर्वांना माहिती आहे की, अद्याप आपण दुसऱ्या लाटेतून देखील पूर्णपणे सावरलेलो नाही. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका देखील आहे. केंद्र सरकारने आपणास वारंवार याबाबत इशारा दिला आहे. मात्र तरीदेखील अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी काही निकष आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवाशांना लोकलचा प्रवास करण्यास आपण मान्यता देत आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी सांगितले.
11 / 12
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंच्या निर्णयाचे स्वागत केले असून यावेळी त्यांनी निर्णय जाहीर करण्याआधी रेल्वेसोबत चर्चा करायला हवी होती असे म्हटले आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
12 / 12
तसेच मुख्यमंत्र्यांनी लोकलबाबत निर्णय जाहीर करताच भाजप नेत्यांनी हे आंदोलन, संघर्षाचे यश आहे. घरात बसलेले तीनचाकी सरकार लोकल संघर्षापुढे नमले, असे म्हणत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकारMumbaiमुंबई