Aditya Thackeray: आज त्या ब्रिटनच्या पंतप्रधान बनल्या, आदित्य ठाकरेंनी सांगितली 'मुंबई'ची लकी गोष्ट By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 06:46 PM 2022-09-06T18:46:54+5:30 2022-09-06T19:14:53+5:30
ब्रिटनमध्ये गेल्या काही काळापासून सुरु असलेल्या पंतप्रधान पदाची निवड सोमवारी संपली आहे. अनिवासी भारतीय उद्योजक ऋषी सुनक यांचा पराभव करून लिझ ट्रस ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान बनल्या आहेत. ब्रिटनमध्ये गेल्या काही काळापासून सुरु असलेल्या पंतप्रधान पदाची निवड सोमवारी संपली आहे. अनिवासी भारतीय उद्योजक ऋषी सुनक यांचा पराभव करून लिझ ट्रस ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान बनल्या आहेत. ऋषी सुनक(Rishi Sunak) आणि लिझ ट्रस(Liz Truss) यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिला होता.
लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या क्रिस पिंचर यांना बोरिस यांनी सरकारमध्ये सहभागी करून घेतल्याचा वाद उफाळून आला होता. यामुळे सुनक यांच्यासह जवळपास ५० जणांनी राजीनामा देत बंड पुकारले होते. यात सरकारचे मंत्रीदेखील असल्याने जॉन्सन यांनी अखेर राजीनामा दिला होता. यानंतर नवा पंतप्रधान निवडण्याची प्रक्रिया सुरु झाली होती.
ट्रस यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी ट्रस यांच्या मुंबई दौऱ्यातील काही फोटो पोस्ट करत त्यांना मुंबईबद्दल विशेष प्रेम असल्याचं अधोरेखित करत नव्या पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहेत. आदित्य यांनी त्यांच्या मुंबईतील आठवणीही जागवल्या.
आदित्य ठाकरेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये, त्यांच्या मुंबई दौऱ्याच्या आठवणीतील फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये आदित्य ठाकरे आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर ट्रस यांना पैठणी साडी भेट देताना दिसत आहेत.
आदित्य ठाकरेंनी ट्रस यांच्यासोबतचे पाच फोटो ट्विटरवरुन शेअर केले आहेत. यामध्ये ट्रस यांनी दोनदा मुंबईला भेट दिल्याचं नमूद केलं. तसेच, दुसऱ्या भेटीदरम्यान त्यांनी ट्रस यांच्यासाठी आपली मुंबई लकी चार्म ठरत असल्याचा उल्लेख केल्याचा प्रसंग सांगितला.
आदित्य यांनी जुना फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत आदित्य आणि किशोरी पेडणेकर ट्रस यांना पैठणी भेट देताना दिसत आहेत. “हुजूर पक्षातील पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये विजयी झाल्याबद्दल ट्रस यांचं अभिनंदन. मला आशा आहे की त्या भारत आणि ब्रिटनमधील संबंधांना पुढे घेऊन जातील. दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत करतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात दोन्ही देशांमधील सहकार्य वाढवेल,” असं आदित्य म्हणाले आहेत.
“पंतप्रधान निवडून आलेल्या ट्र्स यांनी पूर्वी ट्रेड सेक्रेटरी म्हणून मुंबईला भेट दिली होती. त्यानंतर त्या परत मुंबई आल्या तेव्हा परराष्ट्र सचीव म्हणून. त्यामुळेच मी त्यांच्या या दुसर्या भेटीत मी अगदी सहज उल्लेख करत त्यांना म्हटलं होतं की, मुंबई (मुंबई दौरा) तुम्हाला फायद्याची ठरली असून तुमच्या पुढील प्रवासाचं काही नवल वाटणार नाही असाच तो असेल. आज त्या यूकेच्या पंतप्रधान आहेत.” असं आदित्य यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचा नवा नेता निवडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर सुनक आणि ट्रस यांच्यात चुरस होती. देशात रोजगार संकट, औद्योगिक अशांतता आणि मंदीचा सामना करत असताना देशाची सत्ता हाती घेण्यास लिझ तयार आहेत.
ऋषी सुनक हे देशातील समस्यांबाबत जनतेवर फारसा प्रभाव टाकू शकले नाहीत तर कंझर्व्हेटिव्ह पक्षातील त्यांच्या प्रतिस्पर्धी लिझ ट्रस या ते करण्यात यशस्वी ठरल्या आहेत. लिझ ट्रस यांना 81,326 मते मिळाली, तर ऋषी सुनक यांना 60,399 मते मिळाली, तर मतदानाची टक्केवारी 82.6 टक्के होती.