- मयूर पठाडे भारतासारख्या देशात सूर्यप्रकाश अत्यंत मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, तरीही सूर्यप्रकाशाच्या अभावी मानवी शरीरात ज्या कमतरता निर्माण होतात त्यानं बहुतांश भारतीय पिडीत आहेत, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. नुकत्याच केलेल्या एका संशोधनानुसार तर आता हेदेखील सिद्ध झालं आहे की वडिलांमध्ये जर व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर त्याचे दुष्परिणाम त्यांच्या मुलांनाही भोगावे लागू शकतात. अशा पालकांच्या मुलांची उंची आणि वजन खुंटित राहू शकते असा या संशोधनाचा निष्कर्ष आहे. व्हिटॅमिन डी ची कमतरता मुख्यत: कशामुळे होते तुम्हाला माहीत आहे? सूर्यप्रकाशामुळे अत्यंत सहजपणे तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळू शकते. सूर्यप्रकाश मिळावा म्हणून अनेक परदेशी नागरिक एकीकडे सनबाथ घेताना आपल्याला दिसतात, तर उन्हाचा त्रास नको म्हणून आपण शक्य तितकं उन्हाला टाळण्याचा आणि उन्हापासून वाचण्याचा प्रय} करतो. मग त्यासाठी अगदी उन्हात न जाण्यापासून तर फूल बाह्यांचे कपडे घालणे, डोक्यापासून तर पायाच्या नखापर्यंत सर्वांग झाकून घेणं, सनस्क्रीन लावणं. यासारखे अनेक ‘उपाय’ आपण योजतो. गरजेपुरताही सूर्यप्रकाश आपण आपल्या शरीराला लागू देत नाही, पण त्याचमुळे स्वच्छ सूर्यप्रकाशाच्या या देशात अनेक जणांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आहे हे सत्य आहे. आयर्लंड येथील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सिलिया लॅँचेरॉस यांनी अनेक वर्षे पालक आणि त्यांच्या मुलांचा अभ्यास करून हा निष्कर्ष नुकताच पोतरुगाल येथील युरोपिअन कॉँग्रेस ऑफ ओबेसिटीला (इसीओ) सादर केला आहे. या अभ्यासाचा मुख्य रोख होता, पालकांमध्ये, त्यातही वडील पालकामध्येच जर व्हिटॅमिनी डी डेफिशिअन्सी असेल तर त्यांच्या मुलांमध्ये, मुलांच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो का? होत असल्यास काय परिणाम होतो?त्यासाठी डॉ. सिलिया यांनी नवविवाहित जोडपी निवडली, ज्यांना अजून मूल झालेलं नाही. मूल होण्याच्या आधीच त्यांनी दोन्ही पालकांची; त्यातही खासकरून पुरुष पालकांची तपासणी केली. त्यांच्यात व्हिटॅमिन डीचं प्रमाण किती आहे, याची नोंद केली. त्यांना मुलं झाल्यानंतर ही मुलं पाच आणि नऊ वर्षांची झाल्यानंतर त्या मुलांचाही अभ्यास केला. त्यासाठीचं एक खास मॉड्यूलही विकसित केलं. अनेक पातळ्यांवर आणि अत्यंत दीर्घ असा हा अभ्यास होता. काय होता हा अभ्यास? पुरुष पालकाचं वय, त्याच्या शरीरातील व्हिटॅमिन डीचं प्रमाण, त्याचं वजन, आई पालकाचं वय, तिच्यातील व्हिटॅमिन डीचं प्रमाण, तिचं वजन, त्यानंतर जन्माला आलेल्या बाळाचं लिंग, त्याचं वय, त्याच्यातील व्हिटॅमिन डीचं प्रमाण, मूल पाच वर्षांचं झाल्यानंतर विशेषत: उन्हाळ्यातील त्याची फिजिकल अँक्टिव्हिटी. या सार्या गोष्टींचा अत्यंत तपशीलात जाऊन अभ्यास करण्यात आला. पालकांमधील कमी किंवा पुरेशा व्हिटॅमिन डीचा त्यांच्या मुलांवर काय परिणाम होतो अशा प्रकारचा हा अभ्यास पहिलाच अभ्यास मानला जात आहे. काय आहे निष्कर्ष?हा अभ्यास सांगतो, वडिलांमध्ये जर मुलाच्या जन्मापूर्वी व्हिटॅमिन डी डेफिशिअन्सी असेल तर मुलांच्या वाढीवर त्याचा निश्चितच दुष्परिणाम होऊ शकतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आईमध्ये असलेल्या व्हिटॅमिन डीच्या प्रमाणाचा मुलांवर कोणताही परिणाम होत नाही असं या अभ्यासातून समोर आलं. आई बरोबर बाबाही हवेत सुदृढ बाळाच्या जन्मापूर्वी आईचीच तेवढी तब्येत सुदृढ असली पाहिजे असं आपल्याकडे मानलं जातं. आपल्याबरोबरच जगात बर्याच ठिकाणीही असाच समज आहे. पण हा समज या नव्या संशोधनानं पुन्हा एकदा खोडून काढला आहे. बाळाच्या जन्मापूर्वी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आई जेवढी सुदृढ हवी तेवढाच बाबाही सक्षम असला पाहिजे. त्यामुळे बाबा पालकांनो लक्षात ठेवा, तुमचं बाळ जर तुम्हाला निरोगी आणि सुदृढ हवं असेल, तर तुम्हालाही तसंच असायला हवं. आपल्याला जर काही वाईट सवयी असतील, सुदृढ नसाल तर आधी आपल्या तब्येतीकडे लक्ष द्या आणि मगच बाळाला जन्म देण्याचा विचार करा..