Join us

Maharashtra Unlock: १ ऑगस्टपासून राज्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता?; आज आदेश जारी होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 3:02 PM

1 / 9
राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असताना कोरोनाचे निर्बंध शिथिल होणार का? असा प्रश्न आता प्रत्येकजण विचारत आहे. या संदर्भात आता महत्वाची माहिती समोर आली आहे.
2 / 9
लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी टास्क फोर्सबरोबर चर्चा केल्यानंतर आज लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याचा आदेश जारी होण्याची शक्यता आहे.
3 / 9
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी २९ जुलै रोजी महत्वाची बैठक झाली. यात राज्यातील २५ जिल्ह्यांमधील लॉकडाऊन शिथिल करण्याविषयी चर्चा झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
4 / 9
राज्यातील २५ जिल्ह्यातील कोरोना वाढीचा दर कमी आहे. या २५ जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याबाबत टास्क फोर्सनेही सकारात्मक भूमिका मांडली आहे. त्यानुसार याबाबतचा आदेशही तयार आहे. केवळ या आदेशावर मुख्यमंत्र्यांची सही होणं बाकी आहे.
5 / 9
मुख्यमंत्री गुरुवारी कोल्हापूरच्या दौर्‍यावर होते. त्यामुळे या आदेशावर सही होऊ शकलेली नाही. त्यामुळे आज आदेशावर मुख्यमंत्र्यांची सही होऊन तो जारी केला जाण्याची शक्यता असून १ ऑगस्टपासून राज्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
6 / 9
मराठी वृत्तवाहिनींच्या वृत्तानूसार, राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी असलेल्या २५ जिल्ह्यातील निर्बंध शिथिल केले जाणार आहेत. यात दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी दिली जाणार आहे. तर हॉटेल, रेस्टॉरंट आणि मॉल्स ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची परवानगी दिली जाणार आहे. मात्र राज्यातील जनतेला आणि व्यापा-यांना या आदेशाची प्रतिक्षा आहे.
7 / 9
दरम्यान, दोन डोस झालेल्यांना रेल्वेनं प्रवास करता येऊ शकतं का याची चाचपणी सुरु आहे, पण तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्री रेल्वे विभागाशी चर्चा करुन निर्णय घेतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. रेल्वे संदर्भात पुढील दोनतीन दिवसात निर्णय होईल, असेही टोपे म्हणाले.
8 / 9
राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी ११ जिल्हे नेट सरासरी पेक्षा अधिक असल्याने तेथील कोणतेही निर्बंध शिथिल केले जाणार नाही. मात्र, इतर जिल्ह्यात जे निर्बंध लेव्हल ३ चे आहेत. त्यांच्यासंदर्भात आरोग्य विभागामार्फत सूचना मुख्यमंत्र्याना केल्या आहेत. जगात अनेक देशात तिसरी लाट सुरु आहे.
9 / 9
लसीकरण झालं असल्यानं मृत्यूदर कमी आहे. लसीकरण वेगाने होत आहे. अर्थचक्रही चाललं पाहिजे त्यामुळे निर्बंध शिथील होतील. राज्य तिसऱ्या लाटेसाठी तयार आहे. तिसरी लाट येऊ नये असं वाटतंय, पण आलीच तर सरकारने मुबलक तयारी करुन ठेवली आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेMumbaiमुंबईMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार