शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Manjamma Jogati: आई-वडिलांची सुटली साथ, प्रसंगी भीक मागून उदरनिर्वाह; पाहा, ‘पद्मश्री’ मंजम्मा जोगतींचा जीवनप्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 6:23 PM

1 / 12
अलीकडेच राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळातील अनेक नेत्यांच्या उपस्थितीत भारताच्या हिऱ्यांचा पद्म पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यंदाच्या पद्म पुरस्कारांमध्ये अगदी सामान्य असलेल्या माणसांच्या असामान्य कर्तृत्वाला देशाने सलाम केला.
2 / 12
यातील एक नाव म्हणजे ट्रान्सजेन्डर लोक कलाकार मंजम्मा जोगती. मंजम्मा जोगती यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 'पद्मश्री' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी मंजम्मा जोगती यांनी केलेल्या अभिवादनाची चर्चाही सोशल मीडियावर सुरू आहे. (Manjamma Jogati)
3 / 12
पुरस्कार स्वीकारण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मंजम्मा यांनी अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. राष्ट्रपतींनीही हसत हे अभिवादन स्वीकार केले. त्यांचा हा अंदाज पाहून संपूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा गडगडाट झाला. (Padma Shri Manjamma Jogati)
4 / 12
मंजम्मा जोगती यांचा जन्म १८ एप्रिल १९६४ रोजी कर्नाटकच्या बेल्लारी जिल्ह्यातील कल्लुकंब गावात झाला होता. कन्नड रंगमंचावर मंजम्मा जोगती यांनी अभिनेत्री, गायिका आणि नृत्यांगणा म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. नृत्य कला क्षेत्रातील महत्त्वाच्या योगदानासाठी भारत सरकारने 'पद्मश्री' पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे.
5 / 12
मंजम्मा उर्फ मंजूनाथ यांनी शाळेत जाणे सुरू केले तेव्हा त्यांना मुलींसोबत खेळण्याची आणि नृत्याची आवड होती. कुटुंबीयांनी डॉक्टर आणि पुजाऱ्यांना दाखवल्यानंतर मंजूनाथ यांचे शरीर पुरुषाचे असले तरी त्यांच्यात स्त्रीचे गुण असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
6 / 12
यानंतर, १९७५ मध्ये त्यांचे आई-वडील त्यांना हुलीगेयम्मा मंदिरात घेऊन गेले. इथे 'जोगप्पा' बनण्याची दीक्षा दिली. 'जोगप्पा' किंवा 'जोगती' चा यल्लम्मा देवीशी विवाह लावण्यात येतो. आपलं संपूर्ण आयुष्य यल्लम्मा देवीचे भक्त म्हणून ते सेवा करतात. यल्लमा देवीला उत्तर भारतात रेणुका नावानेही ओळखले जाते.
7 / 12
दीक्षा घेण्यासाठी आणि देवी यल्लम्माशी विवाह करण्यासाठी मंजूनाथ यांना मंगळसूत्र, स्कर्ट-ब्लाऊज आणि बांगड्या देण्यात आले. त्यानंतर मंजूनाथ यांना मंजम्मा जोगती असे नाव मिळाले. आई-वडिलांनी आपल्या मंजूनाथला देवीला सोडून दिले होते. बेघर झाल्यानंतर राहण्या-खाण्यासाठी कोणतीही जागा मंजम्मांकडे नव्हती. त्यामुळे त्यांना भीक मागून आपला उदरनिर्वाह करावा लागला.
8 / 12
निराशेच्या गर्तेत बुडालेल्या मंजम्मा यांनी विष घेऊन आत्महत्येचाही प्रयत्न केला. कर्नाटकच्या दावणगेरे बस स्टँडजवळ रस्त्यावर 'जोगती नृत्य' करत फिरणाऱ्या एका बाप-मुलाची जोडी पाहून आत्महत्येचा विचार मंजम्मा यांनी सोडून दिला. याच व्यक्तीकडून मंजम्मा यांनी नृत्याचे धडे घेतले.
9 / 12
यानंतर त्यांची लोक कलाकार कालव्वा यांच्याशी भेट झाली. कालव्वा यांच्यामुळे मंजम्मा यांना छोट्या-मोठ्या नाटकांत भूमिकाही मिळू लागल्या. यानंतर त्यांनी रंगमंच आणि नृत्यालाच आपले आयुष्य समर्पित केले. जोगती नृत्यानंच मला इथवर आणले आहे. हे नृत्य आणि जोगप्पा समाजाला मानाचे स्थान मिळावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंजम्मा यांनी म्हटले आहे.
10 / 12
'जोगती नृत्य' हे पारंपरिक लोकनृत्य म्हणून ओळखले जाते. ट्रान्सजेन्डर महिला हे नृत्य सादर करतात. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागांत हे नृत्य परिचित आहे. त्यामुळेच, या राज्यांतल्या अनेक ग्रामीण भागांत मंजम्मा आणि त्यांचे नृत्य लोकप्रिय आहे.
11 / 12
सन २००६ साली 'कर्नाटक जनपद अकादमी' पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला. तर, सन २०१९ साली कर्नाटकच्या त्या 'कर्नाटक जनपद अकादमी'च्या पहिल्या ट्रान्सजेन्डर अध्यक्ष बनल्या. तसेच सन २०१० साली कर्नाटक सरकारने त्यांना वार्षिक कन्नड राज्योत्सव पुरस्कारासहीत सन्मानित केले.
12 / 12
एकूण ११९ मान्यवरांना 'पद्म' पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यात सात मान्यवरांना 'पद्म विभूषण', १० मान्यवरांना 'पद्मभूषण' आणि १०२ जणांना 'पद्मश्री' पुरस्कारासहीत गौरविण्यात आलं तर १६ जणांना मरणोत्तर 'पद्म पुरस्कार' प्रदान करण्यात आला आहे.
टॅग्स :padma shri awardsपद्मश्री पुरस्कार