Join us

Sachin Vaze: ...पण मी केस का डोक्यावर घेऊ?; हिरेन यांची नाराजी, वाझेंना वाटली भीती अन् काढला काटा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 1:30 PM

1 / 9
उद्योगपती मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani)) घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार उभी करण्याचा कट रचल्याप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अटकेत आहेत. त्यांच्या कोठडीत न्यायालयानं वाढ केली आहे.
2 / 9
मुकेश अंबानींच्या घराखाली २५ फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळून आली. यानंतर याच कारचे मालक मनसुख हिरेन (Mansukh Hiren Suicide Case) यांचा मृतदेह ५ मार्चला आढळून आला. हिरेन यांची हत्या वाझेंनीच केल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकानं दिली आहे.
3 / 9
मनसुख हिरेन यांची हत्या झाली, त्यावेळी वाझे तिथेच उपस्थित होते असा संशय एनआयएला आहे. त्यादृष्टीनं एनआयएनं तपासदेखील केला. त्यात काही धक्कादायक माहिती पुढे येत आहे. सचिन वाझे आता हळूहळू राष्ट्रीय तपास यंत्रणेला आपल्या कृत्याची कबुली देऊ लागला आहे. हिरेनचा मृतदेह सापडल्यानंतर त्याने आपले ५ मोबाइल नष्ट करून टाकले होते. मोबाइलमधील डाटा आणि सीडीआर तपासले गेल्यास आपले पितळ उघडे पडेल, या भीतीने हे कृत्य केल्याची कबुली त्याने दिल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच एनआयएच्या हाती आणखी एक महत्वाची माहिती हाती लागल्याचे सांगितले जात आहे.
4 / 9
अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडल्यानंतर सचिन वाझे यांनी मनसुख हिरेनला आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. मी तुला दोन-तीन दिवसांत जामिनावर बाहेर काढेन, असेही वाझे यांनी म्हटले होते. मनसुखने ही गोष्ट आपल्या पत्नीला सांगितली होती. वाझे यांनी वारंवार सांगूनही मनसुख हिरेन तयार नव्हता. आपण ही केस डोक्यावर का घ्यावी, असे म्हणत त्याने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मनसुख हिरेन घरी निघून गेले.
5 / 9
दरम्यानच्या काळात २ मार्च रोजी हे प्रकरण एसीपी नितीन अलकनुरे यांच्याकडे सोपवण्यात आले. तेव्हा नितीन अलकनुरे स्कॉर्पिओचा मालक म्हणून मनसुख हिरेनला चौकशीसाठी बोलावतील ही बाब स्पष्ट होती. नितीन अलकनुरे यांनी मनसुख हिरेनचा जबाब घेतला तर सर्व गोष्टी समोर येतील, अशी भीती सचिन वाझे यांना वाटली.
6 / 9
या सर्व प्रकरणामुळे ४ मार्चला विनायक शिंदे याने बनावट सीम वापरुन मनसुख हिरेनला फोन केला. मी पोलीस अधिकारी तावडे बोलत असल्याचे सांगत त्याने मनसुखला घोडबंदर येथे बोलवून घेतले. त्यानंतर मनसुख हिरेनची हत्या करुन त्याचा मृतदेह खाडीत फेकून देण्यात आला. मनसुख हिरेन याने एसीपी अलकनुरे यांच्यासमोर खरा जबाब नोंदवू नये म्हणूनच सचिन वाझे यांना त्याचा काटा काढावा लागला, हे स्पष्ट झाले आहे.
7 / 9
सचिन वाझे १३ मार्चपासून एनआयएच्या ताब्यात आहे. त्याच्याकडून या कटाचे सर्व गूढ उलगडून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो मोबाइलचे एकूण १३ सिमकार्ड वापरत होता. त्यासाठी त्याच्याकडे पाच हँडसेट होते. मात्र हिरेनचा मृतदेह सापडल्यानंतर त्याने पाचही मोबाइल नष्ट करून टाकले. त्यामध्ये कार्यालयातील कामासाठी, वरिष्ठांशी बोलण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मोबाइलचाही समावेश होता. सुरुवातीला तपास यंत्रणेला तो आपला मोबाइल हरविला असून ताे कुठे हरवला, हे आठवत नसल्याचे सांगत होता. मात्र आता त्याने पाचही मोबाइल स्वतःहून नष्ट करून टाकल्याची कबुली दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मोबाइलमधील डाटा मिळवण्यासाठी एनआयए प्रयत्न करत असून यासाठी काही तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.
8 / 9
एनआयएने एका हॉटेल व्यावसायिकाचा जबाब नोंदवला आहे. त्याने आपण ३ मार्चला वाझेला हफ्ता देण्यासाठी गेलो असता तेथे हिरेन, अटक कॉन्स्टेबल विनायक शिंदे आणि क्राइम ब्रांचमधील पोलीस निरीक्षक यांच्यात चर्चा सुरू असल्याचे पाहिले होते, असे सांगितले. एनआयए त्या पोलीस निरीक्षकाची चौकशी करणार आहे. याशिवाय एनआयएला एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचीही चौकशी करायची आहे. त्याने दक्षिण मुंबईतील एका व्यावसायिकाला फोन करून वाझेच्या फाइव्ह स्टार हॉटेलमधील वास्तव्यासाठी १३ लाखांचे बिल भरण्यास सांगितले होते.
9 / 9
व्यावसायिकाने एनआयएला दिलेल्या माहितीनुसार, एका सराफाने ५० ते ६० लाखांची फसवणूक केल्याची तक्रार आपण केली होती. हॉटेलचे बिल भरले तर वाझे पैसे परत मिळवण्यात मदत करेल, असे अधिकाऱ्याने आपल्याला सांगितले होते, याबाबत दोन निरीक्षक व एका वरिष्ठ अधिकाऱ्याची लवकरच चौकशी केली जाणार असल्याचे समजते.
टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेMansukh Hirenमनसुख हिरणPoliceपोलिस