Join us

नेमका इगो कुणाचा, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? अन् राऊतांनी काय करावं?; दिपाली सय्यद स्पष्टच बोलल्या...!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 1:28 PM

1 / 10
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे चर्चा करण्यासाठी दोनच दिवसात एकत्र येणार असल्याचं ट्विट अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी केलं होतं. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिपाली सय्यद यांना काळजीपूर्वक वक्तव्य करण्याचा सल्ला देऊ केला. दिपाली सय्यद यांना हा अधिकार कुणी दिला? त्या पक्षाच्या प्रवक्त्या किंवा नेत्या नाहीत त्यामुळे अशी विधानं करताना काळजी घ्यावी असं म्हणत संजय राऊत यांनी दिपाली सय्यद यांचे कान टोचले.
2 / 10
संजय राऊत यांनी दिपाली सय्यद यांना सुनावल्यानंतर खुद्ध दिपाली सय्यद यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या ट्विटवर स्पष्टीकरण दिलं. यात त्यांनी शिवसेनेतील संपूर्ण प्रकरणावर सविस्तर भाष्य केलं. तसंच मी दोन्ही बाजूंच्या संपर्कात असून मध्यस्थी करण्याचे माझे प्रयत्न अजूनही सुरू असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.
3 / 10
'मी दोन्ही बाजूच्या नेत्यांशी बोलले आहे. मला असं जाणवतंय की प्रत्येकाच्या मनात एकत्र यायचं आहे. पण कुठेतरी मान-अपमान आणि इगो आडवा येत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला तर आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. आज कुणी समोरुन उघडपणे बोलत नसलं तरी प्रत्येकाच्या मनात तिच भावना आहे. फक्त इगो आणि पुढाकार कोण घेणार यात सगळं अडलेलं दिसत आहे', असं दिपाली सय्यद म्हणाल्या.
4 / 10
'मी संजय राऊत यांना एवढंच सांगेन की मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. शिवसैनिक आहे आणि प्रत्येक शिवसैनिकाला आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मी जे ट्विट केलं आहे ती माझी भावना आहे. आपण शिवसैनिक म्हणून लढा दिला पाहिजे. आपलं तुटलेलं घर एकत्र यावं यासाठी प्रयत्न मी करत आहे आणि यात मला कुणाच्या परवानगीची गरज वाटत नाही', असं दिपाली सय्यद म्हणाल्या.
5 / 10
'मी मध्यस्थाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे माझ्यावर कारवाईचा प्रश्नच येत नाही. संजय राऊत मोठे नेते आहेत. माझे छोटेछोटे कार्यकर्ते होरपळत आहेत. त्यामुळे तुमच्याच मनातील इच्छा मी बोलून दाखवत आहे. सगळ्यांनी एकत्र या आणि बोला यातच शिवसेनेचं हित आहे. एकत्र यायचं नाही असं कुणीच बोलत नाहीय. फक्त पुढाकार घेणार कोण? यावर सगळं अडलेलं आहे', असंही त्या म्हणाल्या.
6 / 10
दिपाली सय्यद यांनी यावेळी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येतील यावर ठाम विश्वास व्यक्त केला. 'माझं दोन्ही ठिकाणी बोलणं झालं आहे. जे काही मला जाणवलं आहे तेच मी ट्विट केलं आहे. त्यामुळे जे तुटलंय आणि जिथं अडतंय त्यातून मार्ग काढण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. यात मला नक्की यश येईल. तुम्हाला ते दिसेल', असं दिपाली सय्यद म्हणाल्या.
7 / 10
याला-त्याला टोचून बोलणं यातच सगळं अडकलं आहे. शांत बसून बोललं गेलं तर सगळ्या गोष्टी थांबतील. संजय राऊत त्यांचं काम उत्तम करत आले आहेत. ते बिनधास्त बोलतात. ती त्यांची शैली आहे. पण आपल्याच पक्षात फूट पडल्यामुळे शांततेचा पवित्रा घ्यावा आणि त्यांनीच पुढाकार घेऊन सर्वांना एकत्र आणावं हिच माझी इच्छा आहे, असंही दिपाली सय्यद म्हणाल्या.
8 / 10
'एकनाथ शिंदे यांनीच मला शिवसेनेत आणलं आणि उद्धव ठाकरे हे आमचे पक्षप्रमुख आहेत. एक शिवसैनिक म्हणून माझं घर एकत्रित राहावं यासाठीच माझे प्रयत्न सुरू आहेत. माझ्या मनातली इच्छा मी बोलून दाखवली आहे. मला माहित्येय की तुमच्याही मनात तिच इच्छा आहे. त्यामुळे सगळे मळभ दूर होऊन लवकरच चर्चा होईल आणि येत्या दिवसात तुम्हाला ते पाहायला मिळेल', असा विश्वास दिपाली सय्यद यांनी व्यक्त केला.
9 / 10
आज जे वेगळे आहेत ते उद्या एकत्र येतील. प्रत्येक शिवसैनिकाने आणि नेत्याने यावर बोलणे गरजेचे आहे. केसरकर आणि शहाजी बापू पाटील यांची विधानं जर आपण पाहिली तर त्यांनाही कुठेतरी एकत्र यायची इच्छा आहे. पण कुणी पुढाकार घेत नाही. सर्व मान-अपमानात अडलं आहे, असंही दिपाली सय्यद म्हणाल्या.
10 / 10
'येत्या दोन दिवसात आदरणीय उध्दवसाहेब व आदरणीय शिंदेसाहेब शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करुन पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खुप बरे वाटले. शिंदे साहेबांनी शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उध्दवसाहेबांनी कुटूंबप्रमुखांची भुमिका मोठ्यामनाने निभावली हे स्पष्ट झाले आहे. या मध्यस्ती करीता भाजपा नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद! चर्चेच्या ठिकाणाची प्रतिक्षा असेल', असं ट्विट करुन दिपाली सय्यद यांनी नवा ट्विट निर्माण केला आहे.
टॅग्स :deepali sayedदीपाली सय्यदSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे