Join us

वरळीत होणार आदित्य ठाकरेंची कोंडी?, मनसेची तयारी; राज ठाकरेंनीही घातलं विशेष लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2024 4:49 PM

1 / 10
विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. त्यात राज ठाकरेंच्या मनसेनं यंदा वरळी विधानसभेत आदित्य ठाकरेंना घेरण्यास सुरुवात केली आहे. २०१९ च्या विधानसभेत आदित्य ठाकरे ६७४२७ मतांनी इथं जिंकत ठाकरे कुटुंबातील पहिलेच निवडणूक लढणारे सदस्य ठरले होते. त्यावेळी मनसेनं या मतदारसंघात उमेदवार दिला नव्हता.
2 / 10
मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वरळीत उद्धव ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांना केवळ ६७१५ मतांचे लीड मिळाले. त्यामुळे इथं उबाठा गटाची चिंता वाढली आहे. तर मनसेकडून या मतदारसंघात संदीप देशपांडे निवडणूक लढवू शकतात. त्यामुळे संदीप देशपांडे हे मागील काही काळापासून वरळीत सक्रीय झाले आहेत.
3 / 10
एकीकडे संदीप देशपांडे वरळीत लोकांच्या गाठीभेटी, विविध प्रश्न हाती घेत आहेत. तर दुसरीकडे राज ठाकरे यांनीही वरळीतील प्रश्नांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. वरळीतील बीडीडी चाळ, पोलीस वसाहती, गोमाता नगर (सहाना डेव्हलपर्स) मंदिर प्रश्न, शास्त्री नगर, महाराष्ट्र नगर, भीमनगर विजय नगर, आदर्श नगर, साईबाबा नगर, सानेगुरुजी नगर, इंदिरा नगर (ओंकार डेव्हलपर्स ), एसआरए एकत्रित पुनर्विकास, भाडेवाढ समस्या, ओसी समस्या यांच्या गैरव्यवहारांच्या या विषयांवर राज यांनी मु्ख्यमंत्र्यांना माहिती दिली.
4 / 10
राज ठाकरेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही वरळीतील प्रश्नांवर तातडीने अधिकाऱ्यांना आदेश दिलेत. वरळीतील लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी संदीप देशपांडे हे सातत्याने पुढाकार घेत आहेत. याठिकाणी मनसेनं २०१९ ला आदित्य ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढवत होते त्यामुळे उमेदवार दिला नाही.
5 / 10
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात अरविंद सावंत विजयी झाले. मात्र वरळीत त्यांना केवळ ६७१५ मतांची आघाडी मिळाली. सावंत यांना मिळालेल्या ४ मतदारसंघाच्या आघाडीत वरळीत सर्वात कमी आघाडी मिळाली. वरळीत उबाठा गटाचे २ आमदार, १ माजी महापौर हे असूनही मिळालेली आघाडी चिंतेचा विषय बनली आहे.
6 / 10
लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर मनसेनं या मतदारसंघात आदित्य ठाकरेंना घेरण्याची रणनीती आखली आहे. आता मनसे इथं स्वबळावर लढणार की महायुतीत याबाबत स्पष्टता नाही. मात्र शिंदेची शिवसेना आणि भाजपा हेदेखील वरळीत सक्रीय कार्यक्रम राबवत आहेत
7 / 10
२०१७ च्या महापालिका निवडणुकीत वरळी विधानसभेत मनसेला ३० ते ३३ हजार मते मिळाली होती. या मतदारसंघात मनसेला मानणारा वर्ग आहे. गेली ५ वर्ष आदित्य ठाकरे हे लोकांच्या संपर्कात राहिले नाहीत. मतदारसंघातील समस्या सोडवल्या नाहीत असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.
8 / 10
तर लोकसभा निवडणुकीत पक्षाला कमी आघाडी मिळाले हे आमदार सुनील शिंदे यांनी कबुल केले. वरळीतील जनता सोबत राहील हा अतिआत्मविश्वास कारणीभूत ठरला परंतु आगामी विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे पुन्हा निवडून येतील असा विश्वास आमदार सुनील शिंदेंनी व्यक्त केला.
9 / 10
त्याशिवाय कमी आघाडी मिळाली याचा अर्थ लोक आमच्यावर नाराज आहेत असं होत नाही. आमचा विरोधी उमेदवार तगडा होता. तसेच लोकसभा निवडणुकीत मोदी फॅक्टर होता. मोठमोठ्या इमारतीत राहणाऱ्यांकडून आम्हाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही असंही सुनील शिंदेंनी सांगितले.
10 / 10
दरम्यान, उद्धव ठाकरे गटाने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी एक मजबूत योजना बनवली आहे असंही आमदार सुनील शिंदे यांनी म्हटलं. येत्या ऑक्टोबर महिन्यात राज्यातील २८८ जागांसाठी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यात वरळी विधानसभेवर सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.
टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेMNSमनसेSandeep Deshpandeसंदीप देशपांडेArvind Sawantअरविंद सावंतmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे