Join us

Shivsena: 'ते फुटक्या कवडीचे फुटीर लोक'; शिंदेगटाला टोला, भाजपला चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2022 8:44 AM

1 / 8
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी शिवसेना संपलीय, असे उद्गार काढले होते. त्यावरुन, शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखातून भाजपवर घणाघाती टिका करण्यात आली आहे. तसेच, बंडखोर आमदारांनाही चांगलाच टोला लगावला आहे.
2 / 8
भाजपसोबत लढणारा आज कोणताच राजकीय पक्ष, कोणताच विचार राष्ट्रीय स्तरावर नाही, इतर संपले. जे संपले नाहीत ते संपतील. फक्त आपणच टिकणार, शिवसेनाही संपणार, असेही म्हटले होते.
3 / 8
नड्डा यांच्या या विधानाचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शैलीत समाचार घेतला होता. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे वक्तव्य देशाला हुकूमशाहीकडे नेणारे आहे. त्यांनी शिवसेना संपवूनच दाखवावी, असे आव्हानच उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत दिले.
4 / 8
त्यानंतर, आता सामनातून शिवसेनेनं नड्डा यांच्यावर टिकेचे बाण चालवले आहेत. तसेच, कावळ्याच्या शापाने गाय मरण नसते, असा टोलाही नड्डा यांना लगावला आहे. नड्डा यांच्या भाषेत अहंकार आल्याचे सांगत शिवसेनेनं त्यांचा मुखपत्रातून समाचार घेतला आहे.
5 / 8
नेते फोडण्यासाठी भाजप फक्त दडपण आणि दहशत याचाच वापर करीत आहे, असे नव्हे तर या दडपशाहीला किंवा प्रलोभनांना बळी न पडलेल्यांना सरळ तुरुंगाची वाट दाखवली जात आहे. तरीही प. बंगालपासून महाराष्ट्रापर्यंत अनेक पक्ष उभे आहेत व लढत आहेत. कारण, त्यांची नाळ पक्की आहे.
6 / 8
महाराष्ट्रात शिवसेनेशी लढता येत नाही म्हणून त्यांनी 'ईडी' वगैरेंचा धाक दाखवून शिवसेना फोडली व हे फुटक्या कवडीचे फुटीर लोक खिशात ठेवून ते शिवसेनेस आव्हान देत आहेत. तुमच्या खिशातले फुटक्या कवडीचे लोक संपतील, पण बाळासाहेबांची शिवसेना पुन्हा आकाशाला गवसणी घालेल.
7 / 8
तुमच्या धमक्यांना भीक घालणारी शिवसेना नाही. 'संपवू' वगैरे भाषा तुमच्या खिशातल्या फुटक्या कवडीच्यांना करा, अशा शब्दात शिवसेनेनं सामनातून बंडखोर नेत्यांवर प्रहार केला आहे. तसेच, नड्डा यांची भाषा लोकशाहीसाठी मारक आहे, पण ते ज्यांच्या सावलीत वावरत आहेत ते पाहता त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करावी?, असेही म्हटले.
8 / 8
एक चांगला माणूसही वाया गेला याचेच दुःख जास्त आहे. आजचा भाजपचा वंश हा खरेच खऱ्या भाजपच्या गर्भातून वाढला आहे काय? महाराष्ट्रापासून देशात सर्वत्र काँग्रेससह अनेक पक्ष फोडूनच भाजपची वाढ झाली. म्हणजे भाजपचे डोके असले तरी हात, पाय, नाक, कान वगैरे सगळे दुसऱ्यांचे आहे व शिवणकाम करून ते शरीर जुळवले आहे.
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेMumbaiमुंबई