Join us

Mumbai Local: खूशखबर! मुंबईच्या सर्व लोकल आता AC लोकल होणार, तिकीट दरही घटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 5:46 PM

1 / 10
मुंबईकरांचा लोकल प्रवास आता गारेगार करण्यासाठी एक महत्त्वाची योजना आखली जात आहे. यात भारतीय रेल्वेच्या मुंबई उपनगरीय रेल्वे लाइनवर धावणाऱ्या लोकल गाड्या आता वातानुकुलीत म्हणजे AC लोकल होणार आहेत. यासाठीची योजना आखली जात आहे.
2 / 10
मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणानं मध्य आणि पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेनंतर रेल्वे बोर्डानं याबाबतचा निर्णय याआधीच घेतला आहे. एसी लोकल करण्याबाबत याआधीपासूनच विचार सुरू होता. पण आता त्यावर लवकरच अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
3 / 10
मुंबईतील चाकरमान्यांसाठी लोकल ही लाइफलाइन आहे. दररोज लाखो चाकरमानी मुंबई लोकलनं प्रवास करतात. मुंबईची लोकल संपूर्ण जगात वेग आणि सेवेसाठी प्रसिद्ध आहे.
4 / 10
देशाची आर्थिक राजधानी असल्यानं मुंबईतील लोकसंख्या देखील प्रचंड आहे. मुंबईकरांचा रोजगार लोकलवर अवलंबून आहे आणि बहुतांश मुंबईकरांच्या आयुष्यात मुंबई लोकलचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. यातच मुंबईकरांचा प्रवास आणखी आरामदायी करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडून सर्व लोकल डबे वातानुकुलीत करण्याची तयारी केली जात आहे.
5 / 10
एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार लोकल ट्रेनच्या तिकीट दरात घट होण्याची देखील शक्यता आहे. भारतीय रेल्वेनं सेमी एसी लोकल आणण्याच्या सर्व योजनांना आता पूर्णविराम दिला आहे. आता सर्व लोकल पूर्णपणे वातानुकूलीत असतील. याअंतर्गत एसी लोकलचं तिकीटही कमी केलं जाण्याची शक्यता आहे.
6 / 10
'मुंबईतील शहरी परिवहन योजनांअंतर्गत (MUTP) मुंबईतील सर्व उपनगरीय रेल्वे नेटवर्कसाठी एसी लोकल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे', असं एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि सीएमडी रवी अग्रवाल यांनी सांगितलं. समोर आलेल्या माहितीनुसार येत्या काळात २८३ एसी लोकल खरेदी केल्या जाणार आहेत. यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयानंही मंजुरी दिली आहे. दरम्यान, यासाठी नेमका किती वेळ लागेल याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
7 / 10
सध्या मुंबईतील उपनगरीय रेल्वे लाइनवर एसी लोकल धावत आहेत. पण तिकीट दर जास्त असल्यानं प्रवाशांच्या प्रतिक्रिया इतक्या चांगल्या दिसत नाहीत. एसी लोकलच्या तिकीट दरावर प्रवासांनी नाराजी बोलून दाखवली होती. एसी लोकलचा तिकीट दर सध्या फर्स्टक्लास तिकीटापेक्षा अधिक आहे.
8 / 10
उपनगरीय एसी लोकलच्या तिकीटचा आराखडा मुंबई मेट्रो क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) किंवा दिल्ली मेट्रोल रेल निगमच्या धर्तीवर आधारीत तयार केला जाणार आहे. मुंबई आणि दिल्ली मेट्रोच्या तिकीट दरा इतकाच मुंबईच्या एसी लोकलचा तिकीट दर ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
9 / 10
तिकीट दर कमी केली जाण्याची शक्यता अधिक आहे. कारण एसी लोकलचे तिकीट दर कमी केल्याशिवाय आणि फेऱ्यांमध्ये वाढ केल्याशिवाय चांगला प्रतिसाद मिळणार नाही. नुकतंच मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून एसी लोकलबाबत प्रवाशांच्या प्रतिक्रियांचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं.
10 / 10
सर्वेक्षणात प्रवाशांनी तिकीट दराचाच मुद्दा उचलून धरल्याचं आढळून आलं आहे. संबंधित सर्वेक्षण रेल्वे मंत्रालयाकडे सादर करण्यात आलं असून बहुतांश प्रवाशांनी रेल्वे तिकीट दर कमी करण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.
टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलAC localएसी लोकल