Join us

Sachin Vaze: NIAने दिले भरभक्कम पुरावे; त्यानंतर सचिन वाझेंची झाली बोलती बंद, अडचणीत आता मोठी भर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 9:44 AM

1 / 11
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केलेल्या सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (sachin Vaze) यांना विशेष न्यायालयाने २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. त्याचवेळी ही स्फोटके पेरण्यामागील मास्टरमाईंड शोधण्यासाठी एनआयएने मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या गुन्हे गुप्त वार्ता (सीआययू) विभागातील अधिकाऱ्यांची कसून चौकशी सुरू केली आहे.
2 / 11
सचिन वाझे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असलेले दोन अधिकारी व दोघा वाहनचालकांची साडेनऊ तास चौकशी करण्यात आली. आणखीही काही अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. (Who is the mastermind behind the explosives? Interrogation of police officers Waze remanded in NIA custody till March 25)
3 / 11
विशेष न्यायालयाने त्यांना ११ दिवस एनआयए कोठडी सुनावली. या कालावधीत पूर्ण कटाचा छडा आणि आवश्यक पुरावे जमविण्याचे आवाहन तपास अधिकाऱ्यांसमोर आहे. रविवारी दुपारी बारा वाजल्यापासून ‘सीआययू’चे सहायक निरीक्षक रियाजुद्दीन काझी, एक उपनिरीक्षक व दोन वाहनचालकांकडे चौकशी करण्यात येत आहे.
4 / 11
सचिन वाझे यांच्या सांगण्यानुसार त्यांनी गुन्ह्याच्या कामात त्यांना सहकार्य केल्याचा अधिकाऱ्यांचा कयास आहे. त्यांच्यासह एका सहायक आयुक्त व अन्य काही पोलिसांनाही लवकरच चौकशीसाठी पाचारण केले जाणार असल्याचे समजते.
5 / 11
त्यामध्ये विक्रोळी पोलीस ठाण्यातील पोलीसदेखील चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. १८ फेब्रुवारीला त्यांनी कोणत्या कागदपत्रांच्या आधारे आणि कोणत्या पोलीस अधिकाऱ्याच्या इशाऱ्यावरून स्कॉर्पिओ चोरीचा गुन्हा दाखल केला, याची चौकशी केली जाणार आहे.
6 / 11
एका इंग्रजी दैनिकाच्या माहितीनुसार, सचिन वाझेंची चौकशी करत असताना एनआयएकडे मोठे पुरावे हाती लागल्याचे सांगण्यात येत आहे. चौकशीच्या सुरुवातीला सचिन वाझे हे एनआयएच्या अधिकाऱ्यांसमोर काहीही बोलायला तयार नव्हते.
7 / 11
मात्र, NIA च्या अधिकाऱ्यांनी एक-एक करुन पुरावे दाखवल्यानंतर सचिन वाझे यांना कोणताही पर्याय उरला नाही. त्यानंतर सचिन वाझे यांनी एनआयएच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यास सुरुवात केली.
8 / 11
एनआयएने अंबानी यांच्या घराबाहेर ठेवण्यात आलेल्या स्कॉर्पिओ गाडीवरील हाताचे ठसे परीक्षणासाठी पाठवले होते. यामध्ये गाडीवर सचिन वाझे यांच्या हाताचेही ठसे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सचिन वाझे यांच्या अडचणीत मोठी भर पडल्याचे सांगितले जाते. मात्र, सचिन वाझे यांनी अद्याप कोणताही जबाब दिलेला नाही. एनआयएच्या विशेष न्यायालयात सचिन वाझे यांच्या वकिलांनी ही माहिती दिली.
9 / 11
अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या असलेल्या स्कॉर्पिओच्या पाठीमागे पांढऱ्या रंगाची इनोव्हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होती. ही गाडी क्राईम ब्रँचच्याच वाझे कार्यरत असलेल्या गुन्हे गुप्त वार्ता (सीआययू)ची असल्याचे स्पष्ट झाले आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी रविवारी ती गाडी जप्त केली.
10 / 11
सचिन वाझे यांच्यावर ज्वालाग्राही पदार्थ बाळगणे, घातपाताचा कट रचणे आदी गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या गुन्ह्याची कलमे लवकरच लावली जातील, असे सुत्रांनी सांगितले.
11 / 11
सचिन वाझे यांनी गंभीर गुन्ह्याच्या कामात पोलीस वाहने, आपल्या अधिपत्याखालील अधिकारी, कर्मचारी आणि अन्य यंत्रणेचा सर्रास वापर केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय हे करणे शक्य नसल्याचे पोलीस वर्तुळातून सांगण्यात येते.
टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेPoliceपोलिसNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा