Join us

ज्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंचे सूर जुळाले; ती सिनेट इलेक्शन म्हणजे काय रे भाऊ?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 8:02 PM

1 / 10
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवरून राजकीय रणधुमाळी उडाली आहे. १७ ऑगस्टच्या रात्री मुंबई विद्यापीठाने अचानक एक परिपत्रक काढले अन् विद्यार्थी संघटनांचा गोंधळ उडाला. पुढील आदेशापर्यंत सिनेट निवडणूक स्थगित केल्याचं जाहीर केले.
2 / 10
सिनेट निवडणूक स्थगित झाल्यानंतर पहिल्यांदाच ठाकरे बंधूंचे सूर जुळाले आहेत. आदित्य ठाकरेंची युवासेना आणि अमित ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यासह इतर विद्यार्थी संघटनांनी या निवडणुकीसाठी जोमात तयारी सुरू केली होती.
3 / 10
मात्र विद्यापीठाने निवडणुका पुढे ढकलल्याने हिरमोड झालेल्या आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांच्यासह इतर नेत्यांनी भाजपावर निशाणा साधला. निवडणूक स्थगित करणे हे अत्यंत धक्कादायक असल्याचे ठाकरे बंधू यांनी म्हटलं.
4 / 10
आता ज्या सिनेट निवडणुकीसाठी हे चाललंय, ती निवडणूक नेमकी काय आहे, त्यात कोणते उमेदवार उभे राहतात. मतदार नोंदणी अर्ज भरून पात्र उमेदवार यादी कशी ठरवली जाते? हे सगळं आपण समजून घेऊया.
5 / 10
सिनेट म्हणजे अधिसभा, ज्याप्रकारे राज्याची विधानसभा आणि देशाची लोकसभा असते तशीच कोणत्याही विद्यापीठाची सिनेट असते. ज्यात विद्यापीठाचे नियम ठरवणे, फी-धोरणे ठरवणे, आर्थिक बजेट निश्चित करणे यासारखी कामे सिनेट सदस्यांच्या माध्यमातून पूर्ण केली जातात.
6 / 10
सिनेट सदस्य ३ प्रकारचे असतात. त्यात पदसिद्ध सदस्य, निर्वाचित सदस्य आणि तिसरे नामनिर्देशित सदस्य, त्यात ४१ जागांसाठी निवडणूक होते. त्यात १० सदस्य विद्यापीठाच्या पदवीधर मतदारांमधून निवडून येतात. १० सदस्य महाविद्यालयाकडून निवडून दिलेले प्राध्यापक, तर इतर प्राचार्याकडून निवडून दिलेले १० सदस्य
7 / 10
तर उर्वरीत ११ सदस्य हे संस्थाचालकांनी निवडून दिलेले ६, विद्यापीठ आवारातील ३ सदस्य आणि विद्यार्थ्यामधून निवडून दिलेले अध्यक्ष, सचिव असे २ सदस्य, ही निवडणूक दर ५ वर्षांनी होते. त्यात विद्यार्थी परिषद अध्यक्ष, सचिव यांच्या निवडणुका दरवर्षी होतात.
8 / 10
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची तारीख १० दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली होती. ही निवडणूक १० सप्टेंबरला पार पडून १३ सप्टेंबरला निकाल जाहीर होणार होता. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत १८ ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत होती.
9 / 10
परंतु १७ ऑगस्ट २०२३ ला रात्री उशीरा मुंबई विद्यापीठाने पत्रक काढून अनिश्चित काळासाठी या निवडणुका पुढे ढकलल्या. विद्यार्थी राजकारणात येणाऱ्यांसाठी महत्त्वाची ही निवडणूक अचानक कारण न सांगता रद्द झाल्याने विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या.
10 / 10
मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक पुढे ढकलली असली तरी यावरून ठाकरे गट-भाजपा-मनसे एकमेकांसमोर आले आहेत. भाजपाच्या दबावामुळेच या निवडणुका रद्द झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे-अमित ठाकरे यांनी केला आहे.
टॅग्स :Amit Thackerayअमित ठाकरेAaditya Thackerayआदित्य ठाकरेBJPभाजपाMumbai Universityमुंबई विद्यापीठ