Join us

मनसेचा आवाज फडणवीसांनी अधिवेशनात उचलला; संतोष धुरी यांनी केली होती पोलखोल

By मुकेश चव्हाण | Published: March 02, 2021 2:23 PM

1 / 10
विधिमंडळाच्या अधिवेशनाला सोमवारपासून (१ मार्च) सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. अधिवेशनाच्या दूसऱ्या दिवशीदेखील विरोधकांनी राज्य सरकारला कोंडित पकडण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. वीज खंडित करण्याच्या मुद्द्यावरुन देखील आम्ही आक्रमक पवित्रा घेणार असल्याची माहिती प्रवीण दरेकर यांनी अधिवेशन सुरु होण्याच्याआधी दिली होती. यानंतर अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वीजबिल आणि वीज खंडित करण्याच्या निर्णयावरुन सभागृहात विविध प्रश्न उपस्थित केले.
2 / 10
राज्यातील वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिलं आले आहेत. त्यांच्याकडून वीजबिलांची सक्तीने वसुली केली जात आहे. यात सर्वाधिक शेतकरी भरडला जात आहे. त्याचे वीज कनेक्शन तोडण्यात येत असल्याने शेतीच्या कामांवरही संकट आलं आहे. त्यामुळे तात्काळ या विषयावर चर्चा घडवून आणावी आणि वीज कनेक्शन तोडणं थांबवावं, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. देवेंद्र फडणवीसांच्या या मागणीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील घरगुती आणि शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडले जाणार नाही, अशी ग्वाही दिली.
3 / 10
ठाकरे सरकार केवळ फेसबुक लाईव्ह करण्यात मग्न असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. सर्वसामान्य जनतेचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचत नाही. मुख्यमंत्र्यांनी आधी माझी कुटुंब माझी जबाबदारी अभियान आणलं. आता मी जबाबदार मोहीम सुरू आहे. म्हणजे सरकार स्वत: कशासाठीच जबाबदार नाही. कोरोनाचे रुग्ण वाढल्यावर खापर जनतेवर फोडायचं. इतर गोष्टींसाठी मोदी सरकारला जबाबदार धरायचं. मग राज्य सरकार नेमकं काय करतंय, असा सवालही देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला.
4 / 10
ठाकरे सरकारला कोरोना हाताळण्यात अपयश आल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारीसह केला. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ ९ टक्के लोकसंख्या आपल्या राज्यात आहे. पण देशातील एकूण कोरोना रुग्णांच्या मृत्यूंपैकी ३३ टक्के एकट्या महाराष्ट्रात आहेत.
5 / 10
देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी ४० टक्के कोरोना रुग्ण राज्यात आहेत. सक्रिय रुग्णांची संख्यादेखील मोठी आहे. सध्या राज्यात ४६ हजार कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत,' अशी आकडेवारी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितली.
6 / 10
अधिवेशनात मनसेने मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात केलेल्या पोलखोलवरुनही देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर निशाणा साधला.
7 / 10
वरळीच्या कमला मिल कंपाऊंड परिसरात असलेल्या पबमध्ये जाऊन मनसेचे नेते संतोष धुरी यांनी स्वतः लाईव्ह करून पोलखोल केली होती. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
8 / 10
मंदिरात कोरोना, शिवजयंतीत कोरोना. पण वरळीत पहाटेपर्यंत कुणाच्या आशीर्वादाने बार चालतात, तेथे कोरोना का येत नाही?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. तसेच कोरोनाच्या काळात सुद्धा भ्रष्टाचार करण्याचे काम झाले. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणे कशाला म्हणतात, याचा अर्थ सरकारने समजावून सांगितले, असा टोला देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लगावला.
9 / 10
दरम्यान, सोशल डिस्टंसिंगचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या वरळीतील युनियन रेस्टॉरंट-पबविरूद्ध महापालिकेच्या जी दक्षिण विभागाकडून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात कोविड नियमाअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
10 / 10
संबंधित पबला कारणे दाखवा नोटीस बजावली अूसन परवाना तात्पुरत्या स्वरुपात रद्द करण्यात आला आहे. सरकार आणि पालिकेने काही निर्बंध घालून लोकांसाठी सुविधा पुन्हा सुरू केल्या आहेत. मात्र, आता लोकांना या निर्बंधांचे भान राहिल्याचे दिसत नाही. त्यामुळे रेस्टॉरंट-पबमध्ये गर्दी झाली तर मालकाप्रमाणे तिथे जमणाऱ्यांविरोधातही आता कारवाई व्हायला हवी, असं मुंबई महापालिकेचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMNSमनसेBJPभाजपाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारAditya Thackreyआदित्य ठाकरेworli-acवरळी