Join us

फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून थेट गुजरातला; कंपनीच्या चेअरमन यांनी दिली मोजकीच प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 11:28 AM

1 / 6
वेदांत-फॉक्सकॉन ग्रुपचा १ लाख ५४ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. या प्रकल्पातून १ लाख नोकऱ्या उपलब्ध होणार होत्या. सेमीकंडक्टर निर्मितीचा (vedanta semiconductor) हा प्रकल्प गुजरातला स्थापन करण्यासंदर्भात वेदांत-फॉक्सकॉन ग्रुप आणि गुजरात सरकारमध्ये करार झाला आहे.
2 / 6
फॉक्सकॉन प्रकल्पावरून आता महाराष्ट्राचं राजकारण तापताना दिसत आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात अंतिम झालेला सेमीकंडक्टरचा प्रकल्प भाजपमुळे गुजरातमध्ये गेल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर विविध राजकीय पक्षांचे नेते आपली प्रतिक्रिया देत आहेत. याचदरम्यान वेदांत समूहाचे अध्यक्ष यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
3 / 6
वेदांत समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी मंगळवारी याबाबत ट्विट करून ही माहिती दिली. देशात आत्मनिर्भर सिलिकॉन व्हॅली सत्यात उतरणार आहे. या प्रकल्पामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न पूर्ण होणार असून यामुळे आपली इलेक्ट्रॉनिक्स आयात कमी होईल. या प्रकल्पातून एक लाख रोजगार निर्मिती होणार आहे, असं अनिल अग्रवाल यांनी म्हटलं आहे.
4 / 6
महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर २६ जुलै २०२२ रोजी नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या कंपनीबरोबर या प्रकल्पाबाबत चर्चा केली होती. मात्र, त्यानंतर मंगळवारी कंपनीने अचानक हा प्रकल्प गुजरातला होणार असल्याचे जाहीर केले. या घडामोडीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना लक्ष्य करत आहेत.
5 / 6
शिवसेना-भाजप युतीचे नवे सरकार स्थापन होऊन दोनच महिने झाले आहेत. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर वेदांताचे मालक अनिल अग्रवाल, फॉक्सकॉन आणि केपीएमजी यांच्यासोबत एक बैठक घेतली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. यावेळी सरकारकडून ज्या काही सवलती देणे शक्य आहे, त्या सर्व दिल्या जातील. तळेगावजवळील ११०० एकर जमीनही आम्ही देऊ केली होती. ३० ते ३५ हजार कोटींची सवलतीसह सब्सिडी, अन्य बाबी सरकारच्यावतीने ऑफर करण्यात आल्या होत्या, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
6 / 6
प्रकल्पासाठी गेल्या दोन वर्षात जो रिस्पॉन्स मिळायला हवा होता, ते कमी पडला असावा. मात्र, नवीन सरकारकडून शक्य तितक्या सर्व सवलती आम्ही देऊ केल्या होत्या. यावेळी हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात यावा, यासाठी प्रयत्न करणार का, असा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, बिलकूल आम्ही पंतप्रधान मोदी यांना भेटायला गेलो असताना, राज्याच्या हिताचे निर्णय घेण्यासंदर्भात सांगितले होते. उद्योग तसेच पायाभूत सुविधांबाबत राज्याला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
टॅग्स :Foxconn Vedanta Dealवेदांता-फॉक्सकॉन डीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीEknath Shindeएकनाथ शिंदे