Join us

Sameer Wankhede: “समीन वानखेडेंनीच माझ्या घरात ड्रग्ज ठेवले”; एका तरुणाचा जामीन अर्जात खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 5:46 PM

1 / 9
मुंबई क्रूझ ड्रग्ज केस प्रकरणात (Mumbai Cruise Drug Case) शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला झालेल्या अटकेनंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर सातत्याने आरोप करताना पाहायला मिळत आहेत.
2 / 9
याशिवाय समीर वानखेडे यांच्यावर खंडणीचे आरोपही केले जात आहेत. अशातच समीर वानखेडेंविरोधात आणखी एक प्रकरण पुढे आले आहे. ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या एका २० वर्षीय तरुणाने वानखेडे यांच्यावर धक्कादायक आरोप केला आहे. व्यक्तिगत वादातून वानखेडे यांनीच माझ्या घरात ड्रग्ज ठेवल्याचा आरोप या तरुणाने केला आहे.
3 / 9
झैद राणा असे या तरुणाचे नाव असून, एप्रिल महिन्यात झैदच्या ओशिवरा येथील घरातील ड्रॉवरमध्ये व स्कूटरवर मॅरिजुआना, चरस व इतर अमलीपदार्थ एनसीबीने जप्त केल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी राणा व त्याचा मित्र सोनू फैजला अटक करण्यात आली. आता आर्यन खान प्रकरणात वानखेडे यांच्यावर आरोप होऊ लागल्यावर धाडस करून संबंधित तरुणाने आपल्या जामीन अर्जात हा आरोप केल्याचे सांगितले जात आहे.
4 / 9
व्यक्तिगत शत्रुत्व काढण्यासाठी समीर वानखेडे यांनी हे सगळे केल्याचा मोठा दावा झैद राणा याने म्हटले आहे. झैद राणा राहत असलेल्या घराशेजारीच वानखेडे कुटुंबाचा फ्लॅट आहे. हा फ्लॅट भाड्यानं दिलेला आहे. वानखेडे यांचे भाडेकरू व झैद राणा याच्या आई-वडिलांमध्ये काही कारणावरून क्षुल्लक वाद झाला होता.
5 / 9
या भांडणाचा राग मनात ठेवून वानखेडे यांनी ड्रग्ज प्रकरणात अडकवले. वानखेडे यांनी स्वत: माझ्या घरात ड्रग्ज ठेवले होते. या प्रकरणात ऑक्टोबरमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यात अनेक चुकीचे दावे करण्यात आले आहेत.
6 / 9
समीर वानखेडे घटनास्थळी उपस्थित असतानाही तसे नमूद करणे सोयीस्करपणे टाळण्यात आले आहे. मात्र, इमारतीमधील सीसीटीव्ही फूटेज तपासल्यास सत्य समोर येईल. त्यामुळे संबंधित ठिकाणाचे सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घ्यावे, अशी मागणी या अर्जात करण्यात आली आहे.
7 / 9
त्याचबरोबर हे प्रकरण वानखेडे यांचा संबंध नसलेल्या एखाद्या यंत्रणेकडे सोपवावे, अशी मागणीही आरोपींनी केली आहे. झैद राणा याच्या जामीन अर्जावर एनसीबीने उत्तर दाखल करावं, असे निर्देश विशेष एनडीपीएस कोर्टाने दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी शनिवारी होणार आहे.
8 / 9
आर्यन खान प्रकरणात ज्या लोकांना पंच साक्षीदार म्हणून उभे करण्यात आले होते, तेच लोक झैद राणाच्या प्रकरणातही पंच साक्षीदार म्हणून दाखवण्यात आले होते. मात्र, अनेक प्रकरणे चव्हाट्यावर येऊ लागल्यावर वानखेडे यांनी खोटा आणि बनावट अहवाल तयार करून पंच साक्षीदार बदलले आहेत.
9 / 9
त्याशिवाय, त्याच इमारतीतील एका व्यक्तीला पंच साक्षीदार बनवण्यात आले होते. ती व्यक्ती एनसीबीमध्येच कार्यरत असल्याचे दाखवण्यात आले होते, मात्र या इमारतीतील कोणतीही व्यक्ती एनसीबीमध्ये नाही, असा दावाही राणाचे वकील अशोक सरोगी यांनी केला आहे.
टॅग्स :Sameer Wankhedeसमीर वानखेडेNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो