Join us

शिवसेनेत आतापर्यंत ५ वेळा पडली फूट; चार घटना घडल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 10:52 AM

1 / 7
गेल्या २९ वर्षांत शिवसेनेतील पाच बडे नेते पक्षाबाहेर पडले. त्यापैकी चार घटना या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत घडल्या. कुणाच्याही बंडाने ठाकरे परिवाराची शिवसेनेवरील पकड सैल झाली नाही. मात्र, यावेळी अनेक आमदारांना सोबत घेऊन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षनेतृत्वासमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
2 / 7
सामान्य कार्यकर्त्याला बळ देणारा आणि त्यांना संधी देताना जातीपातीचा विचार न करणारा पक्ष म्हणून शिवसेनेची पहिल्यापासूनच ख्याती राहिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या करिष्म्याने अनेकांना आमदारकी, खासदारकी मिळवून दिली. सामान्य घरातील कार्यकर्त्याच्या हाती सत्ता दिली. मात्र, कार्यकर्त्यांतूनच नेते झालेल्या चौघांनी, तर एकदा पुतण्याने शिवसेनेविरुद्ध बंडाचे निशाण फडकविले.
3 / 7
१९९१ साली त्यावेळी शिवसेनेत वजन असलेले छगन भुजबळ यांनी शिवसेनेची साथ सोडली.नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात भुजबळांनी ९ आमदारांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला.मनोहर जोशींना विरोधी पक्षनेतेपद दिल्यामुळे नाराज होऊन त्यांनी शिवसेना सोडली. त्याकाळी या बंडाची खूप चर्चा झाली.नंतर १९९५च्या निवडणुकीत भुजबळ पराभूत झाले आणि शिवसेना-भाजपचे सरकार आले.
4 / 7
मुंबईतील आगरी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे सेनेचे त्या काळचे शक्तिशाली नेते गणेश नाईक यांनी १९९९ मध्ये पक्षाला जय महाराष्ट्र केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी तीव्र स्वरूपाचे मतभेद झाल्यानंतर त्य़ांनी बंडाचे निशाण उभारले. त्याचवर्षीच्या विधानसभा निवडणुकीत नाईक यांचा पराभव झाला. नंतर ते राष्ट्रवादीकडून मंत्री झाले. पुढे भाजपात गेले. सध्या ते आमदार आहेत.
5 / 7
२००५ साली जुलै महिन्यात ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी शिवसेनेला धक्का दिला. २००४ च्या निवडणुकीनंतर राणे यांना डावलून उद्धव ठाकरे यांनी सर्व सूत्रे होती घेतल्यानंतर त्यांचे ठाकरेंशी मतभेद झाले. ११ समर्थक आमदारांसह बंड करीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आज ते भाजपमध्ये असून, केंद्रात मंत्री आहेत.
6 / 7
२००५ च्या अखेर राज ठाकरे यांनी शिवसेनेला रामराम ठोकला. राज व उद्धव ठाकरे यांच्यातील महत्त्वाकांक्षेच्या संघर्षातून राज यांनी बंड केले व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. आमदार बाळा नांदगावकर व इतर काही समर्थकांची साथ त्यांना मिळाली. एकेकाळी १३ आमदार निवडून आणणाऱ्या या पक्षाचा आता एकच आमदार आहे.
7 / 7
राजकीय महत्त्वाकांक्षा, डावलले जाण्याचे दु:ख, पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील नाराजी यातून एकनाथ शिंदे यांनी २१ जून २०२२ रोजी शिवसेनेला जोरदार धक्का दिला. आता ते काय करतात, याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारRaj Thackerayराज ठाकरे