smita thackeray who met cm eknath shinde was once in the shivsena party leadership race
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणाऱ्या स्मिता ठाकरेही एकेकाळी होत्या पक्ष नेतृत्वाच्या शर्यतीत! पण... By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 7:20 PM1 / 11दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र जयदेव ठाकरे यांच्या पत्नी स्मिता ठाकरे यांनी आज मुंबईत 'सह्याद्री' अतिथीगृहात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. उद्धव ठाकरेंना आव्हान देत शिवसेनेत आजवरचं सर्वात मोठं बंड करणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या भेटीला स्मिता ठाकरे पोहोचल्या आणि चर्चा सुरू होणार नाहीत हे नवलच. 2 / 11स्मिता ठाकरेंना पाहून सह्याद्री अतिथीगृहाबाहेर माध्यमांच्या प्रतिनिधींनी एकच गर्दी केली. यावेळी स्मिता ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते. राजकारण मला कळत नाही मी फक्त सदिच्छा भेटीसाठी आले होते, असं स्मिता ठाकरे म्हणाल्या. राजकारणाशी काही संबंध नसला असं स्मिता ठाकरे आज म्हणाल्या असल्या तरी शिवसेनेच्या इतिहासात स्मिता ठाकरेंचं नाव थेट नेतृत्वपदासाठी चर्चेत होतं. 3 / 11१९९९ साली शिवसेनेची सत्ता गेली आणि त्यानंतर शिवसेना पक्षात अंतर्गत दोन गट दिसू लागले होते. एक गट राज ठाकरेंना बाळासाहेबांचा उत्तराधिकारी मानत असे आणि दुसरा उद्धव ठाकरेंना. मात्र, या दोघांव्यतिरिक्त आणखी एक व्यक्ती शिवसेनेची धुरा हाती घेण्याच्या स्पर्धेत होती. ती व्यक्ती म्हणजे स्मिता ठाकरे. 4 / 11लेखक वैभव पुरंदरे यांनी 'बाळ ठाकरे अँड द राईज ऑफ द शिवसेना' या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे. स्मिता ठाकरे काहीकाळ राजकीय क्षेत्रात सक्रिय होत्या. पुढे उद्धव ठाकरे यांचं 'मातोश्री' आणि शिवसेनेत वजन वाढत गेलं. पर्यायानं स्मिता ठाकरे स्पर्धेतून बाहेर पडल्या. राज ठाकरे तर पुढे शिवसेनेतूनच बाहेर पडले आणि नवा पक्ष स्थापन केला.5 / 11स्मिता ठाकरे यांना थेट बाळासाहेबांच्या उत्तराधिकारी म्हणून पाहिलं गेलं होतं. अनेकदा त्यांचं नाव महाराष्ट्राच्या राजकारणात आणि भारताच्या चित्रपटसृष्टीत कायम आपलं वजन राखून राहिलं, चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलं. आजही काही ना काही निमित्तानं स्मिता ठाकरेंची चर्चा होत राहतेच.6 / 11स्मिता ठाकरे या पूर्वाश्रमीच्या स्मिता चित्रे. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र जयदेव ठाकरे यांच्याशी 1987 साली विवाहानंतर त्या 'मातोश्री'च्या सूनबाई झाल्या. स्मिता ठाकरे रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत असत. काही कारणानिमित्त जयदेव ठाकरे यांच्याशी ओळख झाली आणि ती वाढून पुढे त्यांचं लग्न झालं.7 / 11ठाकरे घरण्याची सून झाल्यानंतर स्मिता ठाकरे यांचा काही प्रसंगी राजकीय वावरही पाहायला मिळाला होता. ठाण्यातील एका जिमच्या उदघाटनाला त्या बाळासाहेबांसोबत उपस्थित होत्या. तसंच स्मिता ठाकरे यांच्या शब्दालाही शिवसेनेत वजन होतं. पण पुढे जाऊन उद्धव ठाकरेंच्या हाती शिवसेनेची सुत्र एकवटली गेली. 8 / 11स्मिता ठाकरे यांना राज्यसभेवर जाण्याची आशा होती. पण ते शक्य होऊ शकलं नाही. याबाबतचा खुलासा खुद्द स्मिता ठाकरे यांनी माध्यमांसमोर त्यावेळी केला होता. 'बाळासाहेबांनी म्हटलं होतं की राज्यसभेत पाठवू. पण त्यांनी पाठवलं नाही. का पाठवलं नाही त्याचं कारण माहीत नाही. मात्र, राज्यसभेच्या व्यासपीठावरून मी माझे मुद्दे नीट मांडू शकते, असं मला वाटतं', असं स्मिता ठाकरे त्यावेळी 'आजतक'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या होत्या.9 / 111999 सालच्या 'हसिना मान जाये'पासून त्यांनी राहुल प्रॉडक्शनच्या बॅनरखाली सिनेनिर्मितीत पाऊल ठेवलं होतं. सिनेमासृष्टीतल्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन (IMPPA) च्या 2001 ते 2003 या काळात त्या अध्यक्ष होत्या. हसिना मान जायेगी (1999), हम जो कह ना पाये (2005), सँडविच (2006) आणि सोसायटी काम से गई (2011) सारखे सिनेमांची निर्मिती स्मिता ठाकरे यांनी केली.10 / 11स्मिता ठाकरे आता सिनेमा किंवा राजकीय वर्तुळात सक्रिय दिसत नसल्या, तरी त्या गेल्या अनेक वर्षांपासून 'मुक्ती फाऊंडेशन' चालवतात. शिक्षणासह विविध क्षेत्रात या फाऊंडेशनद्वारे काम केलं जातं. मात्र, प्रामुख्यानं ड्रग्जच्या आहारी गेलेल्यांसाठी, तसंच एड्सबाबत जनजागृती याबाबत मुक्ती फाऊंडेशनद्वारे काम केलं जातं.11 / 11स्मिता ठाकरे सध्या थेटपणे राजकारणात सक्रिय नसल्या तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजच्या भेटीनं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेनेत उभी फूट पडलेली असताना ठाकरे घराण्याची सून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देते यातून आता राजकारणापासून दूर राहिलेल्या स्मिता ठाकरे शिंदे गटासोबत पुनरागमन करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications