Join us

शिंदे-फडणवीस लागले कामाला! आता लक्ष्य मुंबई महापालिका; शिवसेनेसमोर दुहेरी संकट, ‘ही’ आव्हाने

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 8:46 AM

1 / 12
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नवे सरकार स्थापन होऊन महिना उलटायला आला, तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला जात आहे.
2 / 12
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांची दिल्लीत भेट झाली असून, मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब झाले आहे. लवकरच याची घोषणा करण्यात येईल, असा कयास बांधला जात आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून एकनाथ शिंदे यांनी पाच-सहा वेळा दिल्ली दौरा केल्याचे सांगितले जात आहे.
3 / 12
सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष न्यायालयाच्या निकालाकडे लागले आहे. मात्र, यातच राज्यभरातील महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटासह भाजपचे मुख्य टार्गेट मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांकडे असल्याचे सांगितले जात आहे. (bmc election 2022)
4 / 12
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेसमोर पक्ष वाचवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले असतानाच मुंबई महापालिकेच्या निवडणुका असल्याने एकीकडे पक्ष बांधणी आणि दुसरीकडे शिंदे गट आणि भाजपची झालेली हातमिळवणी असे दुहेरी आव्हानही उद्धव ठाकरेंसमोर असणार आहे. शिंदे गट, भाजप आणि शिवसेनेसाठी मुंबई महापालिकेची निवडणूक सोपी असणार नाही, अशी चर्चा आहे.
5 / 12
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता सर्वपक्षीय इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तिकीट वाटपात सर्वाधिक डोकेदुखी शिवसेनेला ठरण्याची शक्यता आहे. सेनेकडून तिकीट नाकारलेले, नाराज आणि असंतुष्ट एकनाथ शिंदे गट तसेच भाजपमध्ये जाऊन तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करतील.
6 / 12
शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराला ते त्रासदायक ठरण्याची शक्यता अधिक आहे. तसेच गेल्या दोन दशकांत झालेल्या नारायण राणे, राज ठाकरे यांच्या बंडांचा सेनेवर कोणताही परिणाम झाला नाही. बंडानंतर झालेल्या पहिल्या पालिका निवडणुकांमध्येही या नेत्यांचा करिष्मा चालला नाही.
7 / 12
या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाची जादू किती चालणार हे लवकरच समजेल. शिंदे यांची मुंबईत राजकीय ताकद नाही. मात्र सेनेत आजवर झालेल्या बंडांच्या तुलनेत तूर्त शिंदे यांचे बंड सर्वांत प्रभावशाली असल्याने त्यांना दुर्लक्षित करता येणार नाही, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
8 / 12
यंदाच्या पालिका निवडणुकीत शिवसेनेसमोर भाजप आणि शिंदे गट असे दुहेरी संकट उभे राहणार आहे. २०१७च्या निवडणुकीत पालिकेची सत्ता काबीज करण्याचा हातातोंडाशी आलेला घास अवघ्या दोन जागांनी हिरावला गेल्याने भाजपने यंदा एक वर्ष आधीपासूनच कंबर कसली आहे.
9 / 12
निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गट मिळाल्याने भाजप या गटाचा पुरेपूर वापर करू घेणार असल्याचे सांगितले जाते आहे. सेनेतील अधिकाधिक नाराज, असंतुष्ट उमेदवार, कार्यकर्ते शिंदे गटात कसे जातील, याचा प्रयत्न भाजपकडून होण्याची दाट शक्यता आहे. या असंतुष्टांचा प्रचारासाठी वापर करून घेण्याचा प्रयत्न भाजपतर्फे केला जाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
10 / 12
शिवसेना आणि शिंदे गटात सुरू असलेल्या वादात सर्वोच्च न्यायालयात काहीही निकाल लागला तरी आगामी निवडणुकीत भाजप आणि शिंदे गट एकत्र असणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
11 / 12
जिथे भाजप उमेदवार सुस्थितीत असेल तिथे शिंदे गटात सामील झालेले सेनेतील नाराज आणि असंतुष्ट मदत करतील, तर शिंदे गटात आलेल्या आणि निवडून येण्याची खात्री असलेल्या उमेदवाराला भाजप निवडून आणण्याचा प्रयत्न करील.
12 / 12
भाजपसाठी एकेक जागा महत्त्वाची असल्याने या प्रभागात भाजप आपला उमेदवार देणार नाही अशी रणनीती असू शकेल, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.
टॅग्स :BMC Election 2022मुंबई महानगरपालिका निवडणुक 2022BMC Electionsमुंबई महापालिका निवडणूक २०२२Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा