Join us

जबरदस्त अन् शानदार! मुंबईकरांना मिळालं नवं पर्यटनस्थळ; फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2021 6:25 PM

1 / 8
माहिमच्या सौंदर्यात भर घालणारा आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने संवेदनशील असा माहिम समुद्र किनारा सुशोभिकरण प्रकल्प पूर्ण झाला असून या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या जी/उत्‍तर विभागाच्‍या वतीने माहिम समुद्र किनारी पर्यावरणपूरक असे सौंदर्यीकरण करण्‍यात आले असून मुंबईत येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांसाठी हे नवीन आकर्षण आता खुले झाले आहे.
2 / 8
जी/उत्तर विभागातील माहिम रेतीबंदरचा परिसर पूर्वी बहुतांशी अवजड वाहनांच्या अनधिकृत वाहनतळाने व्यापलेला होता. सोबत, किनाऱ्याच्या उत्तरेकडील भाग तात्पुरत्या स्वरुपाची बांधकामे, झोपड्या यामुळे बाधित होता. दक्षिणेस माहिम पोलीस वसाहतीची भिंत मोडकळीस आलेली होती. समुद्र किनाऱ्यालगत कचऱ्याचे ढीग देखील जमा होत होते. त्यातच समुद्र किनाऱ्यावर लहान-मोठ्या स्वरुपाचे गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले होते. महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने सातत्याने उपाययोजना आणि कार्यवाही करुनही या समस्या वारंवार उद्भवत होत्या.
3 / 8
सर्वात महत्त्वाचे म्हणजे किनारा संरक्षक भिंतीच्या बांधकामाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने किनाऱ्याची धूप होण्यापासून रोखण्याचे आव्हान निर्माण झाले होते. एकूणच, वारंवार उपाययोजना करुनही माहिम रेती बंदर समुद्र किनाऱ्याचे विद्रुपीकरण होत होते. या सर्व समस्यांचा विचार करता, त्यावर निर्णायक तोडगा काढण्यासाठी तसेच माहिम समुद्र किनाऱ्याचे संवर्धन करण्यासाठी माहिम समुद्रकिनारा सौंदर्यीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला.
4 / 8
सर्वप्रथम, माहिम समुद्र किनाऱ्यावरील सुशोभिकरणास बाधित होत असलेल्या ५ झोपडीधारकांना पर्यायी जागा देवून सदर झोपड्या निष्कासित करण्यात आल्या. तसेच, समुद्र किनाऱ्यालगतचा संपूर्ण कचरा तसेच नको असलेले दगड इत्यादी हटवण्यात आले. संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली.
5 / 8
यानंतर, किनाऱ्यावर पूर्वी झालेली धूप लक्षात घेता, निर्माण झालेली खोली भरुन काढण्यासाठी आणि भविष्यात धूप होवू नये, यासाठी संपूर्ण माहिम समुद्र किनाऱ्यावर तब्बल ५ फूट उंचीपर्यंत वाळू पसरविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मुंबई सागरी किनारा रस्ता (कोस्टल रोड) प्रकल्पाच्या कामातून उपलब्ध होणारी वाळू आणल्याने त्यासाठी महानगरपालिकेवर वेगळा आर्थिक भार पडलेला नाही.
6 / 8
यासोबत, समुद्र किनारा संरक्षक भिंतीची डागडुजी करण्यात आली असून या भिंतीवर माहिम परिसरासह मुंबईची सांस्कृतिक वैशिष्ट्ये दर्शविणारी ललित चित्रे रेखाटण्यात आली आहेत. समुद्र किनाऱ्याच्या सौंदर्यात भर म्हणून, तळहातामध्ये झाड जपल्याचे सुंदर असे नैसर्गिक शिल्प देखील साकारण्यात आले आहे. पर्यावरण संरक्षण व संवर्धन सुरक्षित हातांमध्ये असल्याचा संदेश यातून देण्यात आला आहे.
7 / 8
किनाऱ्यावर विविध झाडांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये वादळी हवेचा वेग कमी करण्याची क्षमता असणारे सुरु या झाडाच्या २०० रोपांची लागवड करण्यात आली आहे. सोबत, टिकोमाची ३५० आणि चाफ्याची २०० तर बांबूची ३०० रोपे लावण्यात आली आहेत. संपूर्ण सुशोभित किनाऱ्याभोवती देखील बांबूचे कुंपण लावण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर, समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या नागरिकांना व्यायाम करण्यासाठी लावण्यात आलेले व्यायामाचे साहित्य व उपकरणे इत्यादी देखील लाकडापासून बनवलेले आहे.
8 / 8
या समुद्र किनाऱ्यावर दगडाची पायवाट बनविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना किनाऱ्यावर सुलभतेने फिरता येईल. तसेच, माहिम किनारा परिसर न्याहाळता यावा, म्हणून सुमारे ३० मीटर उंचीचा निरीक्षण मनोरा उभारण्यात आला आहे. या मनोऱ्यावरुन वांद्रे-वरळी सागरी सेतूसह अरबी समुद्राचे मनोहारी दृश्य पाहता येते. एकूणच, माहिम समुद्र किनाऱ्याचे एकप्रकारे पुनरुज्जीवनच करण्यात आले असून ही कामे करताना पर्यावरण पूरक, पर्यावरण संवर्धक उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. नवीन रुप धारण केलेला संपूर्ण माहिम किनारा हा नैसर्गिक अनुभूती देणारा ठरतो आहे. जवळपास ४ कोटी रुपये खर्च करुन हे संपूर्ण सुशोभिकरण करण्यात आले आहे.
टॅग्स :tourismपर्यटनMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका