२७ मार्च रोजी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना तर ३० मार्च रोजी दिवंगत स्वातंत्र्यसैनिक मदन मोहन मालवीय यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला.सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होणा-या नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करणा-या अत्यंत वादग्रस्त अशा इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्ट २००० मधले ६६ ए हे कलम घटनाबाह्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने २४ मार्च रोजी दिला. २०१२ मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भात फेसबुकवर टिप्पणी केलेल्या २ मुलींवर पोलीसांनी केलेल्या कारवाईनंतर हा प्रश्न ऐरणीवर आला होता.आंध्रप्रदेशमधून तेलंगणा या स्वतंत्र राज्याची निर्मिती करण्यात आली आणि आंध्रासाठी नवी राजधानी उभारण्याचे ठरले. विजयवाडा आणि गंटूरच्या मध्ये थुल्लूरजवळ उभारण्यात येणा-या या राजधानीचे नाव अमरावती असे ठेवण्याचा निर्णय २३ मार्च रोजी घेण्यात आला.१६ फेब्रुवारी रोजी कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर कोल्हापूरमध्ये गोळ्या झाडण्यात आल्या. यातच २० फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झाले. नरेंद्र दाभोलकरांच्या ह्तेयमागोमाग काही महिन्यांतच झालेल्या या हत्येचे पडसाद राज्यातच नव्हे तर देशभरात उमटले.स्वाईन फ्ल्यूची भीती पश्चिमेकडच्या राज्यांना भेडसावत होती. १५ जानेवारीपर्यंत स्वाइन फ्ल्यूच्या बळींची संख्या ५८५ एवढी झाली. यामध्ये राजस्थान (१६५) गुजरात (१४४) मध्य प्रदेश (७६) व महाराष्ट्रात ५८ जणांनी प्राण गमावले.फेब्रुवारीच्या १० तारखेला दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीने इतिहास घडवला. दिल्ली विधानसभेच्या ७० पैकी ६७ जागा जिंकत आपने भाजपाच्या विजयी रथ जमिनीवर आणला. या यशाचे शिल्पकार असलेल्या अरविंद केजरीवालांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि दिल्ली हे भारतामधले पहिले भ्रष्टाचारमुक्त राज्य करण्याची ग्वाही दिली.३१ जानेवारी रोजी भारताने सर्वाधिक लांबच्या पल्ल्याच्या अग्नी - ५ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. हे क्षेपणास्त्र अण्वस्त्रवाहू असून याची क्षमता ५००० कि.मी. इतक्या अंतरावर मारा करण्याची आहे. म्हणजे पश्चिमेला जवळपास संपूर्ण युरोप आणि पूर्वेला चीनच्या बहुतांश भूभागापर्यंत हे क्षेपणास्त्र डागले जाऊ शकते.२६ जानेवारी रोजी भारताच्या ६६ व्या प्रजासत्ताक दिनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. अमेरिकेच्या अध्यक्षांनी अशा प्रकारे सहभागी होण्याचा हा इतिहासातला पहिलाच प्रसंग. तीन दिवसांच्या ओबामांच्या भेटीने भारत अमेरिका संबंध घट्ट होत चालल्याचं दिसून आलं.प्रेषित मोहम्मदांची व्यंगचित्रे छापणा-या फ्रान्समधल्या चार्ली हेब्दो या नियतकालिकाच्या पॅरीसमधल्या कार्यालयावर ७ जानेवारी रोजी दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ११ जण ठार झाले तर ११ जण जखमी झाले. या हल्ल्याची जबाबदारी अल कायदाने घेतली.महेंद्रसिंग धोनीने ३० डिसेंबर रोजी तडकाफडकी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. परदेशात मिळालेल्या सततच्या पराभवानंतर आणि भारतीय ड्रेसिंग रुममधील बदलत्या समीकरणांमुळे हा निर्णय घेतल्याचं समजते. ६ जानेवारी रोजी विराट कोहलीकडे भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले.नवीन वर्षाची सुरुवातच गुजरातजवळ समुद्रात एका पाकिस्तानी बोटीच्या स्फोटानं झाली. भारताच्या सागरी तटरक्षक दलाने या बोटीला हटकल्यावर बोटीवर असलेल्या दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणल्याचे केंद्र सरकारने सांगितले आणि २६/११ सारख्या आणखी एका हल्ल्याचा कट उधळला गेल्याची शक्यता वर्तवण्यात आली.